तेजश्री प्रधान आणि मंगेश देसाईचा जजमेंट सिनेमा भेटीला, वाचा सिनेमाचा आमचा सखोल रिव्ह्यू

रिव्ह्यू टाइम
Updated May 24, 2019 | 11:11 IST | चित्राली चोगले
Critic Rating:

Judgement Marathi Movie Review: सत्य घटनेवर आधारित 'जजमेंट' सिनेमा अखेर भेटील आलाय. तेजश्री प्रधान आणि मंगेश देसाई यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सस्पेन्स थ्रिलर नेमका कसा आहे जाणून घेण्यासाठी वाचा रिव्ह्यू

judgement Marathi Movie review
तेजश्री प्रधान आणि मंगेश देसाईचा जजमेंट सिनेमा भेटीला, वाचा सिनेमाचा आमचा सखोल रिव्ह्यू 

मुंबई: जजमेंट सिनेमा नीला सत्यनारायण यांच्या सत्य घटनेवर आधारित ‘ऋण’ या कांदबरीवर बेतलेला आहे. सिनेमा साटम कुटुंबाच्या अवती भवती रेखाटला आहे. अग्निवेश साटम (मंगेश देसाई) हा एक आयएएस ऑफिसरचं बायकोसोबत दोन मुलींचं कुटुंब असतं पण हा विक्षिप्त माणसाला मुलगा हवा असल्यामुळे कायमंच घरात क्लेश सुरु असतात. अचानक बायको तिसऱ्यांदा गरोदर राहते आणि यंदा तरी मुलगाच झाला पाहिजे असा हट्ट अग्निवेश धरतो. अनधिकृतपणे गर्भाची चाचणी करत या वेळेला सुद्धा मुलगीच जन्माला येणार हे कळताच मात्र अग्निवेशचा पारा चढतो आणि रागाच्या भरात आपल्या बायकोचा जीव त्याच्या हातून घेतला जातो. या सगळ्याची साक्षीदार असते अग्निवेशची 8 वर्षांची मोठी मुलगी ऋतुजा. आयएएस असलेला अग्निवेशला पुरावे नष्ट करुन सुटणं तसं सोप्पं असतं त्यात ऋतुजाला तिचे आजोबा आबा (माधव अभ्यंकर) सांगतात की वडिलांना वाचवण्यासाठी खोटं बोल आणि लहानगी ऋतुजा मनाविरुद्ध तसंच करते. पण याचा परिणाम तिच्या मनावर गोंदला जातो आणि मोठी होत असलेल्या ऋतुजाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. कायम अन्याय बघितलेली ही ऋतुजा अखेर तरुणपणात वकील होण्याचा निर्णय घेते आणि आपल्या आईच्या मर्डरची केस पन्हा एकदा सुरु करुन स्वतः ती लढायचा निर्णय घेते. तरुणपणीची ऋतुजा म्हणजेच तेजश्री प्रधानचा लढा इथेच सुरु होतो. आता या ऋतुजाला न्याय मिळतो का आणि तिला अपेक्षित जजमेंट अखेर लागते का ते लपलय सिनेमाच्या क्लामॅक्समध्ये.

सिनेमाची सुरुवात खूपच उत्तम नोट वर झाली असताना सुद्धा सिनेमाच्या शेवटाकडे पोहचेपर्यंत सिनेमाचा मूळ गाभाच कुठेतरी हरवतो आणि सिनेमापासून आपण तुटत जातो. सिनेमाची कथा जिथे जोर पकडू लागते आणि सिनेमाच्या खऱ्या लढ्याला सुरुवात होते तिथेच माशी शिंकते आणि रटाळ स्क्रीनप्ले आणि भरकटलेल्या एडिटिंगने सिनेमाचा रस संपून जातो. तेजश्री प्रधानने तिच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे आणि सिनेमात अनेक ठिकाणी तिच्या अभिनयाचा कस पहायला मिळतो खरा पण सिनेमाचा खरा हिरो आहे सिनेमाचा व्हिलन म्हणजेज मंगेश देसाई. सिनेमात त्याने कमालीची भूमिका वठवली आहे, त्याचा तिरस्कार करावा इतका त्याचा राग येणं यातंच त्याच्या भूमिकेची उंची लक्षात येते. त्याचसोबत इतर कलाकारांनी देखील त्यांची कामं चोख केली आहेत, खास करुन कोर्टातले कलाकार म्हणजे वकील सतीश सल्लागरे आणि जज महेन्द्र तेरेदेसाई यांच्या भूमिका छान रंगल्या आहेत. पण कलाकारांच्या उत्तम अभिनयाने देखील सिनेमाचा तोच रटाळ स्क्रिनप्ले काही केल्या नजरअंदाज करता येत नाही. त्यात सिनेमाच्या एडिटिंगमध्ये पण खूप घोळ आहेत, मध्येच एखादा सीन अचानक नको तिथे संपतो आणि पुढचा सीन मध्येच कुठेतरी सुरु होता आधीच्या सीनचा काही ताळमेळ नाही किंवा कोणताही संदर्भ नाही. त्यातंच सिनेमा जेव्हा कोर्टात पोहचतो तेव्हा अनेक ठिकाणी उगाचंच आरडा ओरडा केला जातो ज्याची तशी गरज भासत नाही. कोर्टात फक्त आरडा-ओरडाच होतो का असा समज सिनेमा बघताना अनेकदा मनात येतो. तो टाळला असता तर किमान कोर्टातला मुख्य ड्रामा अधिक खुलला असता.

जसजसा सिनेमा पुढे सरकू लागतो तसतसा कथेतला रस संपत जातो आणि क्लायमॅक्सला पोहचेपर्यंत सिनेमा कंटाळवाण्या सदरात मोडलेला असतो. तेजश्री आणि मंगेश यांची जुगलबंदी बघायला खूप छान वाटलं असतं आणि त्या अनुशंगाचे अधिक सीन्स सिनेमात असते तर खरंच या दोन कलाकारांचं अभिनय कौशल्य आणि त्यांच्या अभिनयातला कस छान रंगला असता पण तसं काही होत नाही आणि एखाद्या सीन पुरते हे दोघं एकमेकांसमोर उभे ठाकतात. त्यात किशोरी आंबिये सारखी उत्तम अभिनेत्री सिनेमात अक्षरक्षः वाया गेली आहे कारण तिला फक्त एका सीन पुरते दाखवण्यात आलं आहे ज्याला तसं काहीच महत्त्व नाही सिनेमात. सिनेमाची सुरुवात उत्तम झाली असताना देखील सिनेमाचा हेतू साध्य होत नाही आणि सिनेमा भरकटतो. कलाकारांनी उत्तम कामं करुन देखील सिनेमाला ते वाचवू शकत नाहीत आणि शेवटाकडे सिनेमातला रटाळपणा आणि फसलेला स्क्रिनप्ले प्रकर्षाने समोर येतो. सत्य घटनेवर आधारित कथा आणि त्यात उत्तमोत्तम कलाकार हे सगळं एका हिट सिनेमाची सामग्री होती पण तसं असताना सुद्धा स्क्रिनप्ले, दिग्दर्शन आणि एडिटिंगच्या घोळाने सिनेमाचं खूपंच नुकसान झालंय. सस्पेन्स थ्रीलर म्हणून सिनेमा प्रमोट केला जात असताना मात्र सिनेमात ना सस्पेन्स आहे ना हवं तेवढं थ्रील आणि म्हणूनंच सिनेमा रंजकतेच्या मापदंडात अजिबातंच बसत नाही असंच म्हणावं लागेल.

 

 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी