Khari Biscuit Song: 'बिस्कीट नाव आहे आपला... खारी आपली राजकुमारी आहे...', पाहा भन्नाट गाणं!

मराठी पिक्चर बारी
Updated Aug 14, 2019 | 13:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

खारी बिस्कीट सिनेमाचा टीझर नुकताच भेटीला आला आणि सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. आता या सिनेमाचं एक गोड गाणं रिलीज झालं आहे.

upcoming marathi film khari biscuit’s first song releases on occasion of rakshabandhan
Khari Biscuit Song: रक्षाबंधन निमित्त ‘खारी बिस्कीट’ या आगामी सिनेमातल्या गोजीरवाण्या गाण्याची भेट 

थोडं पण कामाचं

  • खारी बिस्कीट या अगामी मराठी सिनेमाचं गोंडस गाणं भेटीला
  • भाऊ-बहिणीच्या गोजीरवाण्या नात्यावर रेखाटलेला सिनेमा
  • संजय जाधव दिग्दर्शित खारी-बिस्कीट येत्या २७ सप्टेंबर रोजी भेटीला

मुंबई: मराठी सिनेमा खारी-बिस्कीटचा टीझर नुकताच भेटीला आला त्यानंतर सिनेमाची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक हा संजय जाधव असणार असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे सिनेमात एखादी रोमॅण्टिक कथा असणार आणि त्याला संजय जाधव स्टाईल टेकिंग असणार असा अंदाज अनेकांनी बांधला होता. पण आता सिनेमाचं पहिलं-वहिलं गाणं रिलीज केलं गेलय आणि ते पाहून सिनेमाचं वेगळेपण लक्षात येतं. संजय जाधवचा हा सिनेमा त्यांच्या नेहमीच्य सिनेमांपेक्षा वेगळा असणार हे निश्चित. रक्षाबंधनाचं निमित्त साधत या सिनेमातील पहिलं गाणं रिलीज केलं गेलं आहे. ते पाहून छोट्याशा खारी आणि बिस्कीटच्या तुम्ही प्रेमात पडला नाहीत तरंच नवल.

या गाण्यातून सिनेमाच्या कथेचा अंदाज बांधणं तसं सोप्प जातं. सिनेमाची कथा खारी आणि बिस्कीट या भाऊ-बहिणीच्या आणि त्यांच्या भावविश्वाच्या अवती भवती रेखाटलेली आहे. खारीसाठी बिस्कीट आणि बिस्कीटसाठी खारी म्हणजे जीव की प्राण. अवघ्या पाच वर्षांच्या गोंडस खारीची इच्छा म्हणजे आठ वर्षांच्या बिनधास्त बिस्किटसाठी राजकुमारीचा हुकूम असंच म्हणा ना. पण खारी आंधळी असल्या कारणाने हे जग तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. पण तसं असलं तरी ती स्वप्नं बेमालूमपणे पाहते आणि तिची स्वप्न म्हणजे बिस्कीटच्या आयुष्याचा अर्थ आहे. त्याचं आयुष्य जणू या खारीच्या स्वप्नांसाठीच आहे. नुकतंच रिलीज झालेलं गाणं सुरुच होतं ते बिस्कीटच्या डायलॉगपासून, “बिस्कीट...बिस्कीट नाव आहे आपला... खारी आपली राजकुमारी आहे...”

 

 

'लाडाची गं... प्रेमाची गं... एकुलती एक या बिस्कीटाची खारी गं...' या गाण्यात या गोड मुलांची केमिस्ट्री खूप छान रंगून आली आहे. तर गाण्याचे शब्द क्षितिज पटवर्धन यांचे आहेत. संगीतकार सूरज-धीरज या जोडीने या गाण्याला संगीत दिले असून कुणाल गांजावाला यांनी स्वरबद्ध केलं आहे. पदरी गरीबी असली तरी खारीच्या डोळ्यात कधीही पाणी आणू न देण्यासाठी, तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत झटणाऱ्या आणि तिला फुलासारखं जपणाऱ्या बिस्कीटची आणि त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या खारीची ही गोष्ट 'खारी बिस्कीट' येत्या २७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी स्टुडिओज आणि ड्रीमिंग ट्वेन्टी फॉर सेव्हन निर्मित या सिनेमात बिस्कीटची भूमिका आदर्श कदमने केली आहे तर खारी साकारली आहे गोंडस वेदश्री खाडिलकर हिने. याशिवाय सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी