मोगरा फुलला रिव्ह्यू- कुटुंबाच्या भावनिक गुंत्यात गुरफटलेली आधुनिक लव्हस्टोरी पण...

रिव्ह्यू टाइम
Updated Jun 14, 2019 | 20:11 IST | चित्राली चोगले
Critic Rating:

Mogra Phulaalaa Movie Review: स्वप्निल जोशीची मुख्य भूमिका असलेला मोगरा फुलला सिनेमा आज रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या कथेबद्दल जाणून घेण्यासाठी आणि कसा आहे सिनेमा हे जाणून घेण्यासाठी आमचा हा सखोल रिव्ह्यू वाचा.

Mogra Phulaalaa Marathi Movie
मोगरा फुलला रिव्ह्यू- कुटुंबाच्या भावनिक गुंत्यात गुरफटलेली आधुनिक लव्हस्टोरी पण...  |  फोटो सौजन्य: Instagram

प्रत्येकाला आपलं कुटुंब आपली माणसं खुप प्रिय असतात. सध्या एकत्रित कुटुंब पद्धती त्या मनाने कमी झाली असली तरी बऱ्याच घरात अनेक कुटुंब एकत्र सुखाने नांदताना दिसतात. याच आपल्या माणसात कधी-कधी आपण इतके गुंतलेलं असतो की त्यांच्या आनंदापुढे आपल्याला स्वतःच्या आनंदाची पर्वा नसते. अशाच कुटुंबाच्या प्रेमासाठी, खासकरुन आईवर जिव ओतणाऱ्या सुनील कुलकर्णीची गोष्ट आहे 'मोगरा फुलला'. स्वप्निल जोशीची मुख्य भूमिका असलेला 'मोगरा फुलला' सिनेमा गेले अनेक दिवस चर्चेत होता. अखेर तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कसा आहे हा सिनेमा चला पाहुयात.

सिनेमा एका गावामध्ये घडतो. जिथे सुनील कुलकर्णी आणि त्याची आई (नीना कुलकर्णी), लहान भाऊ (प्रसाद लिमये), वहिनी (समिधा गुरु), काका (विघ्नेश जोशी), काकी (संयोगिता भावे) आणि चुलत बहिण असं एकत्र कुटुंब एकत्र राहत असतं. अजून एक लहान भाऊ आणि वहिनी आईशी पटत नसल्याने वेगळे राहत असतात. तर आईच्या आज्ञेच्या बाहेर नसलेल्या या पस्तीशीतल्या सुनीलचं लग्न काही केल्या जमत नसतं. सॉफ्टेवेअर इंजिनिअर असून स्वतःचा बिझनेस चावणाऱ्या सुनीलने आजवर तब्बल 38 मुली नाकारल्या असतात. खरंतर सुनीलने नाही तर त्याच्या आईने या मुली नाकारल्या असतात असं म्हणणं वावगं ठरणार नाही. सिनेमा सुरु होतो तोच एका मुलीला दिलेल्या नकारातून आणि यातून सुनीलची आई किती काटेकोर आहे आणि हुकुम गाजवणारी आहे हे स्पष्ट होतं.

सुनीलसाठी आई बोलेल तिच पूर्वदिशा असते आणि त्यामुळे खाण्या पिण्यापासून ते कधी काय करावं यावर पण आई बोलेल तसं सुनील ऐकत असतो. एकंदरीत संपूर्ण घरावर सुनीलच्या आईचा हुकुम चालत असतो. यातंच कामाच्या योगायोगाने सुनीला भेटते शिवांगी गुप्ते (सई देवधर). ज्या बॅंकमध्ये सुनीलचं सॉफ्टवेअर दिलेलं असतं तिथे आलेली नवीन असिस्टंट मॅनेजर म्हणजे ही शिवांगी. शिवांगी आणि सुनीलमध्ये बऱ्याच योगायोगाच्या गोष्टी घडतात आणि दोघांना एकमेकांबद्दल भावना जाग्या होतात. यात विविध कॅरेक्टर विविध टप्प्यावर सिनेमाच्या कथेत गुंफले गेले आहेत. जे त्या-त्या वेळी येऊन या शिवांगी-सुनीलच्या खुलत असलेल्या प्रेमकथेला नकळतपणे मदत करतात. मग ते मध्या काका (चंद्रकांत कुलकर्णी) यांचा नाटकाचा सीन असो किंवा सुनीलचा खास मित्र मयूर (संदीप पाठक) असो. हे आणि असे अनेक पात्र या हळूवार खुलणाऱ्या लव्हस्टोरीचा नकळतपणे एक भाग होतात.

सिनेमाची कथा रंगत असताना मध्यांतरराआधी या कथेत येतो एक ट्विस्ट आणि त्यामुळे पुढे काय असा एक प्रश्न निर्माण होतो. शिवांगीला आपल्या प्रेमाची कबुली द्यायला सुनील तिच्या दारावर पोहोचतो आणि शिवांगीची लहान मुलगी घराचं दार उघडते. ही मुलगी शिवांगीला मम्मा अशी हाक मारताच सुनील थबकतोच. यानंतर सुनील-शिवांगीच्या लव्हस्टोरीचं काय होणार आणि ती पुढे सरकली तरीही सुनीलच्या हुकुमी आईला हे प्रेम चालणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला मिळतीलंच.

सिनेमाची कथा मध्यांतराआधी चांगली रंगते पण मध्यांतरानंतर ती अधिक पकड धरते. सिनेमात सगळ्या पात्रांची कामं छान झाली आहेत. तसंच सिनेमाची कथा सुद्धा चांगली आहे. सिनेमातली मारवा ही गझल तर पुन्हा-पुन्हा ऐकावी अशीच आहे. स्वप्निल जोशीच्या मागच्या काही दिवसात आलेल्या सिनेमांच्या तुलनेत हा सिनेमा खूपंच उजवा ठरतो. त्यात स्वप्निलचा डी-ग्लॅमरस, साधा-सरळ नायक सुद्धा मनाला भावतो. ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी बऱ्याच वर्षांनी या सिनेमातून मराठी सिनेमांकडे वळताना दिसल्या. या सिनेमातली त्यांची भूमिका खरंच खूप उत्तम रंगली आहे. मुलावर हक्क गाजवणारी पण त्याचवेळेला त्याच्यावर जिवापाड प्रेम करणारी, नीना यांनी साकारलेली आई खूप खरी वाटते.

सई देवधर या सिनेमातून मराठीत पदार्पण करताना दिसली. हिंदीत अनेक वर्ष काम केल्यावर आता मराठीत तिने काम करायला हरकत नाही असं हा सिनेमा पाहिल्यावर वाटतं. पण याचसोबत सिनेमात थोडे खाचखळगे सुद्धा आहेत. कथा मध्यांतराआधी थोडी पसरलेली वाटते. मुख्य कथेकडे वळेपर्यंत मध्यांतर येतो तसंच सिनेमाच्या शेवटाकडे पण सिनेमा आता संपावा असं वाटत असतानाच कथेत एक नवीन वळण येतं आणि तिथे थोडाफार सिनेमा ताणला गेला आहे असं वाटतं.

सिनेमात बरीच वर्ष कणखर असलेली आई स्वतःच्या मुलाच्या सांगण्यावरुन किंवा दिराच्या सांगण्यावरुन बदलत नाही पण एका छोट्या गोष्टीने तिच्या लगेच एवढा मोठा बदल होताना दिसतो की ते पचवणं जरा कठीण जातं, त्यात असं वाटतं की सिनेमा आता शेवटाकडे आला आहे म्हणून घाईने हा बदल घडतोय की काय. सिनेमाचा विषय चांगला आहे, कुठेतरी विचार करायला लावणारा ही आहे पण त्याचसोबत त्या मूळ विषयावर येण्यासाठी त्याच्या अवती भवती बराच वेळ जातो आणि नंतर तो थोडक्यात संपावा तर ते ही नाही. श्रावणी देवधर यांचं दिग्दर्शन चांगलं झालं असलं तरी त्यात काही ठिकाणी ओढून-ताणून आणलेले प्रसंग नसते तरी चाललं असतं असं वाटतं. सिनेमा म्हंटल्यावर अनेकदा सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाते, पण ती पण थोडी विचारपूर्वक घ्यावी असं मला वाटतं. तर थोडक्यात सांगायचं तर काही थोड्याफार तृटी सोडल्या आणि कथेतले काही खाचखळगे टाळले तर सिनेमा चांगला झाला आहे. एक आगळी वेगळी लव्ह स्टोरी जी नक्कीच एकदातरी बघायला हरकत नाही. सहकुटुंब सिनेमा पाहा तुम्ही एन्जॉय कराल हे निश्चित. यासोबतच सिनेमातलं मारवा गाणं घरी जाताना गुणगुणत जाल हे पण नक्की.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी