आजच्या पिढीची लव्हस्टोरी असलेल्या मिस यू मिस्टरची सुरूवात तर रंगते पण उत्तरार्ध भरकटतो

रिव्ह्यू टाइम
Updated Jun 27, 2019 | 22:04 IST | चित्राली चोगले
Critic Rating:

Miss U Mister Marathi Move Review: मृण्मयी देशपांडे-सिद्धार्थ चांदेकर या जोडीचा मिस यू मिस्टर सिनेमा रिलीज होत आहे. कसा आहे एकंदरीत हा सिनेमा हे जाणून घेण्यासाठी वाचा आमचा या सिनेमाचा सखोल रिव्ह्यू.

Miss u Mister Marathi Movie review
आजच्या पिढीची लव्हस्टोरी असलेल्या मिस यू मिस्टरची सुरुवात तर रंगते पण उत्तरार्ध भरकटतो  |  फोटो सौजन्य: Instagram

आजकाल बऱ्याच जोडप्यांमध्ये लाँग डिस्टन्स रिलेशनशिप फारं कॉमन झालं आहे. कारण कामाधंद्यासाठी अनेकदा आपलं घर, शहर सोडून दुसरीकडे जाऊन काम करताना आजकालची पिढी जरा अग्रगण्य दिसते. आपली स्वप्न-अकांक्षा पूर्ण करण्यासाठी बरेच कपल्स या लाँग डिस्टन्स रिलेशनला स्विकारतात खरे पण स्वप्नांची पूर्तता करताना जोडीदार किंवा नात्यावर परिणाम झाला तर? काहीशा अशाच नात्यावर, त्याच्या अवती-भवती गुरफटलेल्या संबंधावर मिस यू मिस्टर सिनेमा बेतलेला आहे. वरूण (सिद्धार्थ चांदेकर) आणि कावेरी (मृण्मयी देशपांडे) या तरूण जोडप्याची गोष्ट म्हणजे मिस यू मिस्टर. सिनेमाची सुरूवातच होते ती कामानिमित्त वरूण राहतं घर सोडून लंडनला जायला निघतो तिथपासून. वरूण-कावेरी यांचा असलेला अगदी वर्ष दोन वर्षांचा संसार, त्यांच्या नात्यातील गोडवा आणि त्याची घट्ट नीव सिनेमाच्या पहिल्या काही क्षणात अगदी सहज रित्या स्पष्ट होते.

सिनेमाच्या या पहिल्या काही क्षणात वरूणच्या आई-बाबांची (सविता प्रभुणे-राजन भिसे) सुद्धा ओळख प्रेक्षकांना होते. या नोटवर सिनेमा छान सुरू होतो. वरूणचं लंडनमध्ये राहणं तिथल्या वातावरणात घरच्यांपासून दूर असताना तिथे अॅडजस्ट करणं आणि त्याचवेळेला आपल्या नात्यातील गोडवा टिकवून ठेवणं सिनेमात उत्तम पद्धतीने दर्शवलं गेलं आहे. तसंच कावेरीची अॅडजस्टमेन्ट, तिची आपल्या माणसात असताना सुद्धा होणारी थोडीफार घुसमट, तिची फरफट आणि नवऱ्यावर असलेलं प्रेम सुद्धा छान अधोरेखीत होतं. पण कथा पुढे सरकते आणि वेळ आणि परिस्थितीचा वरूण-कावेरीच्या नात्यावर परिणाम होऊ लागतो. एक टीम म्हणून आपली स्वप्न साकारण्यासाठी केलेली ही तडजोड किती कठीण आहे हे हळू-हळू लक्षात येऊ लागतं आणि ते सुद्धा कावेरीला ते जास्त जाणवू ही लागतं. अखेर वरूण परत तर येतो पण हा परत आलेला वरूण कावेरीचा वरूण नसतोच. त्याच्यात फार बदल झाले असतात आणि त्यामुळे हे गोड नातं मध्येच अशा टोकाला येऊन पोहोचतं की तिथून पुढे लांब होणे हा एकमेव पर्याय वरूण-कावेरीसमोर उरला असतो की काय असं वाटू लागतं. हे दोघं यातून बाहेर निघत नातं नव्यानं खुलवतात का आणि कावेरी-वरूणच्या या आजच्या काळातल्या लव्हस्टोरीचा हॅपी एन्डिंग होतो का हे जाणून घेण्यासाठी सिनेमा पहावा लागेल.

 

 

पण त्याआधी तो कसा आहे हे जाणून घेऊया. तर सांगितल्याप्रमाणे सिनेमाची कथा आणि त्याचा विषय वेगळा आहे आणि आजच्या पिढी रिलेट करू शकेल असाच आहे. ज्याची सुरूवात सुद्धा सिनेमात उत्तम झाली आहे. सिनेमातल्या प्रत्येक कलाकाराचं काम ही छान झालं आहे. सिनेमाचा पूर्वाध चांगली पकड घेत रंगतो ही चांगला. मृण्मयीचं काम तर मस्तचं झालं आहे, काही ठिकाणी तिनं न बोलता दिलेले एक्सप्रेशन्स खरंच मनाला भावतात. तर सिद्धार्थनं ही भूमिका चांगली वटवली आहे. पण विशेष लक्षवेधी ठरते ती सविता प्रभुणे यांची भूमिका. त्यांनी घेतलेलं त्यांच्या कॅरेक्टरचं बेअरिंग इतकं छान जमुन आलंय की खरंच त्यांच्या प्रत्येक सीनला धमाल येते. त्यामुळे या सगळ्या जमेच्या बाजू असल्या तरी सिनेमाचा उत्तरार्ध भरकटतो. इन्टरव्हलला थोडी उत्सुकता वाढते खरी की नेमकं सिनेमात खऱ्या आयुष्यात ती गोष्ट घडलीये की स्वप्नात हे विचार करत राहतो. आपण पण उत्तरार्ध सुरू होताच त्या सीनची तेवढी गंमत राहत नाही. सिनेमाची पकडही हळू-हळू सैल होऊ लागते आणि सिनेमातला रस थोडा कमी होतो. त्यातच सिनेमा शेवट किंवा सिनेमाचं निर्णायक वळण येण्यासाठी दिलेलं कारण किंवा सीन्स तेवढेसे पटत नाहीत. त्यात आणलेलं कॅरेक्टर तेवढं प्रभावशाली वाटत नाही आणि म्हणून सिनेमाचा शेवट अगदी भरकटलेला वाटतो. पूर्वार्धात आलेली मज्जा उत्तरार्धात फिकी पडते आणि म्हणून सिनेमा तेवढा प्रभाव कायम करू शकत नाही. सिनेमा पाहताना काही सीन्समध्ये २०१५साली रिलीज झालेल्या १०००० किलोमीटर (लाँग डिस्टन्स) या स्पॅनिश सिनेमाची झलक दिसते आणि त्या सिनेमाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण तो सिनेमासुद्धा अशा एक तरूण लाँग डिस्टन्समध्ये असलेल्या कपलची गोष्ट आहे आणि अनेक सीन्स त्या सिनेमाशी सार्धम्य साधतात आता हा योगायोग ही असू शकतो. पण दिग्दर्शनातले बरेच बारकावे तसेच राहिल्यामुळे तो योगायोग आहे असं म्हणणं जरा पटत नाही, असो दिग्दर्शनातल्या ही काही त्रुटी आहेतच. या सगळ्यामुळे सिनेमाने कायम केलेला प्रभाव शेवटाकडे जाताना फारं फिका पडलेला असतो. पण हो सिनेमातल्या कलाकारांच्या अभिनयासाठी, मृण्मयीच्या परफॉर्मन्ससाठी, खास करून सविता प्रभुणे यांच्या त्या खास धमाल कॅरेक्टरसाठी आणि सिनेमातल्या थोड्या वेगळ्या कथेसाठी सिनेमा एकदा पाहण्यास काहीच हरकत नाहीये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी