‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत पुन्हा एक भावनिक वळण, ‘या’ पात्राचं होणार निधन

मालिका-ए-रोज
Updated Nov 04, 2019 | 16:53 IST | चित्राली चोगले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिका सध्या फारंच उत्तम सुरुय. मालिकेतील बाबासाहेबांचा जिवनप्रवास रेखाटला जात असतानाच मालिकेत पुन्हा एक दुःखद वळण येणारे आणि बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तिचं निधन होणारय

marathi serial dr babasaheb ambedkar to experience yet another emotional twist with ambedkar’s son’s demise
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत पुन्हा एक भावनिक वळण, ‘या’ पात्राचं होणार निधन  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत घडणार एक दुःखद घटना
  • मालिकेत पुन्हा एका भावनिक वळण आणि अजून एका महत्त्वाच्या पात्राचं निधन
  • आंबेडकर कुटुंबावर पुन्हा शोककळा

मुंबई: बाबासाहेबांचा जीवनपट उलगडणारी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. अवघ्या काही महिन्यात मालिकेने प्रेक्षकपसंती मिळवण्यात यश मिळवलं आहे. मालिकेत बाबासाहेबांच्या आयुष्याचा लढा, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बारकावे, इत्यादी अगदी उत्तम मांंडलं गेलं आहे. त्यात त्यांचा नियतीशी असलेला संघर्ष देखील दिसून येतो. मध्यंतरी मालिकेत बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक अत्यंत दुःखद घटना दाखवली गेली आणि प्रेक्षक भावुक झाले. बाबासाहेबांचे वडील म्हणजेज रामची बाबांचं देहावसान झालेलं दाखवलं गेलं. बाबासाहेब आणि कुटुंबावर त्या काळी काय शोककळा ओढवली असेल याचा अंदाज यावरुन नक्कीच आला, त्यानंतर त्यांचा मोठा भाऊ आनंदाचं देखील निधन झालेलं दिसलं. आता पुन्हा मालिकेत असंच काहीसं होताना दिसणार आहे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत आता पुन्हा एक भावनिक वळण आलं आहे. आई, वडिल आणि मोठा भाऊ आनंदाचं छत्र हरपल्यानंतर बाबासाहेबांच्या आयुष्यातली आणखी एक धक्कादायक घटना म्हणजे मुलगा गंगाधरचं निधन. बाबासाहेब शिक्षणासाठी लंडनला असताना रमाबाईंनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली होती. तोच काळ मालिकेत सध्या दर्शवला जात आहे. त्यावेळी कितीही केलं तरी अडचणी मात्र काही संपत नव्हत्या. घरी दोन वेळच्या जेवणाचीही चिंता अशा परिस्थितीत लहानग्या गंगाधरची तब्येत बिघडली. डॉक्टरांनीही पैश्यांअभावी उपचार करण्यास नकार दिला. चिमुकला गंगाधर आजारपणातून बरा होऊ शकला नाही आणि त्याने या जगाचा निरोप घेतला. बाबासाहेब आणि संपूर्ण सकपाळ कुटुंबाला हेलावून टाकणारी ही घटना.

लंडनमध्ये बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून रमाबाईंनी गंगाधरच्या निधनाबद्दल बाबासाहेबांना फार उशिरा कळवलं. रमाबाई म्हणजे फक्त मुलांची नाही तर संपूर्ण समाजाची माऊली होती हे या घटनेतून प्रकर्षाने जाणवतं. गंगाधरच्या निधनाच्या बातमीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रचंड अस्वस्थ झाले. समान अधिकारांसाठी करावा लागणारा संघर्ष, घरी हातभार लावू शकत नसल्याची खंत, लंडनमध्ये अभ्यासपूर्वक लिहिलेला ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध ब्रिटिश प्राध्यापकांकडून नाकारला जाणं आणि अशातच मुलगा गंगाधरच्या निधनाची बातमी या घटनांनी बाबासाहेबांच्या आयुष्यात उलथापालथ केली. पण बाबासाहेब खचले नाहीत. हाच सगळा बाबासाहेबांच्या आयुष्यातील कठीण काळ आता या मालिकेत पहायला मिळणार आहे.

या आणि अशा घटनांनी हिऱ्याला ज्याप्रमाणे तावून सुलाखून झळाळी मिळते त्याचप्रमाणे बाबासाहेबांना आणखी खंबीर बनवलं आणि हाती घेतलेलं कार्य पूर्ण करण्याची उमेद दिली. बाबासाहेबांचा संघर्ष आणि विचार आजही जनमानसात नवी प्रेरणा देतात. हेच मौल्यवान विचार पोहचवण्याचा प्रयत्न ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेतून केला जातोय. प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या निर्व्याज प्रेमामुळे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली आहे. त्यासाठी महामानवाची गौरवगाथा पाहायला विसरु नका सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी