मुंबईः चतुरस्त्र अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचं निधन झालं आहे. त्यांच्या अचानक जाण्यानं सगळ्यानांच धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. श्रीराम कोल्हटकर यांनी अनेक हिंदी आणि मराठी सिनेमातून काम केलं आहे. त्यांनी मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली. चित्रपच रंगभूमी आणि मालिकांमधील हरहुन्नरी अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती.
आपला माणूस, एक अलबेला, करले तू भी मोहबत्त, अ डॉट कॉम मॉम, उंच भरारी या आणि अशा अनेक सिनेमांतन त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. तसंच सध्या झी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका तुझ्यात जीव रंगला यात राणादा म्हणजेच हार्दिक जोशीच्या कुस्ती प्रशिक्षकाची त्यांची भूमिका सर्वांनाच आवडली. श्रीराम कोल्हटकर यांनी सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका सुद्धा तितक्याच ताकदीनं साकारल्या आहेत. सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका साकारून त्यांनी आपला वेगळाच ठसा सिनेमासृष्टी उमटवला. कोल्हटकर यांचा अभिनय हा चतुरस्त्र होता.
श्रीराम कोल्हटकर यांनी डोंबिवलीच्या टिळक नगर हायस्कूलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली. डोंबिवलीत राहून नाट्यसृष्टीत कार्य करणाऱ्या त्यांच्या वडिलांचं म्हणजे भालचंद्र कोल्हटकर यांचं काही महिन्यांपूर्वी वृद्धापकाळानं निधन झालं होतं.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अभिनेता राणादा म्हणजेच हार्दिक जोशी यांनी दुःख व्यक्त करत इंस्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर केली आहे. हार्दिकनं त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिलं की, भावपूर्ण श्रद्धांजली श्रीराम कोल्हटकर सर... तुमच्या सोबत काम करण्याचा योग आला बरंच काही शिकता आलं, तुम्ही कायम स्मरणात रहाल..
तसंच राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सुद्धा फेसबुकवर पोस्ट लिहून श्रीराम कोल्हटकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विनोद तावडे यांनी श्रीराम कोल्हटकर यांचा फोटो शेअर करत लिहिलं की, मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमधील साहाय्यक अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे आकस्मिक निधन अतिशय धक्कादायक आहे. या चतुरस्र अभिनेत्याच्या अनेक लक्षवेधी भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत. श्रीरामजींना भावपूर्ण श्रद्धांजली! मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.
श्रीराम कोल्हटकर यांचं शनिवारी निधन झालं. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचा मुलगा न्यूझीलंडला असल्यानं त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होतील.