अभिनेत्री पत्नी निशाला मारहाण केल्याच्या आरोपावरून अभिनेता करण मेहराने खाल्ली जेलची हवा 

टीव्ही अभिनेता करण मेहराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याची पत्नी निशा रावलने घरगुती हिंसाचार करत असल्याचे आरोप त्याच्यावर केले आहेत. सोमवारी रात्रीच निशाने करणविरोधात तक्रार दाखल केली होती.

actor karan mehra arrested after a complaint of his wife actress nisha rawal of domestic violence
पत्नीला मारहाण प्रकरणी अभिनेता करण मेहराची अटक सुटका  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • टीव्ही अभिनेता करण मेहराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
  • त्याची पत्नी अभिनेत्री निशा रावलने घरगुती हिंसाचार करत असल्याचे आरोप त्याच्यावर केले आहेत.
  • सोमवारी रात्रीच निशाने करणविरोधात तक्रार दाखल केली होती.

मुंबई : अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावल यांच्यात अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते.  आता पत्नी निशासोबत घरगुती हिंसाचार केल्याच्या आरोपाखाली करणला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.  करणचा गोरेगाव पोलीस ठाण्यात  जबाब नोंदवून घेण्यात आला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा त्याची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. 

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, निशाने सोमवारी ३१ मे रोजी गोरेगाव पोलीस ठाण्यात करणविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. निशाने करणवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून करणला तातडीने ताब्यात घेण्यात आले आहे.

करण आणि निशा यांच्या लग्नाला नऊ वर्षे झाली आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरू असल्याचे वृत्त वारंवार समोर येत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी निशाने करणशी कोणताही वाद नसल्याचं सांगत या सर्व बातमींना अफवा म्हटलं होतं.

दरम्यान, टीव्ही मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये करण मेहरा मुख्य भूमिकेत दिसला होता. या मालिकेत करणबरोबर हिना खानही मुख्य भूमिकेत होती. याशिवाय करण 'बिग बॉस १०' आणि 'नच बलिये ५' मध्येही दिसला आहे. निशा रावलबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या शादी मुबारक या मालिकेत दिसत आहे. करण आणि निशाने २०१२ मध्ये लग्न केले होते आणि त्यांना चार वर्षांचा मुलगा कविश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी