'रानबाजार' नंतर 'मी पुन्हा येईन', नव्या राजकीय नाट्याची OTT वर मेजवानी

प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर मी पुन्हा येईन ही नवी वेब सीरीज घेऊन येत आहे. या वेबसीरीज नुकताच टीझर देखील प्रदर्शित झाला आहे.

web series titled mi punha yein based on power politics will be aired soon
'रानबाजार' नंतर 'मी पुन्हा येईन', नव्या राजकीय नाट्याची OTT वर मेजवानी  
थोडं पण कामाचं
  • लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर 'मी पुन्हा येईन' वेबसीरीज
  • राजकीय नाट्य असलेली नवी वेबसीरीज येणार प्रेक्षकांच्या भेटीला
  • 'मी पुन्हा येईन' वेबसीरीजचा टीझर प्रदर्शित

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणानं (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांत मोठे भूकंप पाहिले, शेवटपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की काय होईल, एखाद्या सस्पेंस सिनेमापेक्षाही जबरदस्त असा क्लायमॅक्स सगळ्यांनी पाहिला. राजकीय घडामोडींच्या या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडणार आहे. लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर (OTT) सत्तानाट्यावर आधारित 'मी पुन्हा येईन' (Mi Punha Yein) नावाची वेबसीरिज येणार आहे. 

अरविंद जगताप यांचे लिखाण आणि दिग्दर्शन असलेल्या या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी, गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली आहे. या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिका जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  

अधिक वाचा: ‘मी पुन्हा येईन'च्या नादात भाजपकडून जनतेचा जीव धोक्यात :  अतुल लोंढे

टीझरमध्ये दोन पक्षाचे नेते सत्तेसाठी आमदारांची कशी पळवापळवी, फोडाफोडी करत आहेत, हे दिसत आहे. एवढेच नाही तर शासकीय यंत्रणांचाही कसा बेमालूमपणे वापर केला जातो आणि अधिकारीवर्गही यात आपली पोळी कशी भाजून घेतात, हे या टीझरमधून कळतंय. 

राजकारणावर आधारित या वेबसीरिजमध्ये सत्तालोलूपता, कपट-कारस्थान, संधीसाधूपणा, आमदारांची मेगाभरती, फोडाफोडी, पळवापळवी आणि सध्या चर्चेत असलेलं 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' असा सगळा मसाला पाहायला मिळणार आहे. 

अधिक वाचा: Devendra Fadnavis: या दिवशी फडणवीस 'पुन्हा येणार', तारीख ठरली !

'मी पुन्हा येईन' या वेबसीरिजबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, 'सध्याच्या राजकीय घडामोडींचा आणि या सीरीजचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, पण, सिनेमात किंवा वेबसीरीजमध्ये तेच पाहायला मिळतं जे आपल्या आजुबाजूला घडतं. त्यामुळे अगदीच असत्य घटनांवर आधारित ही वेबसीरीज असली तरी, राजकीय कुलंगड्या, शह-काटशह हे पाहण्यात प्रेक्षकांना रस असतो हे स्पष्ट आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हीच गरज 'मी पुन्हा येईन' ही वेबसीरीज पूर्ण करेल'

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत 'मी पुन्हा येईन' हे वाक्य बरंच गाजलं होतं. निवडणूक निकालानंतर तर या एकाच वाक्याभोवती सारं राजकारण फिरलं. त्यामुळेच हाच धागा पकडून आता नवी वेब सीरीज आपल्याला आता पाहायला मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी