Bigg Boss 13: पुन्हा रंगला घरात नवीन नॉमिनेशन टास्क, बिबी बँक आणि 'या' मुली झाल्या आठवड्यासाठी अनसेफ

मालिका-ए-रोज
Updated Oct 15, 2019 | 13:41 IST | चित्राली चोगले

बिग बॉस १३ घरात सध्या बरेच वेगवेगळे बदल होताना दिसतायेत. हा सीझन अनेक कारणांसाठी वेगळा ठरतोय. नुकताच विकेन्ड वारमधून डबल एलिमिनेशन झाल्यानंतर घरात पुन्हा नवीन नॉमिनेशन टास्क रंगला आणि दोन मुली झाल्या नॉमिनेट.

bigg boss 13 newnomination task bb bank ends with 2 girls being nominated for this week
Bigg Boss 13: पुन्हा रंगला घरात नवीन नोमिनेशन टास्क बिबी बँक आणि 'या' मुली झाल्या या आठवड्यासाठी अनसेफ  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस १३च्या घरात नवीन नॉमिनेशन टास्कची धूम
  • बिबी बँक रंगताच घरात घडल्या अजब घडामोडी
  • टास्क अंती दोन मुली झाल्या या आठवड्यासाठी नॉमिनेट

मुंबई: बिग बॉस 13 सीझन दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत आहे. यंदाच्या सीझनमध्ये अनेक नवीन बदल, नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या सीझनबद्दल एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच कुतूहल सुद्धा फार आहे. यंदा पहिल्याच आठवड्यात कोणालाही एलिमिनेट केलं गेलं नाही पण दुसऱ्या आठवड्यात मात्र डबल एलिमिनेशन पाहायला मिळालं. बिग बॉस १३चा विकेंड का वार धमाकेदार रंगला आणि होस्ट सलमान खानने एक नाही तर दोन स्पर्धकांना घराबाहेर काढलं. त्यातली एक होती हिंदी छोट्या पडद्यावरची अभिनेत्री दलजीत कौर तर दुसरी होती ‘साकी साकी...’ गाणं फेम अभिनेत्री कोयना मित्रा. या दोघींनी नुकतीच घरातून रजा घेतली आणि लगेचंच पुन्हा एकदा घरात रंगला तो नवीन नॉमिनेशन टास्क बिबी बँक. 

या सीझनमध्ये पहिल्यांदाच घडत आहे की, मुलं मुलींना नॉमिनेट करत आहेत आणि मुली मुलांना नॉमिनेट करत आहेत. त्यातही असं ठरवलं गेलं होतं की पहिल्या चार आठवड्यात म्हणजे पहिला फिनालेच्या आत एकही मुलगा घरातून बाहेर जाणार नाही. पण नुकताच हा नियम बदलला गेला आणि या आठवड्यात मुलंसुद्धा नॉमिनेट झाली आहेत. एका टास्क दरम्यान सिद्धार्थ शुक्ला नॉमिनेशन पासून वाचला आणि इतर चार मुलं आसीम खान, अबू मलिक, सिद्धार्थ डे आणि पारस छाब्रा घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये मुलींचा नॉमिनेशन टास्क बिबी बँकमध्ये फारच घडामोडी घडताना दिसल्या.

बिबी बँकसाठी प्रत्येक मुलाला एक रक्कम देण्यात आली होती. तर मुलींच्या दोन टीम्स बनवल्या गेल्या. टीम ए मध्ये होत्या रश्मी देसाई, माहिरा शर्मा आणि देवोलीना भट्टाचार्यजी. तर टीम बी मध्ये होत्या शेहनाझ गील, शेफाली बग्गा आणि आरती सिंग. ज्या मुलींच्या टीमला सगळ्यात जास्त रक्कम मिळवण्यात यश मिळेल ती टीम नॉमिनेशन पासून सेफ होईल असं जाहीर झालं. टास्क सुरु व्हायचा बझर वाजताच टास्कला जोरदार सुरुवात तर झाली पण ठरल्याप्रमाणे भांडण आणि वाद होताना दिसले.

टीम बीकडे जिंकण्यासाठी जास्त कल होता कारण घरात असलेले सिद्धार्थ शुक्ला, असीम आणि अबू हे तिघं या टीम मधल्या शेहनाज आणि आरतीच्या जास्त जवळचे आहेत. पण तरीही या टीममध्ये शेफाली असल्यामुळे थोडीशी शास्वती नव्हती. टीम एमध्ये असलेली देवोलीना ही या आठवड्यात क्विन झाल्यामुळे आधीच सेफ  आहे. त्यामुळे माहिरा आणि रश्मीच्या डोक्यावरती टांगती तलवार असणार होती जर टीम हरली तर. सिद्धार्थ डे हा शेफालीचा जवळचा असल्यामुळे तो शेफालीला त्याच्याकडचे सगळे पैसे देईल असा अंदाज वर्तवला जात होता. बझर वाचताच अनेक गोष्टी बदलताना दिसल्या. सिद्धार्थ डेने सर्व पैसे शेफालीला दिले नाहीत, असीमचे पैसे चोरी करण्यात देवोलीनाला काहीसं यश मिळालं. पण टीम बीकडे कल असलेला सिद्धार्थ शुक्ला हा त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहिला. त्यात अबूनी सुद्धा टीम बिला त्यांच्याकडचे सगळ्यात जास्त पैसे दिले. त्यामुळे टीम बीकडे जास्त रक्कम आली आहे असं दिसून येत होतं.

देवोलीनाने टीम बीकडचे सुद्धा पैसे चोरण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये झटापटी झाली आणि थोडासा वादही झाला. शेफाली आणि देवोलीनामध्ये भांडण आणि थोड्या प्रमाणात मारामारी होते की काय अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झाली. अखेर टास्क संपल्याचा बझर झाला आणि बिग बॉसने जाहीर केलं की कुठल्या टीमकडे सगळ्यात जास्त पैसे आहेत हे सिद्धार्थ शुक्ला आणि पारसने जाहीर करावं. पण पारस आणि सिद्धार्थ शुक्लामध्ये पुन्हा एकदा वाद झाला त्यामुळे बिग बॉस यांनी सगळी सूत्रं आपल्या हातात घेतली. अखेर काही वेळाने जाहीर केलं गेलं की टीम बीकडे पंधरा हजाराच्या आसपास रक्कम होती तर टीम ए कडे फक्त नऊ हजारच जमले होते. त्यामुळे टीम बी विजेती म्हणून जाहीर झाली. त्यातल्या शेहनाझ, शेफाली आणि आरती यंदाच्या नॉमिनेशनपासून सेफ झाल्या. तर टीम ए मधील देवोलीना सेफ असल्यामुळे रश्मी आणि माहिरा नॉमिनेट झाल्या. या आठवड्याला सुद्धा डबल एलिमिनेशन असणार आहे. एक मुलगा आणि एक मुलगी घराबाहेर होणार असल्याचं आधीच जाहीर झालं आहे. त्यामुळे यंदा मुलांमध्ये सिद्धार्थ डे, अबू, आसीम आणि पारस तर मुलींमध्ये रश्मी आणि माहिराच्या डोक्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार लटकत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी