मुंबई: बिग बॉस मराठीमध्ये नुकताच अभिजीत केळकर एलिमिनेट होत घराच्या बाहेर पडला. नवीन एपिसोडमध्ये याचे पडसाद उमटताना दिसले आणि सगळीकडे नवीन खलबतं रचताना सुद्धा दिसली. या सीझनच्या फिनालेसाठी अवघे दोन आठवडे उरल्यामुळे आता प्रत्येकजण आपला खेळ त्या पद्धतीने खेळताना दिसणार आहे. त्यात अभिजीतसारखा स्ट्राँग कन्टेस्टंट घरातून गेल्याने अनेकांना आता खेळ कधीपण बदलू शकतो याचा अंदाज आला आहे. घरात नवीन दिवस सुद्धा त्याच नोटवर सुरु झाला आणि जिकडे-तिकडे याच चर्चा रंगताना दिसल्या. त्याचसोबत घरात थोडी धमाल मस्ती सुद्धा होताना दिसली.
अभिजीत बिचुकलेसोबत सगळेच स्पर्धक धमाल करताना दिसले आणि काही वेळ तरी खलबतं सोडून घरात काहीतरी वेगळं घडताना दिसलं. काही वेळाने घरात कॅप्टन्सी टास्कसाठी उमेदवार निवडण्याची संधी दिली गेली. पण बिचुकलेने अनेक नियम मोडल्याने त्याला शिक्षा म्हणून उमेदवारी दिली जाणार नाही असं जाहीर झालं. या निवडीसाठी गार्डन एरियामध्ये सगळ्या स्पर्धकांचे फोटो स्टँडवर लावले गेले होते. प्रत्येक बझरनंतर एका फोटोवर एका स्पर्धकाने जाऊन काळा स्प्रे मारत त्या स्पर्धकाला कॅप्टन्सी रेसमधून बाहेर काढायचं होतं. ज्या २ स्पर्धकांचा स्टँड शेवटी वाचेल त्यांना उमेदवारी मिळेल असा नियम होता. टास्क सुरु होताच नेहा पहिल्यांदा गेली कारण ती मागच्या आठवड्यात कॅप्टन होती आणि तिने हीनाच्या फोटोवर स्प्रे केलं. त्यानंतर वीणा गेली आणि तिने शिवानीच्या फोटोवर स्प्रे करत तिला कॅप्टनच्या रेसमधून बाहेर काढलं.
टास्क पुढे सरकला आणि आरोहने वीणाच्या फोटोवर स्प्रे केलं. त्यानंतर कोण जाणार यावर थोडे मतभेद होताना दिसले. शिवानीने आधी जाण्याची इच्छा व्यक्त केली पण नंतर समोर फक्त नेहा, किशोरी, आरोह आणि शिवचे फोटो उरले म्हंटल्यावर ती धर्म संकटात सापडली. किशोरी आणि शिवसोबत तिने डील केलं होतं. तर नेहा तिची मैत्रीण आणि आरोह तिचा मित्र असल्याने त्यांना सुद्धा ती बाहेर काढू शकच नव्हती. पण सगळ्यांनी तिलाच जाण्यासाठी सांगितलं आणि ठरल्याप्रमाणे शिवानी गेली आणि तिने नेहाच्या फोटोवर स्प्रे करत तिला कॅप्टन्सी रेसमधून बाहेर काढलं.
त्यानंतर पुन्हा एकदा आता कोण जाणार यावर बराच वाद झाला कारण हा निर्णायक बझर होता. हीना जाण्यासाठी तयार होती ज्याला वीणा, शिव, किशोरी आणि बिचुकलेची संमती होती. पण या वेळेला शिव, किशोरी आणि आरोह यांचे फोटो उरल्यामुळे हीना आरोहला काढणार असा अंदाज शिवानी, नेहा आणि आरोहला आला होता. त्यामुळेच तिच्या जाण्याच्या हे तिघं विरोधात होते. अखेर थोड्या वादानंतर आणि बऱ्याच चर्चेनंतर हीनाच गेली आणि तिने आरोहला बाहेर काढलं. अखेर यावर टास्क संपल्याची घोषणा बिग बॉस यांनी केली. त्याचसोबत किशोरी आणि शिव या आठवड्याचे कॅप्टन्सी उमेदवार असल्याचं सुद्धा जाहीर केलं. त्यामुळे यंदा रंगणारा कॅप्टन्सी टास्क कसा पार पडतो आणि अखेर कोण या १२व्या आठवड्याची कॅप्टन्सी आणि इम्युनिटी पटकवते ते पाहणं रंजक ठरेल.