हाऊसफुलचे बोर्ड झळकवत 'खारी बिस्कीट' ठरतोय बॉक्स ऑफिसवर हिट

मराठी पिक्चर बारी
Updated Nov 05, 2019 | 23:15 IST | चित्राली चोगले

चिमुरड्या भावंडांची जोडगोळीचा खारी बिस्कीट सिनेमा नुकताच भेटीला आला. रिलीजनंतर अवघ्या काही दिवसात सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कामगिरी करताना दिसत आहे. सिनेमा सगळीकडे लोकप्रियता कमवताना दिसत आहे.

with numerous houseful shows latest marathi release khari biscuit becomes a hit at box office
हाऊसफुलचे बोर्ड झळकवत 'खारी बिस्कीट' ठरतो आहे बॉक्स ऑफिसवर हिट 

थोडं पण कामाचं

  • 'खारी बिस्कीट' सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड
  • हाऊसफुलचे बोर्ड झळकवत सिनेमाला मिळवतोय प्रेक्षकपसंती
  • खारी आणि बिस्कीटने कायम केली प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा

मुंबई: खारी बिस्कीट सिनेमा जाहीर झाल्यापासून बराच चर्चेत आहे. सिनेमाच्या नावापासूनच सिनेमाची चर्चा रंगली आणि अखेर खारी बिस्कीट हा दोन चिमुरड्या भावंडांची जोडगोळी असलेला सिनेमा असल्याचं स्पष्ट झालं. सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यामुळे सिनेमाची उत्सुकता प्रचंड वाढली. अखेर बऱ्याच प्रतिक्षेनंतर सिनेमा भेटीला आला आणि अगदी रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनंच सिनेमा प्रेक्षकपसंती मिळवण्यात यश मिळवत आहे. झी स्टुडिओज निर्मित आणि संजय जाधव दिग्दर्शित खारी बिस्कीट हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होताच रसिकांनी चित्रपटगृहांवर एकच गर्दी करत यावर आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली.

बॉक्स ऑफिसवर खारी बिस्किटची गोड जोडी त्यांच्या सोबतच रिलीज झालेल्या इतर सर्व हिंदी आणि इंग्लिश सिनेमांपेक्षा वरचढ ठरली आहे. आधी रिलीज झालेल्या मोठ मोठ्या मल्टीस्टारर सिनेमांना मागे टाकत खारी बिस्कीटने सर्वत्र हाऊसफुलचे बोर्ड झळकावत बॉक्स ऑफिसवर पार धुरळा उडवून दिला आहे. थिएटरमधून बाहेर पडणारा प्रत्येक प्रेक्षक भारावून गेल्याच्या तसेच खारी व बिस्कीटच्या म्हणजेच वेदश्री आणि आदर्शच्या अभिनयाबद्दल भरभरून आपल्या भावना व्यक्त करतायत. या गोंडस जोडीने प्रेक्षकांच्या मनात अवघ्या काही दिवसातंच घर केलं आहे. या चिमुरड्यांच्या अभिनयाची बरंच कौतुक होताना सुद्धा दिसत आहे.


खारी बिस्कीटची गाणी, ट्रेलर आणि टीझर आल्या दिवसापासूनच सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत होते. 'लाडाची गं' आणि 'तुला जपणार आहे' या गाण्यांनी तर, टिकटॉक, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर व्हायरल होत नवनवीन उच्चांक गाठले. सोशल मीडियावर खारी बिस्कीटच्या गाण्यांना आणि ट्रेलरला तब्बल २.५ कोटी व्ह्यूव्ज मिळाले आहेत. या सगळ्याचा खूप चांगला परिणाम सिनेमासाठी झाला आणि ओपनिंगलाच तीनशेहून जास्त चित्रपटगृहाची मागणी झाली होती. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता पहिल्या दोनच दिवसात सिनेमाच्या शोजची मागणी कमालीची वाढली आहे. 


सिनेमाचा विषय, त्याची कथा, त्याची मांडणी, त्यातील सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय, संवाद, संगीत आणि कॅमेरातून टिपलेली मुंबई तरुणाईला आकर्षित करत आहे आणि म्हणूनच तरुण वर्ग सिनेमागृहात मोठ्या संख्येने गर्दी करत आहे. मुंबईच्या अलका क्षिरसागर यांनी तर खारी बिस्कीट हा एक अफलातून मनोरंजक अनुभव असल्याचं सांगितलं. तसेच सिटी प्राईड कोथरुड येथे मनीषा बर्वे आपल्या मैत्रिणींसोबत वयाची साठी अतिशय उत्साहात खारी बिस्कीटचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहत साजरी करायला आल्या होत्या. या आणि अशा अनेक रसिकप्रेक्षकांनी सिनेमाला मनापासून दाद दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रसह गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशमध्येही खारी बिस्कीट मराठी सिनेमाचा झेंडा फडकावत आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहिला नसेल तर जवळच्या चित्रपटगृहात हा गोंडस सिनेमा नक्की पाहा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी