Bigg Bossमध्ये मराठीचा अवमान, आक्रमक मनसे आणि शिवसेनेने म्हटलं माफी मागा अन्यथा...

Bigg Boss14: बिग बॉस १४ मध्ये जान कुमार सानू या स्पर्धकाने मराठी भाषेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करुन अवमान केल्याने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी शिवसेना आणि मनसे आक्रमक झाले असून माफी मागण्याची मागणी केलीय.

Bigg Boss contestant Jaan Kumar Sanu
Bigg Bossमध्ये मराठीचा अवमान, आक्रमक मनसे आणि शिवसेनेने म्हटलं माफी मागा अन्यथा... 

मुंबई : टीव्हीवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसचा सध्या १४वा सिझन (Bigg Boss 14 season) सुरु आहे. यामध्ये मंगळवारच्या एपिसोडमध्ये स्पर्धक जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) याने मराठी भाषेचा अवमान केल्याने संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारच्या एपिसोडमध्ये जान कुमार सानू आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli) यांच्यात वाद सुरू होता. याच दरम्यान जान कुमार सानू याने मराठी भाषेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. मराठी भाषेची चीड येते असं म्हणणाऱ्या जान कुमार सानू याच्या विरोधात शिवसेना (Shiv Sena) आणि मनसे (MNS) चांगलीच आक्रमक झाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत जान कुमार सानू याला मनसे स्टाईलमध्ये इशाराच दिला आहे. अमेय खोपकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं, "जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला."

यानंतर अमेय खोपकर यांनी आणखी एक ट्वीट करत म्हटलं, "मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंड कशी असतात ते समजलं."

तर शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनीही जान कुमार सानू याच्या वक्तव्यानंतर ट्वीट करत म्हटलं, "Big Boss मालिकेचे शूटिंग महाराष्ट्रात होते, मराठी लोकांमुळे TRP वाढतो त्याच महाराष्ट्राच्या मराठीचा अवमान मालिकेतल्या जान कुमार सानूने केला हे कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात करिअर घडवलेल्या गायक कुमार सानूचा मुलगा मराठीचा द्वेष व अनादर करत असेल तर हे सहन केले जाणार नाही."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी