बिग बॉस 13चा ग्रॅण्ड फिनाले फेब्रुवारीमध्ये, अधिक आठवड्यांसाठी सलमानला मिळणार 'इतकं' मानधन?

मालिका-ए-रोज
Updated Nov 27, 2019 | 22:15 IST | चित्राली चोगले

बिग बॉस हिंदीचं 13वं सीझन सध्या जोरदार सुरूय. सीझनचा ग्रॅण्ड फिनाले जानेवारी महिन्यात पार पडणार होता पण आता त्यात बदल होत या सीझनला एक्सटेंशन मिळालंय असं समजतंय. तर वाढीव आठवड्यांसाठी सलमान जादा मानधन घेणारय?

bigg boss 13 to get an extension salman khan to charge extra fees for the extra 5 weeks
बिग बॉस 13चा ग्रॅण्ड फिनाले जानेवारी नाहीतर फेब्रुवारीमध्ये होणार,अधिक आठवड्यांसाठी सलमान आकारणार येवढं मानधन?  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बिग बॉस हिंदीचं 13वा सीझन सध्या जोरदार सुरू आहे. या सीझनमध्ये फक्त सेलिब्रिटिज पाहायला मिळत आहेत. सिझन एका अनोख्या नोटवर सुरू झालं आणि एका महिन्याच्या आतच सीझनचा पहिला फिनाले आला सुद्धा. त्या पहिला फिनालेला जवळपास अर्ध घर रिकामं झालं आणि नवीन सदस्यांची एन्ट्री झाली. सध्या घरात बरीच समीकरणं बदलली असून दोन नवीन ग्रुप तयार झाले आहेत. या ग्रुपमध्ये होणारी भांडणे, रुसवे-फुगवे आणि मैत्री यामध्ये सध्या बिग बॉसचं वातावरण एकदम तापलेलं आहे. पहिला फिनाले तर उत्तम रंगला पण आता लक्ष आहे ते या सीझनच्या ग्रॅण्ड फिनालेकडे. पण यात आता फेरबदल करण्यात आले आहेत असं समजतंय.

सूत्रांच्या माहितीनुसार, बिग बॉस 13चा ग्रॅण्ड फिनाले ठरल्याप्रमाणे जानेवारी महिन्यात नाही तर फेब्रुवारीमध्ये पार पडणार आहे. असं बोललं जात आहे की यंदाच्या सीझनला पाच आठवड्याचं एक्स्टेंशन मिळालं आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये पार पडणारा ग्रॅण्ड फिनाले आता फेब्रुवारी महिन्यामध्ये रंगताना दिसेल. या बिग बॉस हिंदीचा सगळ्यात मोठा USP आहे त्याचा होस्ट बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान. असं ऐकण्यात येत आहे की, सीझनला जरी एक्स्टेन्शन मिळालं असलं तरी सलमानकडे मात्र पुढच्या पाच आठवड्यांना देण्यासाठी तारखा नव्हत्या. मात्र त्यावर देखील चॅनलने तोडगा काढला आहे असं समजतंय.


असं बोललं जात आहे की बिग बॉस 13 सीझनला 5 आठवड्याचा एक्सटेंशन मिळताच सलमानने पुढचे पाच आठवडे शोसाठी देण्यास नकार दिला. त्याच्या इतर कमिटमेंट असल्या कारणाने त्याला पुढे वेळ देणं शक्य नव्हतं. अखेर कलर्स चॅनलने त्याला त्याचं मानधन वाढवून देण्याचं कबूल केलं. फार चर्चा झाल्यानंतर सलमानने यापुढे या वाढीव पाच आठवड्यांसाठी बिग बॉस करण्यासाठी होकार दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सलमानला त्याच्या सध्याच्या मानधना पेक्षा 2 कोटी रुपये वाढवून देण्यात आले आहेत असं सुद्धा समजतंय.

यंदाच्या सीझनसाठी होस्ट सलमान 13 कोटी दर आठवड्याला मानधन घेत होता म्हणजे 6.5 कोटी दर एपिसोडसाठी असा हिशोब होतो. आता या वाढीव पाच आठवड्यांसाठी त्याचं मानधन प्रत्येक एपिसोडसाठी 8.5 कोटी असणार आहे. पूर्ण सीझनचं बघितलं आणि सूत्रांची माहिती खरी असली तर या सीझनसाठी तब्बल 200 कोटी सलमान घरी घेऊन जाणार आहे.


बिग बॉस हिंदी सीझन 4पासून शोचा होत असलेला सलमान दरवर्षी शोमधून बाहेर पडणार अशी चर्चा दरवर्षी रंगते पण दरवर्षी चॅनल त्याला त्याचं मानधन वाढवून देतं आणि तो शोमध्ये परतताना दिसतो. खरंतर सलमान खान बिग बॉसचा फेस आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. सलमानमुळे शोला बराच फायदा होताना दिसतो. सध्या या बिग बॉस 13ला मिळालेलं हे 5 आठवड्यांचं एक्स्टेन्शन नक्की पार पडतं का की ठरल्याप्रमाणे जानेवारी महिन्यातंच ग्रॅण्ड फिनाले रंगतो ते येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईलच.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी