[VIDEO] Bigg Boss 13: बिग बॉस १३च्या नवीन प्रोमोमध्ये सलमानचा हटके अंदाज, ‘या’ तारखेला सीझन सुरु

मालिका-ए-रोज
Updated Sep 17, 2019 | 09:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

बिग बॉस हिंदीचं १३वं सीझन बरंच चर्चेत आहे. सगळ्यांचं त्याकडे लक्ष लागलेलं असतानाच या सीझनचा नवीन प्रोमो भेटीला आला आहे. प्रोमोमध्ये दिसतो सलमानचा हटके अंदाज आणि त्याचसोबत या सीझन सुरु होण्याची तारीख देखील कळते.

bigg boss 13 new promo is out with salman khan in chef look and it reveals show’s release date and time
[VIDEO] Bigg Boss 13: बिग बॉस १३च्या नवीन प्रोमोमध्ये सलमानचा हटके अंदाज, ‘या’ तारखेला सीझन सुरु  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस सीझन १३चा नवीन प्रोमो रिलीज
  • शेफच्या लूकमधला होस्ट सलमान खानचा हटके अंदाज
  • सीझनची रिलीज डेट आणि वेळ अखेर सलमानने केली जाहीर

मुंबई: बिग बॉस या रिअॅलिटी शोमधील विविध भाषांच्या तुलनेत बिग बॉस हिंदी हे प्रचंड गाजलं आहे. आता या हिंदी बिग बॉसचं १३वं सीझन सुरु होणार आहे. यंदा मात्र शोचा होस्ट सलमान खान सज्ज झाला आहे ते या सीझनला एका वेगळ्याच लेव्हलवर नेण्यासाठी. नुकताच या सीझनचा नवीन प्रोमो रिलीज केला गेला आहे आणि त्यात दिसतो होस्ट सलमानचा हटके अंदाज. एका शेफच्या लूकमध्ये सलमान या प्रोमोमध्ये दिसून येतो जो खिचडी बनवत आहे. यावेळी सांगतो की, तो लवकरच खिचडी बनवणार आहे तडका देत पण येणारे स्पर्धक मात्र ‘रायता फैलायेंगे’ म्हणजेच गोंधळ घालणार आहेत असं त्याचा अर्थ आहे. त्याचसोबत तो यंदाच्या सीझनबद्दलची एक अनोखी गोष्ट देखील रिव्हील करतो.

सलमान या प्रोमोमध्ये सांगताना दिसतो की ४ आठवड्यातंच फिनाले येणार आहे. प्रोमोच्या शेवटी कळते यंदाच्या सीझनची रिलीज डेट आणि वेळ सुद्धा. बिग बॉस १३ येत्या २९ सप्टेंबरपासून ऑन एअर जाणार असून विकडेला रात्री १०.३० वाजता तर विकेंडला रात्री ९ वाजता हा सगळ्यांचा लाडका शो पाहता येणार आहे. या सीझनची उत्सुकता ताणली गेली असतानाच हा उत्कंठावर्धक नवीन प्रोमो म्हणजे ही उत्सुकता शिगेला पोहचवणं आहे. सलमानने प्रोमोत जाहीर केल्याप्रमाणे जर ४ आठवड्यात फिनाले असणार आहे तर मग पुढचे २ महिने नेमकं सीझनमध्ये होणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नेमकं काय म्हणाला आहे सलमान त्यासाठी हा प्रोमो नक्की पाहा.

बिग बॉस १३ अनेक कारणांसाठी वेगळा ठरणार असं दिसतंय. यंदा बिग बॉसच्या घरात फक्त सेलिब्रिटी दिसणार असं बोललं जात आहे. तर या वेळेला बिग बॉस हिंदी लोणावळ्यात नाही तर मराठी बिग बॉस झालं तिथेच गोरेगाव फिल्मसिटीमध्ये पार पडेल. तसंच या वेळेची अनोखी गोष्ट म्हणजे यंदा घरात एक नाही तर बिग बॉस म्हणून दोन आवाज घुमणार आहेत. त्यातही एक आवाज पुरुषाचा तर पहिल्यांदाच एक महिला बिग बॉस म्हणून आदेश देताना दिसेल. त्यात या नवीन प्रोमोमध्ये सल्लू मियाँने दिलेल्या माहिती प्रमाणे एक वेगळाच ट्विस्ट असणार आहे. यंदा ४ आठवड्यात फिनाले येणार आहे म्हणजे ४ आठवडे एलिमिनेशन नसणार असं असेल का? पण तसं तर होणार नाही, त्यामुळे बिग बॉस कसं-काय रंगणार त्याकडे आता लक्ष लागलं आहे.

अशातंच या सीझनबद्दल अजून एक गोष्ट ऐकण्यात येत आहे आणि ते म्हणजे यंदाच्या पहिल्या एलिमिनेशबद्दल खुद्द सलमान निर्णय घेणार आहे. त्यामुळे ही एक गोष्ट सुद्धा यंदाच्या सीझनबद्दल वेगळी ठरेल. तसंच या सीझनसाठी असलेल्या नावांच्या चर्चेत राजपाल यादव, शालीन भानोत, करन पटेल, दलजीत कौर यांची नाव घेतली जात आहेत. नुकतंच कृष्णा अभिषेकची बहिण आरती सिंगने ती या सीझनमध्ये दिसणार असल्याचा खुलासा केला आहे. या व्यतिरिक्त मात्र, इतर नावांबद्दल अद्यापतरी फायनल असं काही कळलेलं नाहीये. बाकी काही असलं तरी यंदाचा सीझन काहीतरी हटके करणार हे अगदी निश्चित आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी