Soorma Movie Review In Marathi:संघर्षाची कथा 'सूरमा', Diljit Dosanjh आणि Tapsi Pannuचा सॉलिड अभिनय

रिव्ह्यू टाइम
Updated Jul 18, 2018 | 17:00 IST | टाइम्स नाऊ मराठी
Critic Rating:

Soorma Movie Review In Marathi: हॉकीपटू संदीप सिंह यांच्या आयुष्यावर बेतलेला 'सूरमा' हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात संदीप सिंह याच्या आयुष्यातील अनेक प्रसंग अतिशय सफाईदारपणे चित्रित करण्यात आले आहेत. यावेळी दिग्दर्शकाने बऱ्याचदा प्रेक्षकांच्या मनालाही हात घातला आहे. वाचा सूरमा सिनेमाचा रिव्ह्यू.

Diljit Dosanjh Soorma
संदीप शर्मा बायोपीक सूरमा'मध्ये दलजीत दोसांझ   |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई : आमीर खानचा सिनेमा 'दंगल'नंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा बायोपिकचा सिलसिला सुरू झाला. सध्या संजय दत्तचा बायोपिक 'संजू' बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. याच दरम्यान भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंहचा बायोपिक सूरमा आज(१३ जुलै) प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात संदीप सिंहचा संघर्ष आणि त्याने भारतीय संघापर्यंत मारलेली मजल हा सर्व प्रवास यात दाखवण्यात आला आहे. हा सिनेमा १००० स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. 

साथिया, बंटी और बबली यासारखे हिट सिनेमा बनवणारे दिग्दर्शक शाद अली यांचे मागील काही सिनेमे मात्र फ्लॉप ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या करिअरबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण सूरमा हा सिनेमा शाद अली यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या सिनेमातून शाद हे जोरदार पुनरागमन करू शकतात. 

सिनेमाची कथा : 

सिनेमाच्या कथेची सुरूवात १९९४ साली पंजाबमधील कस्बा या एका छोटा गावातून सुरू होते. येथील प्रत्येक मुलगा हॉकी खेळण्याचं स्वप्न पाहतो. याच सर्व मुलांपैकी संदीप सिंह (दिलजीत दोसांझ) हा देखील असंच स्वप्न पाहत असतो. छोटा संदीप आपल्या कोचकडे हॉकी शिकायला जातो त्यावेळी कोचच्या कठोर वागणुकीमुळे संदीप हॉकी स्टिक सोडून देतो. त्यानंतर सिनेमा संदीप सिंहच्या तारूण्याकडे वळतो. इथे त्याच्या आयुष्यात एंट्री होते ती एका महिला हॉकी खेळाडू हरप्रीत सिंह (तापसी पन्नू) हिची. 

हरप्रीतला मिळवण्यासाठी संदीपच्या आयुष्यात पुन्हा एकदा हॉकीचा प्रवास सुरू होतो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यात ज्याप्रमाणे मोठा भाऊ अजित तेंडुलकरचं स्थान आहे. तसंच स्थान संदीपच्या आयुष्यात त्याचा मोठा भाऊ विक्रमजीत सिंह याचं आहे. विक्रमजीत सलग १२ वर्ष उत्कृष्ट खेळाडू असूनही त्याची भारतीय संघात निवड होत नाही. विक्रम सर्वातआधी संदीपचा ड्रॅग फ्लिक पाहतो आणि इथूनच सुरू होतो संदीपचा 'फ्लिकर सिंह बनण्याचा प्रवास. याचदरम्यान, एकदा ट्रेनमध्ये एक चुकून लागलेली गोळीने संदीप सिंह थेट कोमात जातो. 

१५ दिवसानंतर तो जेव्हा कोमातून बाहेर येतो त्यावेळी त्याला समजतं की, आता आपल्याला चालता येणार नाही. यानंतर खऱ्या अर्थाने संदीप सिंहचा खरा संघर्ष सुरू होतो. पुनरागमनाचा हा संघर्ष क्लायमॅक्स येता-येता त्याला खरा 'सूरमा' म्हणून जगासमोर आणतो. 

 

अभिनय : 

संदीप सिंहच्या भूमिकेसाठी दिलजीत दोसांझ ही अतिशय योग्य निवड आहे. संजूसाठी रणबीर कपूरने संजय दत्तला आत्मसात केलं आहे. पण सूरमामध्ये दिलजीत दोसांझने आपल्या नैसर्गिक अभिनयाने संदीप सिंह मोठ्या पडद्यावर जिवंत केला आहे. हरप्रीतची भूमिका साकारणारी तापसी पन्नू हिने देखील सिनेमात उत्कृष्ट अभिनय केला आहे. तापसीने आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की ती गंभीर आणि परिपक्व भूमिकाही साकारू शकते. या सिनेमात दिलजीत आणि हरप्रीत यांची केमिस्ट्री मस्तच जमून आली आहे. दुसरीकडे अंगद बेदीनेही आपल्या भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतली आहे. 

 

दिग्दर्शन : 

सिनेमाचं दिग्दर्शन कमाल आहे. शाद अलीने या सिनेमासाठी कुठे तरी नीरज पांडेला फॉलो केल्याचं दिसून येतं. सिनेमाची पटकथा दमदार आहे. जी प्रेक्षकांना २ तास ११ मिनिटांपर्यंत खिळवून ठेवते. या सिनेमात अनेक असे सीन आहेत की ज्यामुळे प्रेक्षक सिनेमाशी कनेक्ट होतात. पण सिनेमाचा  सुरूवातीचा भाग थोडासा संथ झाला आहे. फर्स्ट हाफने जर वेग पकडला असता तर सिनेमा पाहायला आणखी मजा आली असती. दुसरीकडे संगीताचा विचार केल्यास शंकर, एहसान आणि लॉय यांना फार काही कमाल करता आली नाही. 

 

 

का पाहावा? : 

या सिनेमाची कथा हाच या सिनेमाचा आत्मा आहे. हा सिनेमा तुम्हाला कधी 'एम. एस धोनी अनटोल्ड स्टोरी' तर कधी 'चक दे इंडिया'ची आठवण करून देईल. या सिनेमात सर्व मसाला आहे. सिनेमा पाहताना तुम्ही कधी खळखळून हसता तर कधी इमोनशल होता. पण गोष्ट नक्की आहे की जेव्हा सिनेमा पाहून तुम्ही बाहेर पडता त्यावेळी तुम्हाला प्रचंड सकारात्मक उर्जा मिळते. 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी