‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूचा ‘कागर’ अखेर भेटीला, या सिनेमाचा आमचा सविस्तर रिव्ह्यू चुकवू नका

रिव्ह्यू टाइम
Updated Apr 26, 2019 | 13:13 IST | चित्राली चोगले
Critic Rating:

‘कागर’ या रिंकू राजगुरूच्या कमबॅक सिनेमाबद्दल फारच उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर तो रिलीज झाला आहे पण हा मच अवेटेड सिनेमा अपेक्षेच पात्र ठरतो का ते जाणून घेण्यासाठी या सिनेमाचा आमचा हा रिव्ह्यू चुकवू नका.

Rinku Rajguru’s Kaagar's detailed review
रिंकू राजगरुच्या ‘कागर’चा विस्तृत रिव्ह्यू खास तुमच्यासाठी  |  फोटो सौजन्य: Facebook

‘कागर’ हा तब्बल 200 वर्ष जुना शब्द ज्याचा अर्थ आहे नवीन फुटवा किंवा नवी पालवी. रिंकू राजगुरूसाठी नव्यानं पालवी आणण्यास सिनेमा यशस्वी ठरतो का किंवा एकंदरीत सिनेमाचा प्रभाव कसा आहे चला पाहुया. ‘कागर’ सुरू होतो तेच एका आत्महत्येच्या प्रसंगाने, प्रियदर्शिनी नावाचं कॅरेक्टर आत्महत्येचा प्रयत्न करतं आणि थेट सीन वळतो ते पोलिस स्टेशनमध्ये जिथे एक अज्ञात इसम याच आत्महत्येविषयी इन्स्पेक्टरला काहीतरी सांगू पाहतोय. या काही मिनिटातंच सिनेमाची राजकीय पार्श्वभूमी अगदी सहजपणे निर्माण होते. कुठलाही फाफटपसारा न करता सहजरित्या पहिल्या काही मिनिटात बरंच काही दिग्दर्शक अगदी सहज सांगून जातो खरा पण पुढे मात्र सिनेमात त्याला ते टिकवता आलं नाही. तर सिनेमात पहिलं कुतूहल निर्माण करणाऱ्या सीननंतर सिनेमा भूतकाळात जाऊन संपूर्ण गोष्ट दाखवायला सुरू करतो. इथे समोर येतो सिनेमाचा नायक युवराज म्हणजेच तरूण अभिनेता शुभंकर तावडे, त्याच्यासोबत असलेले त्याचे दोन मित्र आणि त्यांचा राजकीय संबंध. हा युवराज विराईनगर या छोट्या शहरात राहणारा इंजिनीअरिंग केलेला तरूण पण त्याच्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यायला राजकारणात उतरतो आणि अडकतोच. त्याचं राजकारणातलं श्रद्धास्थान म्हणजे विराईनगरच्या राजकारणातले गुरूजी प्रभाकर देशमुख (शशांक शेंडे), विराईनगरमधल्या संपूर्ण राजकारणाचं म्हणजे हे गुरूजी बोलतील ती पूर्व दिशा असंच असतं. पण या छोट्या शहरातून गुरूजी राज्य पातळीवर ही राजकारणातले डावपेच खेळणारे असतात. हे सगळं राजकारणाचं चित्र सिनेमात उभं राहत असताना एन्ट्री होते सिनेमाची हिरोईन रिंकू राजगुरू म्हणजेच प्रियदर्शिनी देशमुख उर्फ राणी. राणी ही गुरूजींची मुलगी असल्याचं समोर येताच हिनेच सिनेमाच्या सुरूवातीला आत्महत्या केल्याचा खुलासा सुद्धा या टप्प्यावर होतो आणि सुरुवातीला निर्माण झालेल्या कुतूहलाला नवीन वाट मिळते. ज्येष्ठ आमदार आबा (सुहास पळशीकर) आणि नवीन आमदार होऊ पाहणारा भैयाराजे (शांतनू गांगणे) हे एकमेकांसमोर उभे ठाकले असताना गुरूजींच्या मर्जीतला माणूस जिंकणार अशीच परिस्थिती असते. राजकीय रणधुमाळीत रंगत असतं राणी आणि युवराजचं प्रेम. यांच्या प्रेमाचं गुपीत त्याला राजकीय चढ उतार देत सिनेमा पकड धरू लागतो. सिनेमाचा पूर्वाध तसा चांगला रंगतो. राजकीय घडामोडींवर भर देत प्रेम कथा खुलवण्याचा प्रयत्न तसा चांगला जमला आहे. सिनेमाच्या इन्टरव्हलपर्यंत अशा घडामोडी घडतात आणि असे ट्विस्ट निर्माण होतात की सिनेमाबद्दल पाहिजे तेवढं कुतूहल निर्माण झालेलं असतं. भले इन्टरव्हलचा ट्विस्ट थोडा अपेक्षित झाला असला तरी सिनेमात पुढे काय असणार याची उत्सुकता नक्कीच निर्माण होते.

पण उत्तरार्धात सिनेमा पूरता विस्कळीत होतो आणि सिनेमामधून आपण बाहेर पडू लागतो. सिनेमात इथे रटाळपणा वाढू लागतो शिवाय तो उगाच ताणला जातोय असा सुद्धा अनेक वेळा वाटून जातं. शेवटाकडे येताना तर सिनेमा इतका भरकटतो की नेमका फोकस काय आहे ते दिग्दर्शकाला ही समजलं नाही असं वाटू लागतं. प्रेम की राजकारण या दोघांमध्ये समतोल राखताना सिनेमाचा प्रभाव मात्र हातातून सुटतो आणि अनेक गोष्टी टाळता आल्या असत्या तर असा प्रश्न मनात घर करतो. सिनेमाच्या शेवटाकडे जाताना अनेक वेळा हाच शेवट आहे असं वाटत असताना सिनेमा मात्र उगाच ताणला जातो आणि मग संपता संपत नाही. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ‘रिंगण’ फेम दिग्दर्शक मकरंद माने यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या तरूण दिग्दर्शकाचा प्रयत्न चांगला असला तरी तो अनेक ठिकाणी फसला आहे आणि शेवटाकडे जाताना तर सिनेमा पार हरवून गेलाय असं म्हणावं लागेल. काही घडामोडी तर निव्वळ दिग्दर्शनात आणि लेखनात फसल्या सारख्या वाटल्या, जसा गुरूजी कितीही मोठे असले तरी ते देव नक्कीच नाहीत, त्यामुळे निवडणुका ऐन मोक्यावर असताना राजकारणातला एवढा तरबेज माणूस एका न्यूज चॅनलवर मोठ्या पदावर असलेल्या स्त्री पत्रकाराची हत्या कशी करू शकेल? अशा मोठ्या गोष्टी आहेतच. शिवाय अनेकदा स्त्रियांना तयार व्हायला वेळ लागतो असा टोला लगावणाऱ्या अनेक जणांसाठी या सिनेमात मात्र अवघ्या दोन मिनिटात साडीच्या घडीचा पदर लावून मेकअप करून दागिने घालून नटून तयार होणारी रिंकू आहे. ज्यामुळे हा समज खोडून काढण्यात या सिनेमापूर्ती तरी यश मिळालं आहे असं म्हणता येईल नाही का. विनोदाचा भाग सोडल्यास अशा काही छोट्या मोठ्या गोष्टींचं भान दिग्दर्शक-लेखकानं ठेवणं गरजेचं असतं.

आता वळूया सिनेमाचा यूएसपी असलेल्या नावाकडे म्हणजेच राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री रिंकू राजगुरूकडे. या सिनेमाची अधिक उत्सुकता सिनेमात रिंकू असल्याने निर्माण झाली होती. तसं सिनेमात रिंकूचं पात्र सुद्धा तसं खंबीर दर्शवलं आणि रिंकूनं तसं ते चांगलं निभावलं असलं तरी सिनेमात रिंकू सैराटच्या आर्ची सारखीच वावरताना दिसली. तिचा हेल, तिची भाषा, सिनेमातला तिचा वावर शिवाय सिनेमातला तिचा ऍटिट्यूड सुद्धा एकदम सैराटच्या आर्ची सारखाच वाटतो. त्यामुळे रिंकूच्या पात्राचा आणि एकंदरीत रिंकूचा सिनेमात तेवढा प्रभाव पडत नाही. एक अभिनेत्री म्हणून रिंकूने या वेगळेपणावर थोडी मेहनत घेतली असती तर सिनेमासाठी आणि रिंकूसाठी ते फारंच फायदेशीर ठरलं असतं. असं असताना सिनेमाचा नायक शुभंकर मात्र भाव खाऊन जातो, सिनेमाच्या उत्तरार्धात त्याला डावललं गेलय असं वाटत असताना सुद्धा त्यानी निभावून नेलेल्या इन्टरव्हल आधीचं काम लक्षात राहतं. त्यामुळे या नवीन चेहऱ्याची छाप पडल्याशिवाय राहत नाही. तिथेच बाकीची पात्र मग ते छोट्यातलं छोटं का असेना चांगलीच लक्षात राहतात. पण या सगळ्यात सर्वोत्तम ठरतात ते अभिनेते शशांक शेंडे, त्यांचा वेगळा लूक शिवाय त्यांनी निभावलेलं गुरूजी तर कमाल आहेत. त्यांच्या भूमिकेतले बारकावे, बेरकी तरिही साधपणाचा आणलेला आव आणि त्यांचं एक-एक रिऍक्शन तर क्या बात. कलाकारांची कामं उत्त्म झाली असली तरी रिंकूकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. शिवाय सिनेमाचा विस्कळीत दुसरा भाग फारचं रेंगाळतो.

एक प्रशस्त राजकीय घराणं त्यातली एकुलती एक मुलगी आणि गरीब घरातला तिचा प्रियकर, त्याला त्याच्या दोन मित्रांची सोबत आणि या प्रेमासमोर येणाऱ्या अडचणी, हे ऐकून काय आठवलं सांगा? सैराट? जरी तुमचं उत्तर बरोबर असलं तरी ही कथा फक्त सैराटची नसून कागरची सुद्धा आहे. त्यामुळ दोन्ही सिनेमात असलेले साम्य सारखं सारखं डोळ्यासमोर येतं आणि नकळतपणे दोन्ही सिनेमांची तुलना झाल्याशिवाय राहत नाही. या सगळ्या त्रुटींमुळे सिनेमाचा तेवढा प्रभाव निर्माण होत नाही. रिंकूच्या कॅरेक्टरचं वेगळेपण, सिनेमातली विस्कटलेली कथा आणि शेवटाकडे ताणलेली कथा किमान या गोष्टी जरी निभावून गेल्या असत्या तरी सिनेमा प्रभावशील
ठरला असता असं मला वाटतं. त्यामुळे सिनेमागृहात जाताना तेवढ्या अपेक्षा न ठेवून गेलात तर राजकीय वर्तुळात रंगणारी प्रेमकथा तेवढी निराश करणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी