Girlfriend Movie Review:‘बघतोस काय रागाने डाव टाकलाय वाघाने…’ हे खरं झालंय अमेय वाघच्या गर्लफ्रेंड सिनेमाबाबात

रिव्ह्यू टाइम
Updated Jul 25, 2019 | 20:35 IST | चित्राली चोगले
Critic Rating:

Marathi Movie Girlfriend Review: अमेय वाघ-सई ताम्हणकर या फ्रेश जोडीचा गर्लफ्रेंड सिनेमा भेटीला येत आहे. कसा आहे सिनेमा आणि काय आहेत सिनेमाच्या गमती-जमती जाणून घेण्यासाठी आमचा हा सिनेमाचा सखोल रिव्ह्यू वाचा.

Marathi movie Girlfriend review
Girlfriend Movie Review:‘बघतोस काय रागाने डाव टाकलाय वाघाने…’ हे खरं झालंय अमेय वाघच्या गर्लफ्रेंड सिनेमाबाबात  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • गर्लफ्रेंड सिनेमाचा सविस्तर रिव्ह्यू
  • अमेय वाघची सिनेमातली कमाल उल्लेखनीय
  • उपेन्द्र सिधयेंचं दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल यशस्वी

आजकाल तरूण वर्गाचं आयुष्य सोशल मीडियाच्या अवती-भवती सामावलेलं आहे. अनेकदा फेसबुकवरून आपल्या आयुष्यातले बरेच महत्त्वाचे टप्पे उलघडले जात असतात, मग लग्न, बर्थ डे, एखादी ट्रीप याची माहिती याच फेसबुकवरून मिळत असते. खरंतर आजकाल आपण या या फेसबुकच्या जगात एक समांतर आयुष्य जगत असतो आणि अशाच खऱ्या आणि फेसबुकच्या आयुष्याचं बॅलेन्स साधत जगणं ज्याला जमत नाही त्याला अनेकदा मिसफीट असं संबोधलं जातं. असाच मिसफीट असतो गर्लफ्रेंड सिनेमाचा नायक नचिकेत प्रधान (अमेय वाघ). ग्राफीक डिझायनर असलेला नचिकेत आई (कविता लाड), बाबा (यतिन कार्येकर) आणि भाऊ (तेजस बर्वे) यांच्यासोबत पुण्यामध्ये राहत असतो. मुळात शांत, साधा आणि इन्ट्रोवर्ट असलेल्या नचिकेतची एकच समस्या असते आणि ते म्हणजे त्याचं सिंगल स्टेटस. घरचे, मित्र, कामावरचे मित्र, बॉस हे सगळेच त्याला त्याच्या सिंगल असण्यावरून टोकत असतात. त्यामुळे नचिकेत म्हणजेच नच्याच्या आयुष्यात एकच ध्येय उरतं आणि ते म्हणजे गर्लफ्रेंड. सिनेमा सुरू होतो तोच नच्याच्या वाढदिवसापासून. वाढदिवस असून एकटा पडलेला नचिकेत ऑफिसमध्ये सुद्धा प्रमोशनला मुकतो ते गर्लफ्रेंड नसल्याच्या कारणाने. मग येतो सिनेमाच्या कथेचा एक मस्त धमाल ट्विस्ट आणि अचानक आपला हा नच्या फेसबुकवर प्रचंड गाजतो. त्याच्या घरातले पण खूप खुश होतात. नच्याची ही टर्नवाली-ट्विस्टवाली लव्हस्टोरी फेसबुकवर सुरू होते. नचिकेतचे सगळ्यात जवळचे दोन मित्र सँडी (सुयोग गोऱ्हे) आणि अद्या (उदय नेने) पण फारंच आनंदात असतात. सगळं आलबेल सुरु असतानाच येतो सिनेमातला अजून एक धमाल ट्विस्ट आणि नचिकेतची ही फेसबुकवरची काल्पनिक गर्लफ्रेंड अलिशा (सई ताम्हणकर) थेट त्याच्या खऱ्या-खुऱ्या आयुष्यात अवतरते. यानंतर सिनेमात बरेच छोटे-मोठे ट्विस्ट धमाल देऊन जातात. पण ही गर्लफ्रेंड खरंच नचिकेतची गर्लफ्रेंड आहे का, आणि पुढे या दोघांच्या आयुष्यात कोणते ट्विस्ट येतात, किंवा खरंच नच्याला गलफ्रेंड मिळाली का ते जाणून घेण्यासाठी सिनेमा पहावा लागेल.

 

 

 

 

नचिकेत आणि त्याची गर्लफ्रेंड मात्र मनात घर करून जातात. सिनेमाचा फ्रेश लूक आणि सिनेमाची कथा नक्कीच वाखाण्याजोगी आहे. त्यात नचिकेत म्हणून अमेय वाघने केलेली बॅटिंग तर कमाल आहे. अमेयचं सिनेमातलं काम बघता खरंच डाव टाकलाय ‘वाघा’ने असंच म्हणावं लागेल ना राव. मुरांबा, फास्टर फेणे सारख्या सिनेमांमध्ये आपलं अभिनय कौशल्य सिद्ध करणारा अमेय या सिनेमात एका लेव्हल वर जातो हे नक्की. त्याच्या जोडीला सई ताम्हणकरनं सुद्धा चांगलं काम केलं आहे पण अमेय सिनेमात निश्चितच उजवा ठरतो. सिनेमातल्या इतर कलाकारांची कामं सुद्धा चांगली झाली आहेत आणि कास्टिंग परफेक्ट केलं गेलं आहे. त्याचसोबत प्रशंसा करावी लागेल ती सिनेमाचा दिग्दर्शक-लेखक उपेंद्र सिधयेची. हा उपेंद्र यांचा पहिलाच सिनेमा आहे पण सिनेमा बघताना कुठेही ते जाणवत नाही. पहिल्याच बॉलवर सिक्स मारावा असा फील सिनेमा बघताना येतो. कारण सिनेमातल्या बऱ्याच टप्प्यावर दिग्दर्शनातल्या जागा उत्तम टिपल्या जातात. मला स्वतःला भावलेली गोष्ट म्हणजे सिनेमाचा शेवट. कुठेतरी सिनेमा शेवटाकडे जाताना अपेक्षित वळणं घेतो पण विशेष म्हणजे सिनेमाचा शेवट हा टिपिकल आणि रटाळ केलेला नाही. त्यासाठी उपेंद्र यांचं खास कौतुक. सिनेमाची कथा आणि स्क्रिनप्ले सुद्धा उत्तम जमुन आला आहे. त्यामुळे सिनेमा बघताना खूप मज्जा येते. ओढून-ताणून कुठले प्रसंग दर्शविलेले नाहीत. तसंच काही विनोदांच्या बाबतीत होतं, अगदी सहज-सरळ प्रसंगातून, अभिनयातून आणि डायलॉगमधून विनोद निखळ हसवून जातात. त्यामुळे सिनेमाच्या पहिल्या फ्रेमपासून लागलेली गोडी शेवटापर्यंत टिकून राहते.

 

 

सिनेमातली गाणी ही विशेष आकर्षण ठरतात कारण आहे त्या गाण्यांचं टेकिंग. असं टेकिंग मराठी सिनेमांमध्ये सहजासहजी पहायला मिळत नाही आणि तिच गंमत ही गाणी बघताना येते. सिनेमातली या वेगळ्या टेकिंगमध्ये बनलेली दोन गाणी मस्त धमाल आणल्या शिवाय राहत नाहीत. सिनेमाची पकड कुठेही ढिली पडत नाही आणि तो रटाळ ही होत नाही आणि म्हणाल्या प्रमाणे सिनेमाचा शेवट चेहऱ्यावर छान हसू आणतो. त्यामुळे एकंदरीत सिनेमाचा प्रभाव ही मनावर कायम राहतो. सिनेमागृहातून बाहेर पडताना नचिकेत आणि नच्याची गर्लफ्रेंड आपल्यासोबत बराच वेळ राहतात आणि मनाला एक छानवाली फिलिंग देऊन जातात. नचिकेत आणि त्याच्या गर्लफ्रेंडला नक्की भेट द्या, त्यांची ही टर्नवाली-ट्विस्टवाली लव्हस्टोरी अनुभवण्यासाठी हा सिनेमा आवर्जून पाहा हेच पुन्हा-पुन्हा सांगावसं वाटतंय. ही गर्लफ्रेंड तुम्हाला नक्की आवडेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी