अक्कासाहेबांचा कायापालट, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतून नव्या रुपात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

मालिका-ए-रोज
Updated Oct 15, 2019 | 23:25 IST | चित्राली चोगले

लवकरच स्टार प्रवाहवर नवी मालिका रंग माझा वेगळा भेटीला येणारय. मालिकेची सध्या बरीच चर्चा आहे. या मालिकेबद्दल अजून एक गोष्ट चर्चेचा विषय ठरली आहे ती म्हणजे या मालिकेत अक्कासाहेब म्हणजेच हर्षदा खानविलकर दिसणार आहे

harshada khanvilkar all set to play a new character in new marathi serial rang majha vegla
अक्कासाहेबांचा कायापालट, नव्या रुपात ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला 

थोडं पण कामाचं

  • अक्कासाहेब म्हणजेच हर्षदा खानविलकर पुन्हा नव्या रुपात भेटीला येण्यासाठी सज्ज
  • सौंदर्या इनामदार म्हणून 'रंग माझा वेगळा' मालिकेत दिसणार
  • मालिका येत्या ३० ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: मराठी छोट्या पडद्यावर सध्या बरेच नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. याच सगळ्यात सध्या एका नवीन मालिकेची प्रचंड चर्चा आहे. स्टार प्रवाहवर ३० ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या प्रोमोजनी सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रोमोमधून मालिकेचा विषय अगदी छान मांडला गेला आहे. सौंदर्य म्हणजे फक्त गोरेपणा नव्हे तर आंतरिक सौंदर्यही तितकंच महत्त्वाचं आहे, हा विचार घेऊन रंग माझा वेगळा ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे ‘पुढचं पाऊल’ या मालिकेद्वारे अक्कासाहेबांच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेल्या हर्षदा खानविलकर रंग माझा वेगळा या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

पुढचं पाऊल मालिकेतून हर्षदा खानविलकर यांची अक्कासाहेब ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली होती. त्या फार लोकप्रिय ठरल्या. त्यांचं ‘कळलं’ हा तकिया कलाम तर फारंच लोकप्रिय होता आणि त्यांच्या शैलीत डायलॉग बोलण किंवा त्यांचा करारीपणा खूप गाजला. त्यांची अक्कासाहेब ही व्यक्तिरेखा आजही तितकीच लक्षाच आहे. आता हर्षदा या एका वेगळ्या अंदाजामध्ये नवीन मालिकेतून नव्या रुपात दिसणार आहेत. सौंदर्या इनामदार असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून हर्षदा यांचा निराळा अंदाज या मालिकेत पाहायला मिळणार आहे. तसाच त्यांचा लूकसुद्धा अक्कासाहेब या व्यक्तिरेखेपेक्षा खूप वेगळा असणार आहे.

रंग माझा वेगळा या मालिकेतील त्यांच्या व्यक्तिरेखेविषयी सांगताना हर्षदा म्हणाल्या, ‘या भूमिकेसाठी मी प्रचंड उत्सुक आहे. पुढचं पाऊल या मालिकेने माझं विश्व बदललं. ३ वर्षांहून अधिक काळ मी ज्या वाहिनीसोबत काम केलं त्या स्टार प्रवाह वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करताना माहेरी आल्याची भावना आहे. माझं नव्याने आयुष्य सुरु होतंय असं म्हटलं तरी चालेल. सौंदर्या इनामदार नावाप्रमाणेच सौंदर्यावर प्रेम करणारी अत्यंत करारी अशी बिझनेस वुमन आहे. तुम्ही सुंदर असाल तर जगावर राज्य करु शकता हा विचार मानणारी आणि त्याप्रमाणे वागणारी अशी सौंदर्या. पुढचं पाऊलच्या अक्कासाहेबांवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं आता सौंदर्यावरही तितकंच प्रेम कराल हा आत्मविश्वास आहे.’

या आधी पुढचं पाऊल या मालिकेमधील हर्षदा यांच्या अक्कासाहेब या लूकची बरीच चर्चा होती. तमाम स्त्री वर्गात अक्कासाहेबांच्या साड्या, त्यांचे दागिने आणि खास करुन त्यांचे गजरे प्रसिद्ध होते. रंग माझा वेगळा या आगामी मालिकेमधील त्यांचा लूकही हटके असणार आहे आणि तो सुद्धा लोकप्रिय ठरतो का ते पहावं लागेल. हा लूक नेमका कसा असेल ते पाहण्यासाठी नक्की पाहा नवीन मालिका रंग माझा वेगळा ३० ऑक्टोबरपासून रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी