मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन 

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे आज सकाळच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ९० दशकात त्यांनी अनेक सिनेमांमध्ये आपली छाप सोडली होती. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Avinash Kharshikar
अविनाश खर्शीकर यांचं निधन  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन
  • हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने झालं निधन
  • मराठी सिनेसृष्टीवर पसरली शोककळा

ठाणे: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे आज (८ ऑक्टोबर) सकाळी निधन झाले. (avinash kharshikar passes away) त्यांनी ठाण्यातील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रकृती ठीक नव्हती. त्यातच आज हृदयविकाराचा तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या सहज सुंदर अभिनयाने अविनाश खर्शीकर यांनी प्रेक्षकांना आपलंस केलं होतं. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर (Marathi Cinema Industry) शोककळा पसरली आहे. 

दरम्यान, त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे हिने ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे. 

अविनाश खर्शीकर यांनी 'बंदिवान मी या संसारी' या चित्रपटाद्वारे त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. १९७८ साली त्यांनी या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेता म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली. मराठी सिनेसृष्टीत ९०च्या दशकातील एक दिग्गज कलाकार म्हणून त्यांची ओळख होती. 

सिनेसृष्टीप्रमाणेच रंगभूमीवर देखील त्यांनी आपली छाप सोडली. तुझं आहे तुझ्यापाशी, वासूची सासू' यासारखी त्यांची अनेक नाटके गाजली. त्यांचं, झोपी गेलेला जागा झाला... या नाटकाने तर अनेक विक्रम मोडीत काढले.  सौजन्याची ऐशीतैशी, लफडा सदन, अपराध मीच केला. यासारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी काम केलं होतं.  

आधार, आई थोर तुझे उपकार, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार अशा अनेक चित्रपटामधून देखील त्यांनी काम केलं होतं. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, प्रशांत दामले यांच्यासह अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं होतं.९० च्या दशकातील चॉकलेट हिरो म्हणून त्यांची ओळख होती. 

याशिवाय छोट्या पडद्यावर सर्वाधिक गाजलेली मालिका दामिनीमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. त्यामुळे नाटक, सिनेमा आणि मालिका यामध्ये अविनाश खर्शीकर यांचा लिलया वावर होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी