गर्ल्स सिनेमाचं पोस्टर कॉन्ट्रोवर्सीच्या जाळ्यात, प्रसिद्ध जोडी सलील कुलकर्णी-संदीप खरेने व्यक्त केला निषेध

मराठी पिक्चर बारी
Updated Oct 11, 2019 | 16:45 IST | चित्राली चोगले

गर्ल्स या आगामी सिनेमाचं पोस्टर नुकतंच भेटीला आलं. या मराठी सिनेमाच्या बोल्ड पोस्टरवर चर्चा होतंच होती तेच या सिनेमाचं नवीन पोस्टर रिलीज झालं. या पोस्टरवर मात्र संदीप-सलील या जोडीने निषेध व्यक्त केला आहे.

upcoming marathi film girlz bold poster creates a controversy renowned singer saleel kulkarni conveys his anger through a post
गर्ल्स सिनेमाचं पोस्टर कॉन्ट्रोवर्सीच्या जाळ्यात, प्रसिद्ध जोडी सलील कुलकर्णी-संदीप खरेने व्यक्त केला निषेध  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • गर्ल्स सिनेमाच्या नवीन पोस्टर कॉन्ट्रोवर्सीच्या जाळ्यात
  • प्रसिद्ध जोडी संदीप खरे-सलील कुलकर्णीने व्यक्त केला निषेध
  • सिनेमाच्या टीमने लगेचंच बदललेलं पोस्टर केलं रिलीज

मुंबई: बॉईज आणि बॉईज २ या सिनेमांच्या यशानंतर याच झोनमधला गर्ल्स सिनेमा नुकताच जाहीर झाला. या आगामी मराठी सिनेमा गर्ल्सचं पहिलं पोस्टर देखील नुकतंच भेटीला आलं. सिनेमाचं अतिषय बोल्ड पोस्टर पाहुन अनेकांच्या भुवया उंचावल्या मात्र तरुणाईने या पोस्टरला चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर लगेचंच सिनेमाचं नवीन पोस्टर रिलीज झालं आणि त्यातून सिनेमाची एक गर्ल भेटीला आली. अंकिता लाडे असं तिचं नाव असून तिच्या पोस्टरला देखील संमिश्र प्रतिक्रिया मिळताना दिसल्या. मात्र या पोस्टरने अवघ्या काही वेळातंच रोष ओढावून घेतला ते आयुष्यावर बोलू काहीची प्रसिद्ध जोडी संदीप-सलीलचा.

पोस्टरमध्ये अंकिताने एक टी-शर्ट घातलं आहे ज्यावर आयुष्यावर बोलू काही असं लिहीलं आहे. तर त्या खाली इंग्रजीमध्ये फॅमिली सक्स असं लिहीलं आहे. तसंच अंकिताने हाताने बोल्ड साइनही केल्याचं दिसत आहे.

या सगळ्यावर सलील कुलकर्णीने आक्षेप घेत याच्या निषेधार्त एक पोस्ट टाकली. त्यात तो म्हणाला, “नाते.. आई-बाबा.. घर.. ह्या हळव्या विषयांना हात घालणारा आमचा आणि तुमचा लाडका कार्यक्रम मराठी कविता आणि गाण्यांचा. आयुष्यावर बोलू काही... Just saw this poster. ह्या अभिजात चित्रपटातील ही सुसंस्कृत व्यक्ती familysucks and आयुष्यावर बोलू काही असं लिहिलेलं T-shirt घालून असभ्य हालचाली करते... आपल्या ह्या कार्यक्रमाबद्दल हा आदर?? गेली सोळा वर्ष हाऊसफुल्ल गर्दीत चालू असलेल्या कार्यक्रमाचा असा अपमान? काय विचार असेल ह्यात? आम्ही सर्वजण सलील आणि मित्रमंडळी ह्याचा तीव्र निषेध करतो.”

काही वेळाने यावर संदीप खरेने देखील एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तो म्हणाला, “एखाद्या रसिकप्रिय, चांगले काही देऊ पाहणाऱ्या कार्यक्रमाचा असा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलेला निर्लज्ज उपयोग, तो ही इतक्या हीन पद्धतीत! कीव येते अशा वृत्तीची! निषेध...” या सगळ्यावर त्यानंतर सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. काही वेळातंच सिनेमाच्या टीमने याची योग्य ती दखल घेतली आणि एक नवीन पोस्टर रिलीज केलं गेलं.

थोड्या वेळातंच गर्ल्स या आगामी सिनेमाचं हेच वादग्रस्त पोस्टर नव्याने भेटीला आलं आणि त्यात योग्य तो बदल केला गेला होता. हे पोस्टर सिनेमाच्या ऑफिशिअल पेजवर देखील शेर केलं गेलं आणि त्याचसोबत होता एका संदेश, एक स्पष्टीकरण. या पोस्टरसोबत लिहीलं होतं, “सकाळच्या पोस्टरमुळे काही गैरसमजुती निर्माण होऊन, काही ठिकाणी चुकीचे मेसेज फिरवले जात आहेत. आमचा 'गर्ल्स' हा सिनेमा यूथफुल असला तरी कुटुंबासोबत बघता यावा असा आहे. आम्ही हे पोस्टर कोणालाही दुखावण्याच्या हुतूने बनवलेले नाही. आपण सगळे एका कुटुंबासारखेच आहोत या भावनेने आम्ही नवीन पोस्टर सादर करत आहोत.” सध्या या पोस्टरवर देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विशाल सखाराम देवरुखकर द्वारा दिग्दर्शीत हा सिनेमा येत्या २९ नोव्हेंबर रोजी भेटीला येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी