वेलकम होम रिव्ह्यू- स्त्रीचं खरं घर कोणतं? या वर्षांनुवर्ष पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधणारा प्रांजळ प्रयत्न

रिव्ह्यू टाइम
Updated Jun 14, 2019 | 07:50 IST | चित्राली चोगले
Critic Rating:

Welcome Home Movie Review: मृणाल कुलकर्णी हिची मुख्य भूमिका असलेला वेलकम होम हा मराठी सिनेमा अखेर रिलीज होतो आहे. सिनेमाचा विषय आणि आशय खरंच विचार करायला लावणारा आहे. सिनेमाचा आमचा सविस्तर रिव्ह्यू वाचा.

Welcome Home Marathi movie review
वेलकम होम रिव्ह्यू- स्त्रीचं खरं घर कोणतं? या वर्षांनुवर्ष पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधणारा प्रांजळ प्रयत्न 

पुरुष प्रधान समाजात वावरताना स्त्रियांना अनेक प्रश्न भेडसावतात आणि त्यातलाच एक जो आजवर अनुत्तरीत राहीलेला आहे, तो प्रश्न म्हणजे स्त्रीचं खरं घर कोणतं? याच प्रश्नाचा ठाव घेण्याचा प्रयत्न वेलकम होम हा सिनेमा करतो आणि मनातल्या दडलेल्या अनेक कप्प्यांना शिवून जातो. सिनेमात मृणाल कुलकर्णी डॉ. सौदामिनी ऊर्फ मिनीच्या भूमिकेत आहे आणि सिनेमा याच मिनीच्या अवती भवती रेखाटलेला आहे. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या राष्ट्रीय पुरस्कार विजेता जोडीचा हा 17वा एकत्रित सिनेमा. या दोघांचं दिग्दर्शन म्हणजे सिनेमाच्या अपेक्षा उंचावलेल्या असतात, त्यात दिग्गज कलाकारांची फौज या सिनेमात झळकरणार हे कळताच सिनेमाची भलतीच उत्सुकता होती. त्या अपेक्षेस सिनेमा खरा उतरला का, चला पाहुयात.

तर सिनेमाची कथा वसली आहे पुण्यात. अगदी आधुनिक कुटुंबाची ही कथा आहे. मिनीचं कुटुंब म्हणजे उच्च पदावर काम करत असेला नवरा सदानंद, पाचवीत शिकणारी मुलगी कुकी आणि वयोवृद्ध सासू माई. सिनेमा सुरू होताना या कुटुंबाची ओळख अगदी सहज रित्या होऊन जाते आणि तेव्हाच लक्षात येतं घरात झालेलं भांडण आणि कलहं. कुठलाही फापटपसारा न करता थेट विषयाला हात घालण्याची सुमित्रा-सुनील यांची पद्धत नेहमीच उत्तम ठरते, या सिनेमातही तेच झालंय. त्यामुळे सिनेमाच्या सुरूवातीलाच मिनी अनेक वर्ष कसाबसा चाललेला आपला संसार आणि आपलं घर सोडण्याचा निर्णय घेते. पण घरात नवरा नसताना वृद्धापकाळाने विस्मृती होत असलेल्या माई म्हणजेच आपल्या सासूला एकटं कसं सोडायचं म्हणून सामान आणि त्यांना घेऊन माहेरी रवाना होते. इतके वर्ष राहत असलेलं तिचं स्वतःचं घर तिला परकं वाटू लागतं म्हणून माहेरी आलेली मिनी इथे ही फार रमत नसते.

मिनीचे वडील आप्पा (डॉ. मोहन आगाशे) आणि आई विमल (उत्तरा बावकर) फारंच समजूतदार दाखवले आहेत. त्यात घरात मिनीची लहान बहिण मधुमती (स्पृहा जोशी) सुद्धा असते. या सगळ्यांमध्ये पुन्हा येऊन हायसं वाटत असलं तरी शेवटी त्या घरातून जाऊन बरीच वर्ष झाली असतात त्यामुळे तिथे सुद्धा सगळं बदललं असतंच. कितीही नाही म्हटलं तरी घरात बहिणीला होणारा थोडाफार त्रास मिनीच्या लक्षात येतोच आणि कुठेतरी हे घर सुद्धा आता आपलं राहीलं नाही हा विचार तिच्या मनाला स्पर्श करून जातो. यात अजून बऱ्याच घटना घडतात आणि वेगवेगळ्या टप्प्यावर सिनेमातली महत्त्वाची पात्र ओघाने येत आपलं काम करत सिनेमाला एक वेगळी उभारणी देऊन जात असतात. आप्पा यांच्या सारखे वडील, सुरेश (सुमीत राघवन) सारखा मित्र, आणि प्रदीप (सुबोध भावे) सारखा भाऊ, हे असे पुरूष जर एखाद्या स्त्रिच्या जीवनात असतील तर हे असे अनेक प्रश्न खुप सोपे होतील असं हा सिनेमा नक्कीच दर्शवतो. लग्न झालेलं नवऱ्याचं घर आपलं नसतं तर इतके वर्ष आई-वडिलांच्या घरी आपण जन्माला येतो, तिथे वाढतो, पण लग्न झाल्यावर ते घर सुद्धा एखाद्या स्त्रीला परकं होतं, मग स्त्रीचं खरं घर नेमकं कोणतं या पेचात मिनी एका टप्प्यावर येऊन पोहचते. पुढे या सगळ्यातून मिनी काय निर्णय घेते आणि तिला आपलं स्वतःचं खरं घर मिळतं का यासाठी सिनेमा बघावा लागेल आणि तो बघावा का असा जर तुमचा प्रश्न असेल तर त्यावर माझं उत्तर असेल, निश्चितच बघावा. अगदी प्रत्येकाने वेळात वेळ काढून हा सिनेमा पाहावा. सिनेमाची कथा, आषय-विषय तर खरंच विचार करायला लावणारा आहेच पण सिनेमातलं प्रत्येक कालाकाराचं काम कमाल झालं आहे. मृणाल कुलकर्णीने खरंच ही भूमिका कमाल वटवली आहे, तर मोहन आगाशे, उत्तरा बावकर, स्पृहा जोशी यांचा नैसर्गिक अभिनय मनाला भावतो आणि या पात्रांशी आपण जोडले जातो आपोआपच. या मुख्य पात्रांनी तर बॅटिंग केली आहेच पण त्याचसोबत छोट्यात छोट्या भूमिकेतले मिलिंद फाटक असो किंवा दिपा श्रीराम असो किंवा अगदी काही क्षणांसाठी सिनेमात दिसणारा सुबोध भावे असो, या कलाकारांनी सुद्धा भूमिकांना त्या काही वेळात उत्तम न्याय दिला आहे. त्यातही सगळ्यांचीच कामं उत्तम झाली असली तरी विशेष लक्ष वेधून घेतात ते माईचं कॅरेक्टर निभावणाऱ्या सेवा चौहान. त्यांनी केलेला अभिनय इतका सहज झाला आहे की अनेकदा यांना खंरच हा त्रास आहे का असा विचार मनात येतो.

सिनेमाचा वेग इतर कर्मशियल सिनेमांच्या तुलनेत थोडा कमी असला तरी सिनेमा बघताना कुठेही कंटाळा नक्कीच येत नाही. सिनेमात जितेंद्र जोशीवर चित्रीत एक गाणं आहे, ते गाणं तसं सिनेमात नसतं तरी त्याने काही फारसा फरक कथेला पडला नसता असं मला वाटतं. त्यात कथा एका प्रशस्त, शिकलेल्या कुटुंबाची दाखवली गेली आहे, त्याच जागी घरची परिस्थिती बेताची असणाऱ्या किंवा माहेरी पण चणचण असेल्या कुटुंबाची असती तर शेवट वेगळा असता का? असे प्रश्न सुद्धा माझ्या मनात आले. पण तरीही या सिनेमात दाखवलेली प्रगल्भता बघता किमान स्त्रिसांसाठी या एका गोष्टीवर विचार जरी होऊ लागला तरी पुरेसं आहे असं मला वाटतं. सिनेमाचा शेवट फारंच गोडं आणि हळवा आहे आणि त्या काही क्षणात या सिनेमाचा गाभा लपलेला आहे. अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे सिनेमात एक मुख्य पात्र ज्याच्यामुळे नाट्य घडतं ते पात्र सिनेमात कुठेच येत नाही पण त्याचा उल्लेख आणि वर्णन प्रत्येकाच्या तोंडून इतकं मार्मिकपणे पोहचतं की बघितलं नसताना पण ती व्यक्तीरेखा नजरेसमोर उभी राहते. न विसरता इथे नमूद करावसं वाटतं ते सिनेमाच्या संवादाबद्दल. हा सिनेमा शब्दांचा आहे, संवादांचा आहे, सिनेमातील शब्दांची पेरणी इतकी सुंदर झालीय आणि सहज तरी गहन असलेले संवाद म्हणजे क्या बात. त्यामुळे काही बारीक-सारीक गोष्टी सोडल्या तर सिनेमा एक उत्तम अनुभव देणारा ठरतो. सिनेमाच्या शेवटी मनात काहुर माजलेलं असतं खरं पण त्यातच एका भावनिक टप्प्यावर संपलेला हा सिनेमा बऱ्याच गोष्टी देऊन ही जातो. विचार करायला लावतो आणि कुठेतरी समाधान देतो. सिनेमागृहातून बाहेर पडताना एक समाधानकारक हास्य घेऊन आपण बाहेर पडतो हे नक्की. त्यामुळे हा सिनेमा चुकवू नका, नक्की बघायला जा आणि बघा सिनेमाच्या शेवटी तुम्हाला उत्तर मिळतंय का ते की, स्त्रीचं खरं घर कोणतं?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी