Bharat Movie Review: सलमान-कतरिनाचा ‘भारत’ प्रेक्षकांना करेल भावनिक, जोडी हिट

रिव्ह्यू टाइम
Updated Jun 05, 2019 | 16:15 IST | टाइम्स नाऊ मराठी
Critic Rating:

Bharat Movie Review: आज ईदच्या निमित्तानं सलमान खानचा चित्रपट ‘भारत’ रिलीज झाला आहे. कतरिना कैफसोबत सलमानची जोडी पुन्हा हिट ठरलीय. शानदार अभिनयासोबतच चित्रपटातील इमोशनल सीन्स प्रेक्षकांना आकर्षित करतायेत.

Bharat Review
सलमान-कतरिनाची जोडी पुन्हा ठरली हिट  |  फोटो सौजन्य: Instagram

Bharat Movie Review: बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवायला उतरली आहे. ईदच्या दिवशी आपल्या फॅन्सला सलमाननं ‘भारत’ चित्रपटाच्या रुपानं एक गिफ्ट दिलंय. चित्रपट आज दणक्यात रिलीज झालाय. चित्रपट फक्त हिंदीच नाही तर तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये सुद्धा रिलीज झालाय. चित्रपटाची कथा देशाच्या फाळणीपासून सुरू होते. चित्रपटात १९४७ ते २०१० पर्यंतचा काळ दाखवला गेलाय. यात सलमान खान आपल्याला प्रत्येक वयोगटात आकर्षित करतोय.

आज ईदची सुट्टी असल्यामुळे सल्लू मियाँचा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केलीय. अनेक लोक आपल्या संपूर्ण कुटुंबासह चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्यासाठी आले. सलमानचा प्रत्येक चित्रपट हा एक फॅमिली एंटरटेन्मेन्ट पॅक असतो. जर आपण ‘भारत’ चित्रपट बघायला जायचा प्लान करत असाल तर आधी चित्रपटाचा हा रिव्ह्यू नक्की वाचा.

चित्रपटाचं कथानक

‘भारत’ चित्रपटाची कथा २०१० पासून सुरू होते. इथं सलमान खान म्हणजे भारत वयोवृद्ध दिसतोय. सलमान खान आपलं एक दुकान चालवत असतो. दुकानाचं नाव ‘हिंद राशन स्टोअर’ आहे. भारतचं आपल्या दुकानावर खूप प्रेम आहे, याचं कारण म्हणजे भारतचे वडील (जॅकी श्रॉफ) आहेत. भारत दरवर्षी आपला वाढदिवस अटारी स्टेशनवर ट्रेनसोबत धावत केक कापून साजरा करतो. भारतचा असा वाढदिवस साजरा करण्यामागे एक कारण आहे. हेच कारण सांगतांना दिग्दर्शक आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये १९४७ सालात घेऊन जातो. लाहोर इथल्या मीरपूर गावामध्ये लहान वयातील भारत आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत राहत असतो. देशाची फाळणी होत सर्व लोक ट्रेन पकडून भारतात येत असतात. मात्र यात भारतचे वडील आणि लहान बहिण गुडिया तिथंच राहून जातात. धावत्या ट्रेनमधून भारतचे वडील त्याच्याकडून एक वचन घेतात की, तो आयुष्यभर आपल्या कुटुंबाचा सांभाळ करेल आणि त्यांच्यासोबत राहिल. बस हेच वचन पूर्ण करण्यासाठी ‘भारत’ आपलं संपूर्ण आयुष्य वेचतो.

भारतच्या आयुष्यात वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर रशियन सर्कस, तेल आणि गॅसच्या खाणी आणि नौदल यासारखे अनेक वळणं चित्रपटात दाखवली गेली आहेत. जेव्हा भारतच्या आयुष्यात रशियन सर्कस येते तेव्हा तिथं त्याच्या सोबतीला राधा (दिशा पटानी) असते. तर उर्वरित संपूर्ण आयुष्यात त्याची जोडीदार म्हणजे मॅडम सर (कतरिना कैफ) असते. अनेक वर्षांपासून भारत आणि मॅडम सर म्हणजेच कुमुद एकमेकांवर प्रेम करतात. पण ते लग्न करत नाहीत, लिव्ह-इन-रिलेशनमध्ये राहतात. भारत आपल्या वृद्धापकाळापर्यंत वडील आणि बहिणीचा शोध घेतो.

भारतला आपल्या वडिलांचा आणि बहिणीचा शोध घेण्यात यश आलं का? अनेक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर भारत-कुमुद विवाह करतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला चित्रपट बघितल्यावर मिळतील.

 

 

अभिनय

भारत चित्रपटाची कथा सलमान खानच्या आजुबाजूला फिरतेय. यात सलमान २० वर्षांपासून तर वयाच्या सत्तरीत दिसतो. आपल्या अभिनयातून सलमाननं आयुष्यातील हे विविध शेड्स चांगले रंगवले आहेत. मात्र त्यातील ७० वर्षातील एक फाईट सिन थोडा अनरिअल वाटतो. कतरिना मॅडम सर म्हणजेच कुमुदच्या रुपात ती खूप सुंदर दिसतेय. कतरिनानं चित्रपटात अभिनय सुद्धा चांगला केलेला आहे. एव्हढंच नव्हे तर अभिनयासोबत कतरिनानं जड हिंदी शब्दही व्यवस्थित उच्चारले आहेत. सलमान आणि कतरिनाची केमेस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना भावेल, अशीच आहे.

अभिनेता सुनील ग्रोवर चित्रपटात एक सरप्राईज पॅकेज आहे. त्यानं आपल्या अभिनयानं सर्वांना खूप हसवलंय. काही सिन्स तर इतके फनी आहेत की, ते पाहून प्रेक्षक आपलं हसणं थांबवू शकणार नाही. डायलॉग डिलिव्हरीपासून तर एक्सप्रेशन्सपर्यंत चित्रपटात प्रत्येक कलाकारानं आपल्या अभिनयाला न्याय दिलाय. जॅकी श्रॉफ, दिशा पटानी, सतीश कौशिक यांच्या भूमिका खूप लहान आहे. मात्र त्यांनी त्या जगवल्या आहेत.

एकूणच संपूर्ण चित्रपटात अभिनयापासून कलाकारांच्या लूकपर्यंत सर्व काही चांगलं आहे. चित्रपटात तब्बूचा एक कॅमियो आहे, तिला दिलेल्या वेळेनुसार ती ठीकच आहे. तर नोरा फतेही या चित्रपटात फक्त एका शो पिससारखी दिसतेय.

दिग्दर्शन आणि संगीत

चित्रपटाची सिनेमेटोग्राफी खूप कमालीची आहे. तर संगीतकार विशाल-शेखरनं आपल्या संगीताद्वारे प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय. ‘भारत’ चित्रपट अली अब्बास जफरनं दिग्दर्शित केलाय. चित्रपटातील काही सीन्स खूप जबरदस्त शूट केले गेले आहेत. देशाच्या फाळणीचं दृश्य बघतांना प्रेक्षकांच्या मनात काहूर माजतं. हा सीन चित्रित करताना अनेक संकटांचा सामना करावा लागला होता, असं जफरनं यापूर्वीच सांगितलंय. मात्र चित्रपटात हा सीन खूप जबरदस्त दिसतोय. तसंच एका काळातून दुसऱ्या काळात जातांना आपल्याला असं कुठेच वाटणार नाही की काही गडबड आहे. दिग्दर्शकानं सीन्स एकमेकांमध्ये चांगले गुंफलेले आहेत. चित्रपटातील प्रत्येक लहान-सहान गोष्टीवर त्यांनी लक्ष दिलं आहे.

अटारी बॉर्डरवरील टीव्हीत बघताना सलमानचा इमोशनल सीन प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणतो. चित्रपटातील सर्व इमोशनल सीन्सच्या बाबतीत दिग्दर्शकाचं कौतुक करावंच लागेल, कारण या सीन्समध्ये प्रेक्षक पूर्णपणे कलाकारांसोबत जोडले जातात. यातच दिग्दर्शकाचं यश आहे.

चांगल्या सीन्ससोबत चित्रपटात काही सीन जबरदस्ती घातल्यासारखे वाटतात. जसे जहाजावर समुद्रातील दरोडेखोर हल्ला करतात. तर काही ठिकाणी जबरदस्ती विनोद निर्माण केल्यासारखा वाटतो. हे सर्व एडिट करता आलं असतं. नोरा फतेहीची स्टोरीसुद्धा अव्हॉईड करता येऊ शकत होती. सलमानच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर त्याचे ५ लूक चित्रपटात बघायला मिळताहेत. पण त्याचा मेकअप त्याचं वय लपवू शकला नाही. दिशा पाटनी सोबतच्या क्लोजअप शॉटमध्ये सलमानचं वय कळून येतंय.

या चित्रपटात काही शुल्लक कमतरता सोडल्या तर ओव्हर ऑल फिल्म चांगली असून आपण आपल्या संपूर्ण कुटुंबीयांबरोबर बसून हा चित्रपट बघू शकतो. भाईजानची पुन्हा एकदा ईदच्या दिवशी जादू चालली आहे. सलमानची ही फिल्म आपल्याला जशी इमोशनल करते तशी ती हसायलाही लावते. आपण हा चित्रपट बघून बाहेर निघाल तेव्हा एक चांगला अनुभव मिळाला असेल. आपले पैसे वसूल करणारा हा चित्रपट आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी