Yuva Dancing Queen: युवा डान्सिंग क्वीन हा नवीन डान्सिंग रिअॅलिटी शो लवकरच भेटीला

मालिका-ए-रोज
Updated Nov 29, 2019 | 20:38 IST | चित्राली चोगले

झी युवा वाहिनीवर लवकरच युवा डान्सिंग क्वीन हा नवा कोरा रिअॅलिटी शो भेटीला येणार आहे. नुकताच या शोचा पहिला प्रोमो भेटीला आला असून या शोबद्दल अधिक महािती जाणून घ्या. नेमकी कशी रंगणार नृत्याची चुरस वाचा सविस्तर.

a fresh new dancing reality show yuva dancing queen to begin soon on zee yuva
Yuva Dancing Queen: बहारदार नृत्याचा नजराणा घेऊन युवा डान्सिंग क्वीन हा नवीन डान्सिंग रिअॅलिटी शो लवकरच भेटीला  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • नवा कोरा डान्सिंग रिअॅलिटी शो 'युवा डान्सिंग क्वीन' लवकरच भेटीला येणार
  • सोनाली कुलकर्णी, कोरिओग्राफर मयुर वैद्य, परिक्षकांच्या खुर्चीत तर अद्वैत दादरकर सूत्रसंचालक
  • येत्या ११ डिसोबंरपासून झी युवा वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: झी युवा ही मराठी वाहिनी कायमच नवनवीन प्रयोग करताना दिसते. युवा प्रेक्षकांचा विचार करत काहीतरी नवीन देण्याचा विचार ही वाहिनी सतत करत असते. आजच्या पिढीची आवड लक्षात घेऊन, अत्यंत उत्कृष्ट आणि दर्जेदार असे कार्यक्रम प्रेक्षकांना देताना ही वाहिनी अग्रगण्य राहीली आहे. बऱ्याच गाजलेल्या मालिका आणि रिअॅलिटी शोजनंतर आता लवकरच 'युवा डान्सिंग क्वीन' हा एक नवीन बहारदार नृत्याचा कार्यक्रम झी युवा वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये नावाजलेल्या सेलेब्रिटींमध्ये मध्ये एक जंगी चुरस रंगेल. नुकताच हा नवा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी याबद्दल अवघ्या काही दिवसातंच बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

युवा डान्सिंग क्वीन हा अफाट सौंदर्य आणि बेफाम नृत्य यांची एक अकल्पनीय सांगड असेल. या कार्यक्रमात प्रेक्षकांना लोकनृत्य आणि कंटेम्पररी डान्स फॉर्म्स यांचा अनोखा मेळ पाहायला मिळेल. युवा डान्सिंग क्वीनमुळे आता ऐन थंडीत रंग चढणार, महाराष्ट्राचं टेंपरेचर वाढणार असं दिसत आहे. कार्यक्रमाचं नाव बघता यामध्ये सेलिब्रिटी क्वीन्स दिसणार असा अंदाज वर्तवला जात आहे. मराठीतल्या नावाजलेल्या अभिनेत्री एकमेकींसोबत चुरस करताना कार्यक्रमात दिसणार म्हणजे कार्यक्रमाची रंगत वेगळीच ठरेल हे नक्की. आपल्या लाडक्या अभिनेत्रींना त्यांच्या नृत्यातील अदा दर्शवताना बघणं हे प्रेक्षकांसाठी एक खास पर्वणी ठरेल हे काय वेगळं सांगायला नको.

 

 

विशेष म्हणजे कार्यक्रमाचा पहिला-वहिला प्रोमो नुकताच भेटीला आला आहे. या प्रोमोत दिसते ती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि तिच्या जोडीला आहे प्रसिद्ध कोरिओग्राफर मयुर वैद्य. हे दोघं या कार्यक्रमाबद्दल बोलताना दिसतात. त्यामुळे हे दोघं या कार्यक्रमाचे परिक्षक असतील असा अंदाज सुद्धा बांधला जात आहे. या दोघांचा नृत्यातील दांडगा अनुभव या वा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमासाठी नक्कीच फायद्याचं ठरेल. खुद्द उत्तम नृत्यांगना असलेली सोनाली नवीन अभिनेत्रींना तिच्या अनुभवाचे बोल नक्कीच देताना दिसेल.

या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक. गुणी नाट्यलेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून नाट्यवर्तुळात प्रसिद्ध असलेला अद्वैत दादरकर म्हणजेज माझ्या नवऱ्याची बायको फेम सौमित्र या हा युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून उत्तम कामगिरी बजावणारा अद्वैत आता ही सूत्रसंचालनची जबाबदारी कशी पार पाडेल याकडे प्रेक्षकांचं लक्ष असेल. सध्या या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली असली तरी प्रेक्षकांना तो पाहण्यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे. येत्या ११ डिसेबंरपासून युवा डान्सिंग क्वीन हा कार्यक्रम झी युवा वाहिनीवर दर बुधवार ते शुक्रवार रा. ९.३० वा. पाहता येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी