Ravi Patwardhan: ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन, हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड 

Ravi Patwardhan Passed away: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं आज (६ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास निधन झाले. 

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन
Ravi Patwardhan: ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन, हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड   |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं निधन
  • मराठी सिनेसृष्टीतील अनेकांनी व्यक्त केला शोक
  • रवी पटवर्धन यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केली कलेची उपासना

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन (Ravi Patwardhan) यांचं आज (६ डिसेंबर) वृद्धापकाळाने निधन झाले. सिनेसृष्टीत आपल्या भारदस्त व्यक्तीमत्वाचा दरारा असणाऱ्या रवी पटवर्धन यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कलेची उपासना केली. गेल्या काही दिवसांपर्यंत ते मनोरंजन क्षेत्रात सक्रीय होते. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर आज पहाटे त्यांनी आपल्या ठाण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मराठी सिनेसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे.

रवी पटवर्धन यांनी मराठी चित्रपटांसह शेकडो नाटकांमधून देखील काम केलं होतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते कला क्षेत्रात कार्यरत होते. छोट्या पडद्यावरील अग्गंबाई सासूबाई या झी मराठीवरील प्रसिद्ध मालिकेत त्यांनी बबड्याच्या आजोबाची भूमिका केली होती. ६ सप्टेंबर १९३७ साली पवी पटवर्धन यांचा जन्म झाला होता. अनेक मराठी सिनेमांमध्ये त्यांनी ग्रामीण भागातील व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. त्यांच्या भारदस्त व्यक्तीमत्वाला साजेशा अनेक व्यक्तीरेखा त्यांनी पडद्यावर साकारल्या होत्या. याशिवाय त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये देखील काम केलं होतं. अनेकदा त्यांनी खलनायकाची भूमिका देखील साकारल्या होत्या. 

सुरुवातीच्या काळात ते मुंबईतील रिझर्व्ह बँकेत नोकरी करत होते. याचवेळी त्यांनी आपली नोकरी सांभाळून नाटक आणि चित्रपटात काम करण्याची हौस भागवली. त्यांनी आतापर्यंत २०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं होतं. तर १५० पेक्षा जास्त नाटकं देखील केली होती. दरम्यान, रवी पटवर्धन हे अविवाहित होते. आपल्या आईची सेवा करण्यासाठी त्यांनी लग्न केलं नव्हतं. त्यामुळे ते गेली काही वर्ष एकटेच राहत होते. मात्र असं असलं तरीही त्यांनी शेवटपर्यंत आपली कलेची उपासना कायम ठेवली होती. 

रवी पटवर्धन यांनी आजवर अनेक नाटकांमध्ये अजरामर भूमिका केल्या होत्या. एकच प्याला, आरण्यक, मला काही सांगायचंय, आनंद, अपराध मीच केला यासारखी अनेक नाटकं त्यांनी केली होती. तर उंबरठा, सिंहासन, बिनकामाचा नवरा यासारख्या गाजलेल्या मराठी सिनेमांमधून देखील त्यांनी काम केलं होतं. तर तेजाब, नरसिंह, प्रतिघात, अंकुश अशा हिंदी सिनेमांमध्ये देखील त्यांनी काम केलं होतं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी