Mission Mangal Review: विद्या बालन-अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’ची सफर न चुकवण्यासारखीच

रिव्ह्यू टाइम
Updated Aug 15, 2019 | 18:24 IST | चित्राली चोगले
Critic Rating:

अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा असलेला मल्टी स्टारर सिनेमा मिशन मंगल नुकताच भेटीला आला आहे. सिनेमा कसा आणि सिनेमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमचा हा या सिनेमाचा सखोल रिव्ह्यू नक्की वाचा.

mission mangal movie review vidya balan akshay kumar starrer is a much watch
Mission Mangal Review: विद्या बालन-अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’ची सफर न चुकवण्यासारखीच  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • अक्षय कुमार-विद्या बालनचा 'मिशन मंगल' प्रत्येकाने घ्यावा असा अनुभव
  • सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय मनात घर करुन जातात
  • विद्या बालनच्या अभिनयाची जादू पुन्हा कायम

मुंबई: अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन, किर्ती कुल्हारी, शर्मन जोशी, विक्रम गोखले, दलिप ताहील, संजय कपूर आणि एच. डी. दत्तात्रय आणि इतर बरेच नावाजलेले कलाकार अशी स्टार कास्ट असलेला मिशन मंगल हा सिनेमा जाहीर झाल्यापासून सिनेमाची उत्सुकता प्रचंड होती. त्यात सिनेमाचा विषय सुद्धा आपल्या सगळ्यांचा हृदयाच्या अगदी जवळचा होता आणि तितकाच अभिमानाचा सुद्धा. मिशन मंगल एक असं मिशन ज्याने भारताला जगाच्या नकाश्यावर पुन्हा एकदा अधोरेखीत केलं. एक असं मिशन ज्याने संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे वेधून घेतलं. या मिशनबद्दल आपण सगळ्यांनीच खूप वाचलं, ऐकलं आणि अभिमानाने त्याबद्दल बऱ्याच चर्चा सुद्धा रंगल्या. पण हेच मिशन आणि त्याचा संपूर्ण प्रवास मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार म्हटल्यावर आपल्या प्रत्येकातील प्रेक्षक आणि त्याहून पुढे जाऊन आपल्या प्रत्येकातील भारतीय खूप सुखावला होता. त्यात सिनेमा १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर रिलीज होणार म्हणजे तर ही भावना अधिक तीव्र झाली. चला पाहूयात या सगळ्या भावनांना हा सिनेमा कितपत न्याय देतो.

सुरुवातीलाच मला सांगायला आवडेल की मंगल मिशनचं मिशन फर्स्टक्लास पार पडलं आहे आणि सिनेमा प्रत्येकाने बघण्यासारखाच आहे. मिशन मंगल सिनेमाची जमेची बाजू त्याची स्टारकास्ट तर आहेच पण त्याचसोबत सिनेमाची कथा सुद्धा एकदम उत्तम लिहिली गेली आहे. कुठेही फाफट पसारा नाही की ओढाताण नाही. सिनेमाची सुरुवात होते ते अक्षय आणि विद्याच्या कॅरेक्टरच्या ओळखीने. अगदी सहज त्या कॅरेक्टर्सची आणि त्यांच्या पार्श्वभूमीची ओळख होते. त्याचसोबत इथेच समजतं की हे दोन सायेन्टिस्ट एका महागड्या बरेच करोड रुपये खर्च करुन बनवलेल्या रॉकेटला लॉन्च करण्यामध्ये अयशस्वी ठरतात. तिथेच या दोघांना मिशन मंगलवर फोकस करण्यास सांगितलं जातं. एक असं मिशन ज्यावर या दोघांना सुद्धा विश्वास नाहीए. तसंच त्यांची टीम जी पुढे या मिशनसाठी योजली जाते त्यांच्यामधील कोणालाच या मिशनबद्दल शाश्वती नसते. पण नंतर गोष्टी बदलतात आणि मिशन योग्य दिशेने कूच करु लागतं.

 

 

सिनेमाचं लेखन सिनेमाचा प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरतं. तसंच सिनेमाची कास्टिंग उत्तम झाली आहे आणि जवळपास सगळ्यांच्या भूमिका उत्तम निभावल्या गेल्या आहेत. त्याचसोबत दिग्दर्शक जगन शक्ती यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये सिनेमाचे सीन्स आणि टेकिंग अगदी उत्तम केलं आहे. काही सीन्स याला अपवाद ठरतात आणि ते सिनेमात नसते तरी चाललं असतं असं वाटतं पण तरी सिनेमाचा फोकस कुठे हलत नाही तेवढा. तसंच सिनेमातल्या मिशन मंगलच्या टीमच्या वैयक्तिक आयुष्य सुद्धा कुठेतरी सिनेमात डोकावतात पण ते सिनेमात उत्तम पेरलं गेलं आहे जेणेकरुन ते सिनेमाच्या कथेत समरस होतं. याचं सगळं श्रेय निश्चितंच सिनेमाच्या दिग्दर्शकाला जातं. या मिशन मंगलच्या टीममध्ये जास्त करुन महिलांचा समावेश होता. त्या प्रत्येक स्त्रीला तिची एक वेगळी पार्श्वभूमी आहे आणि ते सगळं सिनेमात कदम मस्त रेखाटलं गेलं आहे. अजून एक जमेची बाजू ठरते अक्षय-विद्याची केमिस्ट्री. या दोघांनी अनेक सीन्समध्ये छान साथ दिली आहे एकमेकांना. तर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असलेली नित्याने छान कामगिरी केली आहे हे नक्की. पण भाव खाऊन जाते ते विद्याच. तिचा कसदार अभिनय आणि तिची अभिनयातली सहजता सिनेमाची पकड कुठेही सैल पडू देत नाही. विद्याने या सिनेमातून पुन्हा कदा तिच्या अभिनयाची कमाल दाखवून दिली आहे. तसंच दलिप ताहील ज्यांनी एका नासामध्ये काम करुन झालेल्या सायेन्टिस्टची भूमिका साकारली आहे, त्यांची आणि अक्षयचे सीन्स सुद्धा छान जमून आले आहेत. सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच त्यांच्या खुर्चीवर खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. तसंच आपल्याला मिशन मंगलचा अंतिम रिझल्ट माहित असला तरी शेवटाकडे आपल्या हृदयात धाकधूक होत राहतेच आणि हृदयाचे ठोके सुद्धा वाढलेले असतात. एक भारावून टाकणारा आणि भारतीय म्हणून अभिमानाने ऊर भरुन येणारा शेवट मनात घर करुन जातो.

असं असलं तरी काही गोष्टी टाळल्या असत्या तर बरं झालं असतं असं मला वाटतं. जसं टिपीकल बॉलिवूडचा टच असलेला एक फाईट सिक्वेन्सची तशी या सिनेमात गरज नव्हती. तसंच अक्षय कुठेतरी जरा काही सीन्समध्ये ओव्हरबोर्ड जातोय का असं वाटतं. सोनाक्षीची भूमिका सुद्धा हवा तो प्रभाव पाडू शकत नाही आणि सोनाक्षीकडून हवं ते सिनेमाला आणि भूमिकेला मिळत नाही.

थोडक्यात सांगायचं तर सिनेमा उत्तम आहे आणि ही मिशन मंगलची सफर न चुकवण्यासारखीच आहे. सिनेमाचं लेखन उत्तम जमून आलंय. सत्य घटनेवर आधारित खास करुन इतक्या मोठ्या घटनेवर आधारित सिनेमा लिहिणं आणि तो इतका उत्तम पेलून नेणं हे खरंच वाखाण्याजोगं आहे. प्रत्येक कलाकाराचं काम चांगलं झालं आहे. प्रत्येक कॅरेक्टरला योग्य न्याय दिला गेला आहे हे सिनेमाचं एक वैशिष्ट्य ठरतं. शेवटाकडे सिनेमा संपल्यावर तुम्ही खुर्चीवरुन उठून टाळ्या नाही वाजवल्या तरंच नवल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी