मुंबईः झी मराठी या वाहिनीवरील 'अग्गबाई सासूबाई' ही लोकप्रिय टीव्ही मालिका बंद होत आहे. या मालिकेचे नवे पर्व (नवा सीझन) 'अग्गबाई सूनबाई' या नावाने दिसणार आहे. यासाठी 'अग्गबाई सासूबाई' ही टीव्ही मालिका काही वर्षांचे लीप घेणार आहे. नव्या पर्वात काही वर्षांनंतरचे कथानक आहे. (aggabai sasubai marathi tv serial replace with aggabai sunbai)
'अग्गबाई सूनबाई'मध्ये अभिजीत राजे असतील. त्यांची पत्नी आसावरी एका मोठ्या कंपनीची मालकीण झालेली दिसेल. या कंपनीचा कारभार आसावरी तिच्या लाडक्या बबड्या अर्थात सोहमच्या मदतीने सांभाळणार आहे. आसावरी आणि तिचा मुलगा बिझनेस सांभाळताना दिसतील. तर सोहमची पत्नी शुभ्रा एका मुलाची आई झालेली दिसेल.
'अग्गबाई सूनबाई'च्या प्रदर्शित झालेल्या ताज्या ट्रेलरमध्ये अभिजीत राजे घरी स्वयंपाक करण्यात गुंतलेले दिसत आहेत. आसावरी कंपनीत एका मीटिंगमध्ये बिझी असल्याचे दिसत आहे. घरात स्वयंपाक करत असलेल्या अभिजीत राजेंशी बोलत असलेली शुभ्राही ट्रेलरमध्ये दिसते. शुभ्राच्या कडेवर एक मुल दिसत आहे. पण सोहम अद्याप दिसलेला नाही.
प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये अभिजीत राजेंच्या भूमिकेत डॉक्टर गिरीश ओक, आसावरीच्या भूमिकेत निवेदिता सराफ दिसत आहेत. शुभ्राच्या अर्थात सूनबाईच्या भूमिकेत तेजश्री प्रधान ऐवजी उमा पेंढारकर दिसत आहे. याआधी उमाने स्वामिनी मालिकेत पार्वतीबाई ही भूमिका साकारली होती. सोहमच्या भूमिकेत कोण आहे हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.
नव्या पर्वात आशुतोष पत्की पुन्हा एकदा सोहमच्या भूमिकेत दिसणार की नवा चेहरा येणार याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. लवकरच या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे.
'अग्गबाई सासूबाई'मध्ये पतीच्या अकाली निधनानंतर एकटीच्या जीवावर संसाराचा गाडा ओढणारी आसावरी दाखवली होती. मुलाच्या लग्नानंतर घरात आलेली सून तिच्या सासूच्या अर्थात आसावरीच्या आनंदाचा विचार करते. आसावरीचा पुनर्विवाह व्हावा आणि तिने पुढील आयुष्य आनंदात घालवावे यासाठी सून साकारणारी शुभ्रा प्रयत्न करते. या दरम्यान आलेल्या प्रत्येक अडचणीला हुशारीने तोंड देत शुभ्रा समस्यांवर उपाय शोधते असे दाखवले होते. मालिकेत सासूबाई अर्थात आसावरीच्या आनंदासाठी शुभ्राच्या नेतृत्वात घरातल्यांनी तसेच शेजाऱ्यांनी केलेले प्रयत्न प्रामुख्याने दाखवले होते.
शुभ्राची आसावरीसाठी धडपड सुरू असताना आलेल्या अपेक्षित आणि अनपेक्षित अशा अनेक अडचणी कशी सोडवल्या गेल्या आणि पुढे आसावरीचे जीवन आनंदी झाले की नाही हे सांगणारी गोष्ट म्हणजे 'अग्गबाई सासूबाई'. ही मालिका संपत आहे. मालिकेचे शेवटचे काही भाग उरले आहेत.
झी मराठी या वाहिनीवर 'अग्गबाई सासूबाई'चे नवे पर्व (नवा सीझन) 'अग्गबाई सूनबाई' या नावाने दिसणार आहे. या नव्या पर्वाचे कथानक शुभ्राच्या जीवनातील आव्हाने आणि ती आव्हाने सोडवण्यासाठी कोण काय करते या संदर्भातले असेल अशी चर्चा सुरू आहे. पण मालिकेच्या प्रॉडक्शन टीमकडून अथवा झी मराठी वाहिनीकडून या संदर्भात अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही. फक्त 'अग्गबाई सूनबाई'चा एक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये अभिजीत राजे (डॉक्टर गिरीश ओक), आसावरी (निवेदिता सराफ) आणि शुभ्रा (उमा पेंढारकर) दिसत आहे. मालिकेबाबतच्या अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळण्याची शक्यता आहे. 'अग्गबाई सूनबाई' ही मालिका झी मराठी वाहिनीवर १५ मार्चपासून सुरू होत आहे. ही मालिका सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री साडेआठ वाजता दाखवली जाणार आहे. झी मराठी वाहिनीवर 'उत्सव नात्यांचा नवा कथांचा' अंतर्गत 'अग्गबाई सूनबाई' ही मालिका दाखवली जाणार आहे. नव्या मालिकेत नात्यांमुळे निर्माण झालेले प्रश्न आणि नात्यांच्या माध्यमातून होणारी प्रश्नांची उकल बघायला मिळेल.