बिग बॉस मराठीचं घर बनणार लव्ह स्कूल, पाहा नेमकं काय घडणार आज

मालिका-ए-रोज
Updated Jun 12, 2019 | 15:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bigg Boss House turns Love School: बिग बॉसच्या घरात 'शाळा सुटली पाटी फुटली' हे टास्क जोरदार सुरु आहे. आता आजच्या भागात घराचं लव्ह स्कूल होणार आहे कारण आता परागचा तास रंगणार असून त्याचा विषय आहे प्रेमशास्त्र.

Bigg Boss Marathi house gets love lessons from Parag Kanhere
बिग बॉस मराठीचं घर बनणार लव्ह स्कूल, परागकडून मिळणार प्रेमाचे धडे 

मुंबई: बिग बॉस मराठीमध्ये सध्या 'शाळा सुटली पाटी फुटली' हे साप्ताहीक टास्क एकदम जोरदार सुरु आहे. या टास्कमुळे बिग बॉसच्या घराच रुपांतर आता शाळेमध्ये झालं असून काही स्पर्धक शाळकरी मुलं तर काही शिक्षकांची भूमिका निभावताना दिसत आहेत. टास्कमध्ये दोन टीम्स नेमल्या गेल्या आहेत आणि त्यातली टीम बी सध्या शिक्षकांची भूमिका साकारत आहे तर टीम ए झाली आहे विद्यार्थी. आज हे टास्क पुढे सरकतान दिसेल. काल झालेला नेहा आणि शिवमधला वाद सोडला तर टास्क तसं धमाल सुरु आहे आणि त्यातली धमाल अधिक वाढणार आहे. ही शाळा आता लव्ह स्कूल बनणार आहे. कारण आता लवकरच परागचा तास शाळेत सुरु होताना दिसेल आणि परागचा विषय आहे प्रेमशास्त्र.

आतापर्यंत पराग सगळेच टास्क उत्तम खेळताना दिसला आहे. त्यामुळे या टास्कमध्ये सुद्धा तो काहीतरी वेगळी शक्कल लढवणाताना दिसेल. त्यामुळे उगाच शब्दांचा फाफटपसारा न करता तो या शाळेतल्या मुलांना त्याचा विषय प्रात्यक्षिक दाखवून शिकवणार आहे. प्रेमाचे धडे देण्यासाठी पराग विविध प्रात्यक्षिक दाखवत खेळात रंगत आणताना दिसेल हे नक्की. तर आज पराग रुपालीसोबत एक छान रोमॅन्टिक डान्स सादर करणार आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा रुपाली आणि परागची केमिस्ट्री तर अधोरेखित होईलंच त्याचसोबत हे टास्कसुद्धा अधिक रंजक होईल.

“तेरे से मॅरेज करने को मैं...” या गाण्यावर या दोघांचा परफॉर्मन्स होताच घरातले इतर स्पर्धक हाच मोका घेत या दोघांना पुन्हा एकदा एकमेकांच्या नावाने चिडवताना दिसणार आहेत. त्यामुळे टाक्समध्ये परफॉर्म करता-करता हाडाचा शेफ असलेला पराग स्वतःची पण पोळी भाजून घेणार आहे असंच दिसत आहे. या शिवाय तो शिव आणि वीणाचा उपयोग सुद्धा करुन घेत आपला विषय अधिक रंगवून शिकवणार आहे. या दोघांना सुद्धा एका प्रात्यक्षिकासाठी वापरणार असून शिवला तो वीणाला प्रपोज करायला लावणार आहे असं समजतंय. आता नेमकं कसं आणि काय करत हे प्रपोझल पार पडेल ते तर आज स्पष्ट होईलंच.

एकंदरीत हे शाळेचे टास्क बिग बॉसच्या घरात आजच्या दिवशी एकदम रंजक होत अधिक धमाल आणणार आहेत. त्यात पराग-रुपालीची केमिस्ट्री बघायला सध्या सगळ्यांना आवडत आहे. तिच या टास्कमध्ये खुलताना दिसणार असल्याने या टास्कची उत्सुकता आता वाढली आहे हे निश्चित. काल टास्कला थोडं गालबोट लागलं असलं तरी आज मात्र या टास्कची खरी मज्जा अनुभवायला प्रेक्षकांना मिळेल अशी आशा करुया आणि आजच्या या धमाल बिग बॉसच्या एपिसोडसाठी सज्ज होऊयात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी