ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं निधन 

मराठी पिक्चर बारी
Updated Dec 17, 2019 | 22:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shriram Lagoo: ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या ९२व्या वर्षी डॉ. श्रीराम लागू यांचं निधन झालं असून त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

vereran actor dr shriram lagoo is no more pune hospital maharashtra entertainment news marathi
ज्येष्ठ अभिनेते डॉ श्रीराम लागू यांचं निधन   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वृद्धापकाळाने निधन
  • वयाच्या ९२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • डॉ. श्रीराम लागू यांच्यावर गुरुवारी होणार अंत्यसंस्कार

पुणे: ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं आहे. पुण्यातील राहत्या घरी डॉ. श्रीराम लागू यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी त्यांच्या पार्तिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाच्या वृत्ताने सिने जगतात एक शोककळा पसरली आहे. डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक सिनेमा, नाटक, मालिकांत अभिनय केला आहे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांची मनं जिंकली आहेत. केवळ मराठीच नाही तर हिंदी, गुजराती चित्रपटांतही डॉ. श्रीराम लागू यांनी अभिनय केला आहे. 

मेहनती, अभ्यासू अभिनेता अशी डॉ. श्रीराम लागू यांची ओळख होती. त्यांनी अभिनय केलेल्या सिनेमांपैकी 'पिंजरा', 'सिंहासन', 'सामना' हे सिनेमा खूपच गाजले. या सिनेमात त्यांनी केलेल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. या सिनेमातील त्यांची भूमिका आजही सर्वांच्या स्मरणात आहे.

यासोबतच डॉ. श्रीराम लागू यांनी अभिनय केलेले 'नटसम्राट', 'गिधाडे', 'सूर्य पाहिलेला माणूस', 'कन्यादान' या नाटकांमधील त्यांच्या भूमिका खूपच गाजल्या. डॉ. श्रीराम लागू यांचं 'लमाण' हे आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे.

डॉ. श्रीराम लागू यांच्या अभिनयाची दखल घेत त्यांना फिल्मफेअर पुरस्कार, कालिदास सन्मान पुरस्कार, राजश्री शाहू कला गौरव पुरस्कार, मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनानंतर प्रकाश जावडेकर, राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई यांच्यासह इतरही नेत्यांनी, कलाकारांनी दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी