घाडगे अॅण्ड सून मालिकेत अक्षय-अमृताची लगीनसराई रंगणार पण...

मालिका-ए-रोज
Updated Sep 11, 2019 | 17:23 IST | चित्राली चोगले

मराठी मालिका घाडगे अॅण्ड सूनमध्ये आता एक सुखद वळण अनुभवायला मिळणार आहे. प्रेक्षकांना असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे आणि आता अक्षय आणि अमृता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पण त्याचसोबत मालिकेत एक वळण येणार आहे.

marathi serial ghadge and sunn to witness the marriage of leads amruta and akshay
घाडगे अॅण्ड सून मालिकेत अखेर अक्षय-अमृताची लगीनसराई रंगणार पण... 

थोडं पण कामाचं

  • घाडगे अॅण्ड सून मालिकेत रंगणार अक्षय-अमृताची लगीनसराई
  • कियाराचा पत्ता कट, अखेर अक्षय-अमृताच्या सुखी संसाराला होणार सुरुवात
  • घाडगेंच्या या सुखात मात्र पडणार मिठाचा खडा

मुंबई: मराठी छोट्या पडद्यावरची घाडगे अॅण्ड सून मालिकेत गेले अनेक दिवस विविध ट्विस्ट अनुभवायला मिळत आहेत. अक्षय-अमृता-कियारा हे प्रेमाचं त्रिकुट आणि त्यांच्या अवती-भवती रचलेलं कथानक गेले अनेक दिवस मालिकेत रंगत आहे. अखेर आता मालिका एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे. गेले अनेक दिवस असेलेली प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपणार असून लवकरच मालिकेत लाडक्या अक्षय आणि अमृताची लगीनसराई अनुभवायला मिळणार आहे.

मध्यंतरी कियारा ही अक्षय आणि अमृताच्या आयुष्यातून निघून गेली होती पण मग मालिकेत एक ट्विस्ट आला आणि कियारा पुन्हा घाडगेंच्या घरात रहायला आली. या दरम्यान अक्षयला देखील अमृतावर असलेलं आपलं प्रेम जाणवलं. अमृता तर आधीपासून अक्षयच्या प्रेमात होतीच आणि आता तर आग दोनो तरफ बराबर लगी है. पण कियाराचं संकट काही केल्या या दोघांच्या आयुष्यातून जात नव्हतं. पण आता अखेर बरीच खलबतं रचलेल्या कियाराचा अखेर पत्ता कट होणार आहे. अक्षयने अखेर कियाराला घटस्फोट दिला असून त्याने अमृताकडे एक शेवटची संधी मागितली होती. अमृताने ती संधी अक्षयला दिली आणि त्याचसोबत माईसोबतंच घरातील इतरांनी देखील या दोघांच्या लग्नाला संमती दिली आहे.

त्यामुळे सगळी विघ्न आता टळली आहेत आणि अक्षय-अमृताचा विवाहसोहळा आता लवकरच मालिकेत अनुभवायला मिळणार आहे. मालिकेत या दोघांचं लग्न अगदी धूमधडाक्यात पार पडताना लवकरच दिसेल. अमृता कायम अक्षयच्या सगळ्या कठीण प्रसंगात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. हिच तिची सोबत आता अक्षयला साता जन्मासाठी लाभणार आहे. खऱ्या अर्थाने या दोघांच्या नात्याची गोड सुरुवात आता होताना दिसेल. यंदा मात्र कोणतीही गोष्ट आणि अट न ठेवता अमृता खऱ्या अर्थाने घाडगेंची सून म्हणून दारावरचं माप ओलांडणार आहे.

पण असं सगळं सुखी-समाधानी असलेल्या या घाडगे कुटुंबाचा हा आनंदाचा क्षण कायम टिकून राहणार आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी देणं कठीण आहे कारण नेहमीप्रमाणे घाडगेंच्या या आनंदात मिठाचा खडा पडणार आहे. विवाहसोहळा तर निर्विघ्नपणे पार पडेल असं वाटत आहे पण त्यानंतर मात्र मालिकेत एक वेगळंच वळण येणार आहे. घरात अमृताचा घाडगेंची सून म्हणून गृहप्रेवश तर होईल पण ती एकटीच या घरात गृहप्रवेश करणार नाही तर, तिच्यासोबत अजून एक गृहप्रवेश होताना दिसेल. आता ही नवीन व्यक्ती कोण आणि तिचा आता घाडगेंच्या आयुष्यात काय भाग असणार आहे ते पाहणं रंजक ठरेल. त्याशिवाय या नवीन एन्ट्रीने अक्षय-अमृताच्या आयुष्याला आता कोणतं नवीन वळण लागणार आहे ते पण पहावं लागेल. तसंच अनंताची बायको म्हणून चित्रा देखील घरात प्रवेश करेल. त्यामुळे येणारे पुढचे दिवस मालिकेत बरीच रंजक वळणं पहायला तर मिळतीलंच पण सगळ्यात महत्त्वाचं ठरेल ते या सगळ्यात पार पडणारं अक्षय-अमृताचं लग्न. ज्याची प्रतीक्षा बरेच महिने प्रेक्षक पाहत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...