#पुन्हा निवडणूक? 'या' कलाकारांकडून ट्वीट, फुटलं मोठ्या वादाला तोंड

मराठी पिक्चर बारी
Updated Nov 15, 2019 | 21:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

#पुन्हा निवडणूक? असं ट्वीट करुन काही मराठी कलाकारांनी एका वादाला तोडं फोडलं आहे. त्यामुळे आता यावर बरीच चर्चा सुरु झाली आहे.

vidhansabha election controversy over twitter messages from sai sonali siddhartha congress directly accuses bjp
#पुन्हा निवडणूक? 'या' कलाकारांकडून ट्वीट, फुटलं मोठ्या वादाला तोंड  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • कलाकारांच्या 'त्या' ट्वीटनंतर सुरु झाला मोठा वाद
  • सोनाली, सई, अकुंश आणि सिद्धार्थने का केलं 'हे' ट्वीट
  • कलाकारांच्या ट्वीटनंतर काँग्रेसचा थेट भाजपवर आरोप

मुंबई: एकीकडे सत्तास्थापनेच्या तिढ्यावरुन राज्यात थेट राष्ट्रपती राजवट सुरु झालेली असताना आता थेट #पुन्हा निवडणूक? हा हॅशटॅग सोशल मीडियावर दिसू लागला. पण आता या हॅशटॅगमुळेच वाद निर्माण झाला आहे. कारण या हॅशटॅगला मराठीतील दिग्गज कलाकारांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे काँग्रेसने त्यावर आक्षेप घेत टीका सुरु केली आहे. तसंच भाजपच्या आयटीन सेलने कलाकारांना हाताशी धरुन हा सर्व प्रकार सुरु केल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला भाजप विरुद्ध काँग्रेस असं वळण लागलं आहे. 

मराठी सिनेसृष्टीत कायम चर्चेत असणारे कलाकार सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन #पुन्हा निवडणूक? हा हॅशटॅग ट्वीट केला आहे. पण या हॅशटॅग पुढे त्यांनी काहीही लिहलेलं नसल्याने सध्याच्या राजकीय परिस्थितीत या कलाकारांनी असं ट्वीट नेमकं का केलं असावं? अशी चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे अशाप्रकारचं ट्वीट केल्याने या कलाकारांवर टीका देखील सुरु झाली आहे. तर काही जणांनी त्याला पाठिंबा देखील दिल्याचं दिसून येत आहे. 

याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी कलाकारांवर जोरदार टीका केली आहे. तसंच राजकीय परिस्थिती गंभीर असताना कलाकारांना हाताशी धरुन भाजप नवं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 'कलाकारांना अनेक जण फॉलो करत असतात. त्यामुळे त्यांच्या मतांचा परिणाम हा अनेक जणांवर होतो. त्यामुळे त्यांनी सध्याच्या परिस्थितीत असं ट्वीट करणं योग्य नाही. याबाबत आम्ही त्यांच्याकडून स्पष्टीकरण देखील मागितलं आहे. पण त्यांनी कोणतंही स्पष्टीकरण अद्याप दिलेलं नाही.' असं सचिन सावंत यावेळी म्हणाले.

 

 

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील या संपूर्ण प्रकाराबाबत टीका केली आहे. 'काही कलाकारांनी #पुन्हानिवडणूक हा ट्विटर ट्रेंड सुरू केला आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी जनतेची माफी मागावी. कलाकारांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचं भान ठेवावं. या ट्रेंडमुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.' असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

 

 

मात्र, असं असलं तरीही या कलाकारांनी आपलं ट्वीट अजूनही डिलीट केलेलं नाही. त्यामुळे हे ट्वीट त्यांनी नेमकं कशासाठी केलं आहे याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, दुसरीकडे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की, एखाद्या सिनेमाचं प्रमोशन म्हणून कलाकारांनी हे ट्वीट केलेलं असू शकतं. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आता या प्रकरणी कलाकार आपली भूमिका स्पष्ट करणार का? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी