नाचायला भाग पाडणारे मराठमोळे “I am the Girl”

मराठी पिक्चर बारी
Updated Nov 05, 2020 | 15:17 IST

एक जमाना होता जेव्हा लोक पार्टी म्हटली की हमखास इंग्लिश गाणी लावूनच थिरकायचे. उडत्या चालीची फास्ट बीट वरची गाणी लावली की त्यांना नाचायचा मूड यायचा.

थोडं पण कामाचं
  • ज्यांना नाचायला आवडते त्यांच्यासाठी आणि ज्यांना नाचाचं वावडं आहे त्यांच्यासाठीही, थोडक्यात सर्वांसाठीच घेऊन आले आहे ध्रुवी फिल्म्स पुणे नवे व्हिडीओ सॉंग!  
  • एक जमाना होता जेव्हा लोक पार्टी म्हटली की हमखास इंग्लिश गाणी लावूनच थिरकायचे.
  • उडत्या चालीची फास्ट बीट वरची गाणी लावली की त्यांना नाचायचा मूड यायचा.

पुणे : एक जमाना होता जेव्हा लोक पार्टी म्हटली की हमखास इंग्लिश गाणी लावूनच थिरकायचे. उडत्या चालीची फास्ट बीट वरची गाणी लावली की त्यांना नाचायचा मूड यायचा. थोडक्यात आपल्या सेलिब्रेशनला आपली भाषा कधीच नसायची! त्याला अपवाद ठरू पाहातेय ते एक नवे कोरे मराठमोळे गाणे : ‘I am the Girl’. ज्यांना नाचायला आवडते त्यांच्यासाठी – आणि ज्यांना नाचाचं वावडं आहे त्यांच्यासाठीही- थोडक्यात सर्वांसाठीच घेऊन आले आहे ध्रुवी फिल्म्स पुणे नवे व्हिडीओ सॉंग!  

ढोलकीच्या तालावर फेम नृत्यांगना सायली पराडकर ही यात प्रमुख भूमिकेत आहे. श्याम ठोंबरे सहाय्यक भूमिकेत आहे. नवोदित गायिका निधी हेगडे, आयरिन झेविअर आणि विनीत देशपांडे यांनी ते गायले आहे. युवा संगीतकार विनीत देशपांडे याने ते संगीतबद्धदेखील केले आहे. गीतलेखन प्राजक्ता गव्हाणे हिने केले तर नृत्यरचना अवधूत चव्हाण याची आहे. प्राण शिरूरकर यांची सिनेमॅटोग्राफी,  रंगभूषा प्रियांका रामपुरे, विशाखा साळुंखे, वेषभूषा विदिशा अमदाबादे यांची आहे. प्रसिद्धी आणि मार्केटिंगची जबाबदारी राजू अनासपुरे (अनासपुरे फिल्म पब्लिसिटी अँड मिडिया) सांभाळत आहेत. निर्मिती- संकलन- दिग्दर्शनाची धुरा रोहन सदाशिव शिंगाडे यांनी सांभाळली आहे. 

दिग्दर्शक रोहन सदाशिव शिंगाडे म्हणतात की “मी आजवर अनेक गाणी बनवली पण हे गाणे माझ्यासाठीच एक आव्हान होते. रेकॉर्डिंग मार्चमध्ये केले आणि लगेच लॉकडाऊन सुरु झाला. कलाकारांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागतंय, मीही त्याला अपवाद नव्हतो. असो. छाया प्रकाशाचा वेगळाच खेळ करून या गाण्याचं शूटिंग मी केलंय. गाणं ऐकू तर मराठी येतंय पण त्याचा ताल आणि गेटप पूर्णपणे वेस्टर्न आहे. आजवर ज्यांनी ज्यांनी ऐकलं- पहिलं त्या त्या प्रत्येकाने पहिली प्रतिक्रिया दिली की ‘पटकन नाचावसंच वाटतं या गाण्यावर!... अजून काय पाहिजे!’ “


आपल्या नाचाची आपली भाषा सांगणारं ‘I am the Girl’ सर्वांनाच ताल धरायला भाग पाडणार असं दिसतंय. सर्व प्रमुख संगीत टीव्ही चॅनेल्स, Dhruvi Films Pune या Youtube चॅनेलवर आणि मराठी म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर हे गाणे उपलब्ध झाले आहे असे टीमकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी