ट्रेलरमधून दिसली तेजश्री प्रधान-मंगेश देसाई यांच्या ‘जजमेंट’ सिनेमाची थरारक झलक

मराठी पिक्चर बारी
Updated Apr 23, 2019 | 20:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

‘जजमेंट’ या थरारपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज केलं गेलं आणि सिनेमाच्या गूढ कथेची उत्सुक्ता निर्माण झाली. अखेर सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला गेलाय आणि त्यातून सिनेमाच्या थराराची जाणीव झाल्या शिवाय राहत नाही.

Tejashree Pradhan- Mangesh Desai starrer Marathi film Judgement trailer is out
‘जजमेंट’ सिनेमाचा थरारक ट्रेलर तुम्ही पाहिलात का?  |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबई: ‘जजमेंट’ सिनेमा काही दिवसांपूर्वी घोषित झाला आणि लगेचंच भेटीला आलं सिनेमाचं पोस्टर. सिनेमाच्या पोस्टरवरुन सिनेमा थरारपट असेल असा अंदाज आला. अखेर या थरारपटाचा रंजक ट्रेलर रिलीज केला गेलाय आणि सिनेमाचं कुतूहल नक्कीच वाढलं आहे. तेजश्री प्रधान आणि मंगेश देसाई यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचा आषय आणि विषय तसा वेगळाच आहे असं म्हणावं लागेल. कारण हा सिनेमा नीला देसाई यांच्या ‘ऋण’ या कादंबरीवर आधारित आहे. नीला देसाई या निवृत्त सनदी अधिकारी असून महाराष्ट्राच्या पहिल्या महिला स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची ओळख आहे. आणि त्यांच्या या कारर्किदीत त्यांच्या समोर आलेल्या सत्य घटनेवर ही कादंबरी त्यांनी लिहीली आहे. त्यामुळे सिनेमाची कथा सत्य घटनांचा आढावा घेताना दिसेल तसंच त्याचा थरार ही या सत्य घटनांशी जोडला गेला आहे.

 

 

‘जजमेंट’च्या ट्रेलमधून समोर येते ते एका मुलीची गोष्ट जी अगदी 5-6 वर्षांची असताना तिच्या आईचा खून तिच्या वडिलांकडून केला गेला असतो. पण आपण रस्त्यावर येऊ या भितीने आजोबांच्या सांगण्यावरुन ती कोर्टात खोटी साक्ष देत वडिलांना वाचवते खरी पण 15 वर्षांनी आपल्या आईला न्याय देण्यासाठी ती पुन्हा सज्ज होते आणि तिचा लढा सुरु इथे होतो. आणि या लढ्यात तिच्या जिवाला धोका निर्माण होतो ते तिच्या जन्मदात्या वडिलांकडूनंच. पुढे सिनेमात रंगणार ती या बाप-मुलीची लढाई. या एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या बाप-मुलीच्या भूमिकेत मंगेश देसाई आणि तेजश्री प्रधान दिसतील आणि त्यांची अभिनयातली जुगल बंदी बघायला नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. याच सोबत सिनेमात माधव अभ्यंकर यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. दमदार अभिनय, उत्कृष्ट कथा आणि संवेदनशील विषय ह्या सिनेमाच्या जमेच्या बाजू आहेत असं म्हणता येईल.

अस्तित्वाच्या आणि न्यायाच्या लढाईसाठी या सिनेमातल्या ऋजुता म्हणजेच तेजश्रीच्या जीवघेण्या संघर्षाचे भेदक चित्रण या सिनेमात अनुभवायला मिळेल असं सिनेमाच्या टीमचं म्हणणं आहे. व. पु. काळे यांच्या प्रसिद्ध 'पार्टनर' या कादंबरीवर आधारित 'श्री पार्टनर' या सिनेमाने दिग्दर्शनात पदार्पण केलेले समीर सुर्वे या सिनेमाचं दिग्दर्शन करत पुन्हा एकदा कादंबरीवर आधारित सिनेमाकडे वळले आहेत. ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शनच्या बॅनर खाली रिलीज होणाऱ्या या सिनेमाची निर्मिती डॉ. प्रल्हाद खंदारे यांची आहे तर सह निर्मिती हर्षमोहन कृष्णात्रेय यांनी केली आहे. सध्या सिनेमाच्या ट्रेलरमुळे सिनेमाची उत्सुकता वाढली असली तरी या सिनेमावर आपलं जजमेंट देण्यासाठी प्रेक्षकांना 24 मे 2019ची वाट पहावी लागणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
ट्रेलरमधून दिसली तेजश्री प्रधान-मंगेश देसाई यांच्या ‘जजमेंट’ सिनेमाची थरारक झलक Description: ‘जजमेंट’ या थरारपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज केलं गेलं आणि सिनेमाच्या गूढ कथेची उत्सुक्ता निर्माण झाली. अखेर सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला गेलाय आणि त्यातून सिनेमाच्या थराराची जाणीव झाल्या शिवाय राहत नाही.
Loading...
Loading...
Loading...