Deepesh Bhan : 'भाबी जी घर पर हैं' या लोकप्रिय हिंदी टीव्ही मालिकेत मलखान ही भूमिका साकारणाऱ्या दीपेश भान याचे अकाली निधन झाले. दीपेश भान ४१ वर्षांचा होता. । मालिका-ए-रोज । झगमगाट
आज (शनिवार २३ जुलै २०२२) सकाळी दीपेश खान क्रिकेट खेळत होता. खेळत असताना दीपेश खान अचानक मैदानात कोसळला. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून दीपेश खान याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
'भाबी जी घर पर हैं' या मालिकेत मोहनलाल तिवारी ही भूमिका साकारणाऱ्या रोहिताश गौड याने दीपेश याच्या अकाली निधनाची माहिती कळताच शोक व्यक्त केला. शूटिंग उशिरा असल्यामुळे दीपेश आज जिम झाल्यानंतर क्रिकेट खेळण्यासाठी गेला. खेळत असताना तो मैदानावर कोसळला. त्याला लगेच डॉक्टरांकडे नेण्यात आले पण तोपर्यंत त्याचे प्राण गेले होते. ही दुःखद आणि धक्कादायक घटना असल्याचे रोहिताश गौड याने सांगितले. फिटनेस फ्रीक असूनही दीपेशला अचानक काय झाले हे मलाही समजलेले नाही, असेही रोहिताश गौड म्हणाले.
'भाबी जी घर पर हैं' मालिकेचे निर्माते संजय आणि बेनिफर कोहली यांनीही दीपेशच्या अकाली निधनाचे वृत्त कळल्याने दुःख झाले आणि धक्का बसला असे सांगितले. दीपेश त्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे करण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याच्या शोकाकूल नातलगांचे आम्ही सांत्वन करतो, असे संजय आणि बेनिफर कोहली म्हणाले.
दीपेश खान भाबी जी घर पर हैं, कॉमेडी का किंग कौन, कॉमेडी क्लब, भूतवाला, एफआयआर, सुन यार चिल मार या टीव्ही मालिका आणि शो मधून दिसला. दिल्लीत शिकलेला दीपेश करिअर करण्यासाठी २००५ मध्ये मुंबईत आला. त्याने करिअरमध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर २०१९ मध्ये दिल्लीतच लग्न केले. त्याला एक मूल आहे. दीपेश २०२१ मध्ये बाबा झाला होता. यामुळे त्याच्या अकाली निधनाचा कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसला आहे.