Marathi Upcoming Movie: वैभव, संकर्षण, आलोक आणि प्राजक्ता 'तीन अडकून सीताराम' मधून एकत्र झळकणार

Marathi Move Poster Launched: दुनिया गेली तेल लावत अशी टॅगलाईन असलेल्या 'तीन अडकून सीताराम' या आगामी चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित. चित्रपटाच्या पोस्टरने आणि नावाने वाढवली उत्सुकता.

Updated Sep 5, 2023 | 04:13 PM IST

Marathi Upcoming Movie Tin Adkun Sitaram

'तीन अडकून सीताराम' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित

Tin Adkun Sitaaram असा हटके नावाचा मराठी चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच यात नेमकं काय आहे, याविषयी अनेकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. या उत्सुकतेचे प्रमुख कारण म्हणजे, या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी हे मराठी सिनेसृष्टितले प्रसिद्ध चेहरे प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहेत.
नुकताच या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा पोस्टर देखील त्याच्या नावाप्रमाणे हटके दिसून येत आहे. या पोस्टरमध्ये वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे आणि आलोक राजवाडेच्या यांच्या हातात बेड्या असून, त्यांची साथीदार प्राजक्ता माळी देखील यात दिसत आहेत. तीन अडकून सीताराम या नावासोबत या पोस्टरचा नेमका काय संबंध आहे, याचे उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळेल.
हृषिकेश जोशी लिखित, दिग्दर्शित 'तीन अडकून सीताराम' हा चित्रपट सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत असून, यामध्ये अनेक बिलंदर कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटात गौरी देशपांडे, आनंद इंगळे, समीर पाटील, विजय निकम आणि हृषिकेश जोशी यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत.
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक हृषिकेश जोशी म्हणतात, '' हा एक कमाल विनोदी आणि कौटुंबिक चित्रपट असून प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम मुळात भन्नाट आहे. कलाकार, निर्माते, संगीत टीम अशा सगळ्याच गोष्टी उत्तम जुळून आल्या आहेत. आम्ही आमच्या बाजूने प्रेक्षकांना शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे. आता आम्हाला प्रतीक्षा आहे ती प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची.''
ताज्या बातम्या
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited