Marathi film Baba Review: 'बाबा' प्रत्येकाने न चुकता घ्यावा असा भावनिक अनुभव

रिव्ह्यू टाइम
Updated Aug 01, 2019 | 22:26 IST | चित्राली चोगले
Critic Rating:

संजय दत प्रोडक्शन्सचं मराठीतलं पहिलं पाऊल म्हणजे बाबा हा सिनेमा. दीपक दोब्रियाल आणि नंदिता धुरी आणि त्यांना लाभलेल्या बाल कलाकार आर्यन मेघजीची सोबत या सिनेमात काय कमाल करते ते पाहूया सिनेमाच्या या रिव्ह्यूमधून.

Marathi film Baba review
Marathi film Baba Review: 'बाबा' प्रत्येकाने न चुकता घ्यावा असा भावनिक अनुभव 
थोडं पण कामाचं
  • संजय दत्त प्रोडक्शन्सच्या पहिल्या मराठी सिनेमा बाबाचा सविस्तर रिव्ह्यू
  • दीपक द्रोब्रियाल बाबा ही भूमिका खऱ्या अर्थाने जगलाय
  • बाबा पाहुन एक नक्की समजतं, खरंच भावनेला भाषा नसते

मुंबई: देवकीचा कान्हा की यशोदेचा कान्हा या प्रश्नाचे उत्तर आजही देणे कठीण आहे. जन्म देणाऱ्या आईपेक्षा पालन करणारी आई ही अनेकदा श्रेष्ठ मानली जाते. पण त्या बापाचं काय तोही तितकाच श्रेष्ठ का नाही? यशोदेचा कान्हा की देवकीचा असा प्रश्न आहे तर मग वासुदेवाचा कान्हा की नंदाचा कान्हा हा प्रश्न का नाही पडला कधी कोणाला आजवर? आजवर अनेक सिनेमे असे येऊन गेले त्यात आईचं महत्त्व अनेकदा अधोरेखित झालं पण बाबा हा सिनेमा एका बापाचं महत्व अधोरेखित करणारा आहे.

कुठेतरी कान्हा वासुदेवाचा की नंदाचा? याच प्रश्नावर प्रकाश टाकणारा आहे. तर नव्वदच्या दशकातला घडणारी ही गोष्ट बाबा एका दूरवरच्या खेडेगावात घडणारी आहे. मूकबधीर असलेले माधव आणि आनंदीची आणि त्यांच्या ८ वर्षांचा मुलगा शंकरची गोष्ट आहे बाबा. या गावात पार टेकडीवर राहणारं हे कुटुंब फार गरीब असलं तरी त्यातही समाधान मानणारं, आनंदी आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणारं हे छोटं कुटुंब. शंकरला बोलता-ऐकता येत असतं पण आई-वडील दोघंही मूकबधिर असल्याने शब्दांची, भाषेची समज नाही किंवा आवाजाशी त्याचं नातं नसतं. आणि म्हणूनंच तोही काही बोलत नसतो. एके दिवशी अचानक हा शंकर गावातल्या जत्रेत जाण्याचा हट्ट धरतो. अखेर त्याचा लाडका बाबा त्याला त्या जत्रेत घेऊन जातो. आणि तेव्हा त्याची आवाजाशी होणारी ओळख अगदी सहज टिपली गेलीये. तर असं सगळं छान सुरु असलेल्या या कुटुंबाच्या आयुष्यात येतो एक अनपेक्षित ट्विस्ट आणि शंकरची खरी आई पल्लवी आणि तिचा सध्याचा नवरा राजन या कुटुंबासमोर उभे ठाकतात.

लग्नाआधीच्या नातेसंबंधातून जन्माला आलेल्या या शंकरला त्याच्या जन्मदात्या आईच्या वडिलांनी जन्म होताच एका आयाला देऊन टाकलं असतं. या आयाचा मुलगा असतो त्र्यंबक माधवचा म्हणजेच शंकरच्या बाबाचा खास मित्र आणि म्हणून तो शंकरला माधव आणि त्याच्या पत्नीकडे सुपूर्द करतो. तीन दिवसाचं असलेलं हे बाळ माधव आणि आनंदीच्या पदरात पडतं आणि त्यांचंच होऊन जातं. ते त्याला अगदी आनंदाने स्वीकारतात आणि आपल्या पोटच्या पोरासारखं त्याला वाढवतात. शंकर आठ वर्षांचा झाला असताना अचानक त्याच्या जन्मदात्या आईचे वडील त्यांच्या शेवटच्या क्षणी तिला तो अजूनही जिवंत असल्याचं सांगतात आणि मग पल्लवीचा शोध सुरू होतो तो आपला पोटचा गोळा कुठे आहे याचा. हा शोध अखेर संपतो ते या गावात, या कुटुंबाच्या दाराशी, शंकरपाशी. यामध्ये पोलीस मध्यस्थी करतात पण पोलिसांच्या हातात काहीच नसल्यामुळे केस कोर्टात जाते. आणि मग सुरु होतो सिनेमाचा पुढचा प्रवास, खरी धडपड जन्मदाता आईची आणि पालन करत असलेला आई-वडिलांची. पुढे हा मुलगा नेमका कोणाकडे जातो, त्याची कस्टडी कोणाला मिळते, बाबा या टायटलचा सिनेमाशी कसा संदर्भ जोडला जातो हे सगळं अनुभवण्यासाठी हा सिनेमा पाहावा लागेल.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Kya bolte ho, wo sahi bol rahi hai???

A post shared by Deepak Dobriyal ( Asli Wala ) (@deepakdobriyal1) on

 

सिनेमाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काही मोजकेच संवाद सिनेमात आहेत पण तरीही सिनेमा आपल्याशी उत्तम संवाद साधतो आणि तो इतका बोलतो की आपण सिनेमात कधी गुंततो आणि त्याचा एक भाग होतो हे कळत सुद्धा नाही. काही सीन्समधून आईचं मुलाशी आणि खासकरून बापाचं मुलाशी असलेलं नातं इतकं छान मांडले गेलं आहे की अनेकदा ते आपल्या मनाला कुठेतरी स्पर्श करून जातं. सिनेमाची सगळ्यात जमेची बाजू ठरते ते सिनेमातले कलाकार. खास करून मुलाचा बाबा माधव म्हणजे दीपक दोब्रियाल, त्याचसोबत शंकर साकारणारा लहानगा आर्यन मेघजी आणि शंकरची पालनकर्ती आई आनंदी म्हणजे नंदिता धुरी.

दीपकचा हा पहिला मराठी सिनेमा पण या सिनेमाला खरंच भाषा नाहीये, भावना आहेत आणि त्या दीपकने काय कमाल वटवल्यात. बाबा या टायटलला पूरक ठरतो हा दीपकने साकारलेला बाबा. पाहून खरंच म्हणावसं वाटतं काय बाप काम केलय. शब्दांचे डायलॉग नाहीयेत पण भावनांमधून जो तो व्यक्त झाला आहे, त्याचे डोळे जे बोलले आहेत ते सगळं थिएटर सोडल्यानंतर सुद्धा तुमच्या मनात राहतं. त्याच्या डोळ्यांची भाषा इतकी उत्तम जमली आहे की त्याच्यातला बाप आपल्याला कुठेतरी साद घालतोय का असं अनेकदा वाटतं. तसंच उत्तम काम केलं आहे लहानग्याला ऐकू-बोलता येतं तरीही मुका म्हणून राहत असलेल्या आर्यनने अनेक ठिकाणी दिलेले त्याचे रिअॅक्शन्स डायलॉगच्या पलिकडे जाऊन बरंच काही बोलून जातात. भूमिकेची असलेली या वयातली त्याची समज तर क्या बात. तर नंदिताने साकारलेली प्रेमळ आणि नतंरची हतबल आई आणि तिच्यातल्या विविध छटा उत्तम निभावून नेल्या आहेत. दीपक आणि नंदिताचे शेवटाकडचे दोन-तीन सीन्सतर टचकन डोळ्यात पाणी आणतात. या व्यतिरिक्त सिनेमातली इतर पात्र ही छान रंगली आहेत, पण त्यातही चित्तरंजन गिरीने साकारलेला त्र्यंबक पण खूप छान मज्जा सिनेमात आणतो. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My film Baba is releasing on 2nd August. Here is the trailer. Enjoy ?

A post shared by Deepak Dobriyal ( Asli Wala ) (@deepakdobriyal1) on

 

सिनेमाची कथा सुद्धा उत्तम आहे आणि छान पद्धतीने मांडली गेलीये. त्यात फार डायलॉग्स नसताना सुद्धा कथेतला अर्थ अगदी योग्य पद्धतीने पोहचतो हे विशेष. यासाठी खास कौतुक केलं पाहिजे तरुण दिग्दर्शक राज गुप्ताचं. अमराठी असलेल्या राजने सिनेमा उत्तम पेलला आहे. कुठे भावनांचा वापर करायचा आणि कुठे शब्दांचा, हा समतोल त्याने उत्तम जुळवून आणलय. तर सिनेमातल्या काही जागा या दिग्दर्शकाने अशा योग्य टिपल्या आहेत की सिनेमा बघताना कुठेही तो रटाळ होत नाही, किंवा भावनिक सिनेमा असूनही कुठे रडवेला सूरही सिनेमाला लागत नाही. योग्य भावना योग्य ठिकाणी येतात. तर हलके-फुलके क्षण आणि विनोदांनी सिनेमाची रंजकता कुठेही कमी पडत नाही.

सिनेमात डायलॉग नसल्याने ती कुठेतरी रेंगाळत आहे का असं वाटू शकतं. तर हा सिनेमा पाहताना अनेकदा हॉलिवूडच्या क्लासिक द किड सिनेमाची नक्कीच आठवण येते. पण ओघाने ती तशीच जाते सुद्धा कारण या सिनेमाची आपली एक वेगळी शैली आहे. सिनेमाचा पूर्वार्ध जितका रंगतो त्याहून उत्तम सिनेमाचा उत्तरार्ध पार पडतो. तर शेवटाकडे जाताना सिनेमा अगदी हेलावून टाकतो आणि डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. एक डोळा हसू अन् एक डोळा हसू असा अनुभव देत सिनेमा शेवटाकडे जातो आणि शेवटी एक सुखद भावनिक अनुभव देणारा ठरतो हे नक्की. बाबा सिनेमा पाहताना आपण आपल्या आई-वडिलांची आठवण अगदी सहज कुठेतरी नक्कीच काढतो, मी तरी काढली. सिनेमाचा आषय-विषय आणि ज्या पद्धतीने तो निभावून नेला आहे की सिनेमा पाहून झाल्यावर सुद्धा बराच वेळ सिनेमा आपल्यासोबत राहतो. खरंच सिनेमा प्रत्येकाने पहावा असाच आहे. आणि सिनेमा पाहून एक नक्की जाणवलं खरंच भावनेला भाषा नसते...

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी