Hirkani Marathi Film: हिरकणी सिनेमाच्या दोन्ही मुख्य चेहऱ्यांचा अखेर उलघडा

मराठी पिक्चर बारी
Updated Sep 25, 2019 | 21:45 IST | चित्राली चोगले

इतिहासातील एक सुवर्ण पान उलघडणारी गोष्ट घेऊन हिरकणी सिनेमा येणार हे कळताच प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आता सिनेमात या हिरकणीची भूमिका कोण साकारत आहे हे अखेर जाहीर झालं असून सिनेमातील नायकही समोर आला.

sonalee Kulkarni to play lead in marathi movie hirkani alongside new face amit khedekar as jiva
Hirkani Marathi Film: बहुप्रतिक्षीत हिरकणी सिनेमाच्या दोन्ही मुख्य चेहऱ्यांचा अखेर उलघडा 

थोडं पण कामाचं

  • बहुप्रतिक्षीत हिरकणी सिनेमातील मुख्य पात्रांचा उलघडा
  • अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पाठ्यपुस्तकातील हिरकणी साकारणार
  • हिरकणी सिनेमाचं नवीन मोशन पोस्टर भेटीला

मुंबई: प्रत्येक आई असतेच...हिरकणी... असं म्हणत एक नवीन मराठी सिनेमा जाहीर झाला आणि सगळ्यांचे लक्ष त्याने वेधून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण काळातील एक सुवर्ण पान हा सिनेमा उलघडणार असं कळताच या सिनेमाची प्रतीक्षा शिगेला पोहचली होती. त्याचसोबत सगळ्यांना कुतुहल होतं ते या सिनेमात हिरकणीचा टायटल रोल कोण साकारणार याची. मध्यंतरी सिनेमाचं राज्याभिषेक गीत रिलीज झालं आणि या उत्सुकतेत भर पडली. अखेर या सिनेमातल्या हिरकणीचा आणि तिच्या अपोझिट दिसणाऱ्या जिवाचा उलघडा झाला आहे. तर सिनेमात पाठ्यपुस्तकातील हिरकणी साकारताना दिसणार आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

सोनालीच्यासोबत सिनेमात जिवाचं मुख्य पात्र साकारणार आहे अभिनेता अमित खेडेकर. हिरकणी हे नाव जरी उच्चारलं तरी अनेकांच्या डोळ्यांसमोर धाडसी आईचं चित्र उभं राहतं जी आपल्या बाळासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गडाची खोल कडा उतरून खाली जाते. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धाडसी ‘हिरकणी’ची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर अनुभवयाला मिळणार याची उत्सुकता असतानाच त्या भूमिकेला सोनाली न्याय देते का याकडे आता लक्ष लागलं आहे. सिनेमाबद्दलची इतकी महत्तवाची गोष्ट उलघडताच अखेर सिनेमाच्या अभिनेत्री अवती-भवती असलेल्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

Sonali kulkarni

प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित ‘हिरकणी’चे नवीन पोस्टर नुकतेच पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर येथे प्रदर्शित करण्यात आलं. या पोस्टरमधून प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पाठ्यपुस्तकातील हिरकणीला रुपेरी पडद्यावर साकारणार आहे आणि सोनालीच्या माध्यमातून हिरकणीला मिळालेला चेहरा लोकांच्या नक्कीच कायमस्वरुपी स्मरणात राहील याची खात्री सिनेमाच्या संपूर्ण टीमला आहे. विशेष म्हणजे अभिनेते सचिन खेडेकर यांनी मोशन पोस्टरला आवाज दिला आहे. या पोस्टर प्रदर्शनाच्या वेळी हिरकणी उर्फ सोनाली कुलकर्णी, जिवा म्हणजे अमित खेडेकर हे दोन लीड आणि प्रसाद ओक, राजेश मापुस्कर, लॉरेन्स डिसुझा सह सिनेमाची टीम उपस्थित होती. चतु:श्रृंगी मंदिरात प्रमुख भूमिकेचं पोस्टर लाँच करुन ‘हिरकणी’ टीमने देवीचे दर्शन घेतले.

Sonali kulkarni pic

या रुपेरी पडद्यावरच्या हिरकणीला पाहण्यासाठी बरीच गर्दी जमली होती. या प्रसंगी पहिली एन्ट्री झाली ते अमितची आणि ती सुद्धा छान वाजत-गाजत. अमित रुबाबदारपणे घोड्यावरुन अवतरला आणि क्षणार्धात जिवाची झलक त्याच्यात दिसून गेली. त्यानंतर सगळ्यांचं लक्ष होतं ते सोनालीच्या एन्ट्रीवर. ती सुद्धा डोलीतून तिच्या सिनेमातल्या लूकमध्ये अवतरली आणि त्यानंतर ती सुद्धा घोड्यावर स्वार झाली. सिनेमाचा हा मोशन पोस्टर लॉन्च सोहळा खूपंच आगळ्या-वेगळ्या पद्धतीत पार पडला असंच म्हणावं लागेल. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ सिनेमाची निर्मिती इरादा एंटरटेनमेंटच्या फाल्गुनी पटेल आणि सहनिर्मिती लॉरेन्स डिसुझा यांनी केली आहे आणि राजेश मापुस्कर या सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. कार्यकारी निर्माते म्हणून रत्नकांत जगताप यांनी काम पाहिले आहे. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला ‘हिरकणी’ संपूर्ण महाराष्ट्रात धमाका करत बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी