Dhurala Teaser: ‘पुन्हानिवडणूक’ मागचं कारण स्पष्ट, राजकीय वळणं घेत मल्टीस्टारर धुरळा सिनेमाचा रंजक टीझर भेटीला

मराठी पिक्चर बारी
Updated Nov 20, 2019 | 23:48 IST | चित्राली चोगले

‘पुन्हानिवडणूक’ असा हॅशटॅग असलेल्या अनेक ट्विट्स काही मराठी कलाकारांनी केली, ज्यावर बराच वाद झाला. अखेर या मागचं खरं कारण समोर आलं असून ते फारंच रंजक आहे हे निश्चित. या मागे कारण होतं धुरळा हा सिनेमा, पाहा टीझर

upcoming marathi multi starrer political drama dhurala sneak peak check the intriguing teaser now
Dhurala Teaser: ‘पुन्हानिवडणूक’ मागचं कारण स्पष्ट, राजकिय वळणं घेत मल्टीस्टारर धुरळा सिनेमाचा रंजक टीझर भेटीला  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • ‘पुन्हानिवडणूक’ या हॅशटॅग मागचं खरं कारण अखेर झालं उघड
  • संभ्रमात टाकणारे ट्विट्स आगामी मराठी सिनेमा 'धुरळा'चा देत होते इशारा
  • मल्टीस्टारर 'धुरळा' सिनेमाचा रंजक टीझर भेटीला

मुंबई: ‘पुन्हानिवडणूक’ असा हॅशटॅग असलेले अनेक ट्विट्स काही मराठी कलाकारांनी केले आणि सोशल मीडियावर भलतीच चर्चा रंगली. सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव आदी लोकप्रिय आणि आघाडीच्या कलाकारांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंवरुन अशी ट्विट्स नुकतीच झाली आणि त्याला वेगळंच राजकीय वळण लागलं. सोशल मीडियावर यावर समिश्र प्रतिक्रिया उमटल्या. राजकीय पक्षांनी सुद्धा या वादात उडी घेतली. यावर बराच अंदाज लावला गेला पण ठोस असं काही समोर आलं नाही. अखेर या मागचं खरं कारण स्पष्ट झालं आहे आणि ते फारंच रंजक आहे.

सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बघता पुन्हा निवडणूक होणार का? हा प्रश्न सर्वांना पडलेला असताना आणि ‘पुन्हा निवडणूक’ अशा ट्विट्सवर बरीच चर्चा रंगली असतानाच मराठी सिनेसृष्टीत एक टीझर भेटीला आला आहे. लवकरच थिएटरमध्ये निवडणुकांचा माहोल रंगणार आहे असं दिसत आहे कारण समीर विद्वांस दिग्दर्शित आणि क्षितिज पटवर्धन लिखित धुरळा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा धमाकेदार टीझर नुकताच भेटीला आला असून नुकत्याच केलेल्या संभ्रमात पाडणाऱ्या ट्विट्समागे हेच कारण होतं हे स्पष्ट झालं आहे.

धुरळा या राजकीय सिनेमात मराठी सिनेसृष्टीतले अनेक लोकप्रिय कलाकार एकत्र पाहायला मिळणार आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या धुरळा सिनेमाच्या टीजरवरून सिनेमा ग्रामीण भागातील राजकारणावर आधारित असल्याचं लक्षात आल्याशिवाय राहत नाही. सिनेमात अनुभवायला मिळणारा राजकीय डावपेच सिनेमातील टीझर अगदी ठामपणे अधोरेखीत करतो. तसंच सिनेमातील रंजक ट्विस्ट सुद्धा अगदी थोडक्यात टीझरमध्ये दाखवले गेले आहेत. काही सेकंदांच्या या टीझरमध्ये अजून एक गोष्ट अगदी भाव खाऊन जाते आणि ती म्हणजे प्रत्येक पात्राची एन्ट्री. धुरळा हा मल्टीस्टारर सिनेमा असला तरी सिनेमात प्रत्येक पात्र आपलं वेगळेपण दर्शवणार हे सध्या तरी टीझर सांगतो आहे. तसंच होतं का ते पहावं लागेल.

सध्या सिनेमाच्या टीझरला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. धुरळा या राजकीय डावपेच असलेल्या सिनेमात अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, उमेश कामत, अल्का कुबल, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक आदी कसलेल्या कलाकारांची फौज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. समीर विद्वांस दिग्दर्शित आणि क्षितिज पटवर्धन लिखित धुरळा सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओजने केली असून हा सिनेमा नव्या वर्षात ३ जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी