Dhadak Movie Review in Marathi: इशान-जान्हवीसाठी पहावा धडक

रिव्ह्यू टाइम
Updated Jul 20, 2018 | 11:36 IST | टाइम्स नाऊ हिंदी
Critic Rating:

Dhadak Movie Review : बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर धडक या सिनेमाद्वारे पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर पाऊल टाकत आहे. शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. मात्र हे दोघेही आपली ही ओळख हटवून स्वत:ला सिद्ध करतील...जाणून घ्या हा रिव्ह्यू..

dhadak
धडक सिनेमा 

मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा रिलीज झाला आणि त्याने संपूर्ण मराठीसिनेसृष्टीचा इतिहास बदलला. आजवर मराठी सिनेसृष्टीत कोणत्याच सिनेमाने इतके अमाप यश मिळवले नव्हते जितके सैराटने मिळवला. हा सिनेमा सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरला. या सिनेमाला इतके प्रचंड यश मिळाले की बॉलिवूड तसेच परदेशातही या सिनेमाने आपली दखल घ्यायला भाग पाडले. याच सिनेमाचा हिंदी रिमेक आहे धडक. आता ज्यांनी सैराट हा सिनेमा पाहिला असेल तर त्यांच्यासाठी धडक हा सिनेमा काही तितकेसे वेगळे घेऊन येत नाही मात्र जान्हवी आणि इशानसाठी अनेकजण हा सिनेमा पाहतील. 

सैराटच्या तुफान यशानंतर या सिनेमाच्या हिंदी रिमेकचे शिवधनुष्य उचलण्याची ताकद दिग्दर्शक शशांक खेतान यांनी दाखवली. धडक सिनेमा पाहता शशांक यांनी ही जबाबदारी लीलया पेलल्याचे दिसत आहे. धडक सिनेमाच्या ट्रेलरपासून ते गाण्यापर्यंत याची सैराटशी तुलना झाली मात्र काही गोष्टीत हा सिनेमा निराळेपण दाखवतो.

हा सिनेमा सैराटची जागी घेणं तर शक्य नाही मात्र शशांक खेतान यांनी केलेल्या प्रयत्नाचे येथे कौतुक करावेसे वाटते. या सिनेमात इशान खट्टरपेक्षा चर्चा रंगली ती जान्हवीच्या अभिनयाची. श्रीदेवीची मुलगी असल्याने साहजिकच तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि अपेक्षेप्रमाणेच जान्हवी या परीक्षेत खरी उतरली आहे. पहिला सिनेमा असूनही ती या सिनेमात अजिबात नवखी असल्याचे जाणवत नाही. तिने सहजरित्या अभिनय केला आहे. तसेच इशानचेही. खरंतर हा इशानचा हा दुसरा सिनेमा त्यामुळे त्याला जर कोणी बियॉंड्स द क्लाऊडमध्ये पाहिले नसेल तर नक्कीच त्यांना या सिनेमातील इशानचा अभिनय आवडेल.

कशी आहे जान्हवी कपूर

जितका सहज अभिनय जान्हवीने या सिनेमात केलाय असे काम फार कमी नवोदित कलाकार करतात. हे म्हणणे का गरजेचे आहे कारण धडक एक साधीशी कहाणीचा सिनेमा आहे नाहीतर अनेकदा कलाकारंची मुले ही नेहमी एका पॅकेजसह लाँच होतात. यासोबतच आशुतोष राणासारख्या मुरब्बी कलाकारासोबत तिची केमिस्ट्रीही चांगली दिसून येते. आपल्या आईवडिलांची लाडकी लेक जेव्हा आईला भेटण्यासाठी आतुर असते त्यावेळी जान्हवीच्या चेहऱ्यावरचे भाव कमाल दिसतात.

 

 

इशान आणि सिनेमा

इशानला या आधी अनेकांनी बियॉन्ड्स द क्लाऊडमध्ये पाहिले असेल. आपल्या पहिल्याच सिनेमात त्याने सुंदर अभिनय साकारला होता. त्यानंतर धडकमध्येही त्याच्या अभिनयाची स्तुती करण्यासारखीच आहे. 

आशुतोष राणा आणि बाकी कलाकार

आशुतोष राणा यांच्या वाट्याला जे सीन्स आले ते त्यांनी फार खुबीने साकारले आहेत. एका सीनमध्ये जेव्हा ते डोळ्यांनी इशारा करत जान्हवीला हसण्यास सांगतात तेव्हा त्यांचे डोळ्यांचे भाव तर आहाहा...दरम्यान, त्यांना आणखी काही सीन्स देता आले असते...असो. जान्हवीच्या बहिणी तसेच इशानच्या मित्रांची भूमिका साकारलेल्या कलाकारांनीही चांगला अभिनय केला आहे. 

छोट्या शहरांची कहाणी

दिग्दर्शक शशांक यांनी हम्प्टी शर्मा आणि बद्रीनाथ की दुल्हनिया या दोन्ही सिनेमांमध्ये छोट्या शहरांची कहाणी सांगितली होती. धडकमध्येही तर ते मास्टर स्टोरीटेलर वाटतात कारण या सिनेमात कोणताही फालतू ड्रामा नाही. या सिनेमात त्यांनी कलाकारांकडून पुरेपूर मारवाडी भाषा बोलवून घेतली आहे.

शशांकचे या गोष्टीसाठी कौतुक करावे लागेल की पहिल्या भागात तीन गाणी आणि सगळं चांगलं गोड गोड असतानाही दुसऱ्या भागात तो प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात काही प्रमाणात यशस्वी ठरलाय. शशांकने या सिनेमात जान्हवी आणि इशानला अजिबात लाऊड होऊ दिले नाही. 

 

 

संगीताला झिंगाट टच

या सिनेमातील सर्वच गाणी याआधी रिलीज झालीत. त्यातील झिंगाट हे गाणे सैराटवर आधारितच आहे. त्यामुळे ज्यांनी सैराट पाहिलाय त्यांना हे गाणे तितकेसे भावणार नाही. या सिनेमाचे टायटल ट्रॅक चांगले झाले आहे. अजय-अतुल यांनी ही गाणी संगीतबद्ध केली आहेत. मात्र त्यात काहीतरी वेगळेपण हवे होते.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी