Girlz the Film: गर्ल्स सिनेमाच्या बोल्ड पोस्टरवर 'या' तीन अभिनेत्री

मराठी पिक्चर बारी
Updated Oct 15, 2019 | 01:27 IST | चित्राली चोगले

आगामी मराठी सिनेमा गर्ल्सचं बोल्ड पोस्टर नुकतंच भेटीला आलं व सिनेमाची बरीच चर्चा झाली. नक्की या पोस्टरवर असलेल्या गर्ल्स आहेत तरी कोण याची उत्सुकता निर्माण झाली. अखेर या पोस्टरवर असलेल्या ३ मुली समोर आल्या आहेत

upcoming marathi movie girlz leads finally revealed
Girlz the Film: गर्ल्स सिनेमाच्या बोल्ड पोस्टरवर असलेल्या तीन गर्ल्सचा अखेर उलघडा 

थोडं पण कामाचं

  • 'गर्ल्स' सिनेमाच्या बोल्ड पोस्टरवर असलेल्या तीन गर्ल्सचा अखेर उलगडा
  • तीन नवीन पोस्टरच्या माध्यमातून तिन्ही मुली झाल्या रिव्हील
  • मती, मॅगी आणि रुमीचा 'गर्ल्स' सिनेमा येत्या २९ नोव्हेंबर रोजी भेटीला

मुंबई: मुलींच्या भावविश्वात घेऊन जाणारा मराठी सिनेमा गर्ल्स लवकरच भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचं बोल्ड पोस्टर भेटीला आलं आणि त्यातून सिनेमात तीन गर्ल्स दिसणार हे स्पष्ट झालं. पण या तीन मुली नेमक्या आहेत तरी कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्याबद्दल अखेर उलगडा झाला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. गर्ल्स सिनेमातल्या तिन्ही गर्ल्सबद्दल आणि त्यांच्या सिनेमातल्या कॅरेक्टर्सबद्दल उलगडा होत सिनेमाची तीन नवीन पोस्टर्स भेटीला आली आहेत.

विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'गर्ल्स' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर सिनेमाचं नवीन पोस्टर थोडं वादाच्या भोवऱ्यात सापडलं खरं पण त्यातून भेटीला आली 'मती' अर्थातच अभिनेत्री अंकिता लांडे. अंकिता बॉईज सिनेमाच्या ऑडिशनसाठी आली होती पण त्यावेळी तिची निवड झाली नाही. त्या सिनेमात सहाय्यक म्हणून सिनेमाच्या सेटवर काम केलेली अंकिता अखेर गर्ल्स या सिनेमात मती म्हणून दिसणार आहे.

या सिनेमाच्या पोस्टरमध्ये पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या 'या' मुली कोण?, याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या आणि अखेर हे गुपित उलगडलेय. गर्ल्स मधील 'मती' प्रेक्षकांसमोर आल्यानंतर सिनेमातली दुसरी गर्ल म्हणजेच 'मॅगी'सुद्धा प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज झाली आहे. केतकी नारायण यात 'मॅगी'ची भूमिका साकारत आहे. खरं तर 'मॅगी' दिग्दर्शकांना सहज सापडली नाही. त्यासाठी त्यांना खूपच मेहनत घ्यावी लागली आणि अथक प्रयत्नानंतर त्यांना केतकीच्या रूपात 'मॅगी' सापडली. केतकीची या भूमिकेसाठी निवड झाल्यानंतर काही काळ तिने एक वर्कशॉप केलं. प्रमुख भूमिका असलेला केतकीचा हा पहिला मराठी सिनेमा असला तरी या आधी केतकीने 'युथ' या मराठी सिनेमात भूमिका साकारली आहे. या व्यतिरिक्त तिने अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये, शॉर्ट फिल्म्स मध्येही विविध भूमिका केल्या आहेत.

'मती' आणि 'मॅगी' या दोन व्यक्तिरेखा समोर आल्यानंतर 'रुमी' म्हणजेच अन्विता फलटणकर ही तिसरी 'गर्ल'ही समोर आली. 'रुमी'चा शोध खरंतर पटकन लागला. रुमीच्या भूमिकेसाठी सिनेमाची टीम गोबरे गाल असणाऱ्या हेल्दी मुलीच्या शोधात होती. परंतु ऑडिशन घेऊनही मनासारखी 'रुमी' सापडत नव्हती. तेव्हाच दिग्दर्शक विशालला अन्विता आठवली. तिचं टाईमपास सिनेमातलं काम विशालला लक्षात होतं आणि अखेर ऑडिशन घेऊन रुमी फायनल झाली. 

गर्ल्स या भन्नाट सिनेमाचं लेखन हृषिकेश कोळी यांनी केलं आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि  कायरा कुमार क्रिएशन्स प्रस्तुत 'गर्ल्स' हा सिनेमा येत्या २९ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 'कायरा कुमार क्रिएशन्स प्रॉडक्शनच्या अंतर्गत 'गर्ल्स' या सिनेमाची निर्मिती नरेन कुमार यांची असून, अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी