Sur Nava Dhyaas Nava 3: आणि २२ स्पर्धकांसोबत ‘सूर नवा ध्यास नवा’च्या तिसऱ्या पर्वाची सुरेल सुरुवात

मालिका-ए-रोज
Updated Oct 03, 2019 | 18:07 IST | चित्राली चोगले

लोकप्रिय शो सूर नवा ध्यास नवाच्या नवीन पर्वाची घोषणा मध्यतरी झाली. नंतर त्याचे ऑडिशन्स देखील रंगले. अनेक फेऱ्यांनंतर अखेर या पर्वाचे २२ स्पर्धक निवडले गेलेत आणि त्यांच्याबत या पर्वाची सुरेल सुरुवात झाली आहे.

marathi singing reality show sur nava dhyas nava finally begins with 22 selected contestants
Sur Nava Dhyaas Nava 3: आणि २२ स्पर्धकांसोबत ‘सूर नवा ध्यास नवा’च्या तिसऱ्या पर्वाची सुरेल सुरुवात 

थोडं पण कामाचं

  • सूर नवा ध्यास नवाच्या तिसऱ्या पर्वाची सुरेल सुरुवात
  • मेगा ऑडिशन्समधून २२ स्पर्धकांची निवड
  • पुन्हा एकदा स्पृहाचं सूत्रसंचालन तर अवधूत-महेश परिक्षकांच्या खुर्चीत

मुंबई: दोन पर्वांनंतर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या शो सूर नवा ध्यास नवाचं तिसरं पर्व मध्यंतरी जाहीर झालं. पहिल्या पर्वात नावाजलेले गायक एकेमेकांसोबत चुरस करताना दिसले. तर दुसऱ्या पर्वात छोटे सूरवीर मनं जिंकून गेले. आता तिसऱ्या पर्वात काय, असा प्रश्न पडला असतानाच यंदा 'या रे या सारे या' ही थीम जाहीर झाली. यंदा ५ ते ५५ वयोगटातील स्पर्धक एकमेकांसमोर उभे ठाकणार हे स्पष्ट झालं. त्यानंतर या तिसऱ्या पर्वाचे ऑडिशन्स महाराष्ट्राभर रंगले. अखेर या पर्वाचे २२ स्पर्धक निश्चित झाले आणि या सूर नवा ध्यास नवा ३ची सुरेल सुरुवात झाली.

कलेला वयाची मर्यादा नसते असे म्हणतात, या सूत्राला घेऊन कलर्स मराठी वाहिनी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे ते प्रेक्षकांचा आवडता चैतन्यपूर्ण गाण्यांचा सांगीतिक कार्यक्रम सूर नवा ध्यास नवा – स्वप्न सूरांचे, स्वप्न सार्‍यांचे यासाठी. कार्यक्रमाचा रंगमंच सूर आणि ताल यांनी पुन्हा बहरणार, संगीत मैफलीचा अनुभव रसिकांना विविध वयोगटातील सूरवीर देणार. निवड झालेले २२ सूरवीरांचा आता सुरेल प्रवास सुरू झाला आहे.

मागील पर्वात स्पृहा जोशी सूत्रसंचालन करताना दिसली. तिच्या जोडीला तेव्हा छोटा मॉनिटर हर्षद नायबळ देखील होता. पण यंदा या सगळ्यात थोडेफार बदल होणार आहेत. मागील पर्वा प्रमाणेच महाराष्ट्राची लाडकी स्पृहा जोशी सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसेल हे नक्की, पण सगळ्यांचा लाडका मॉनिटर यंदा नसणार आहे. तशीच या सूरवीरांची पारख करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्यासोबत असणार आहे आपल्या स्वरांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे महेश काळे आणि अष्टपैलू अदाकार अवधूत गुप्ते. या परिक्षकांच्या जोडीला दोन पर्व असलेली गायिका शाल्मली कोलघडे देखील या पर्वाचा भाग नसेल. या पर्वाचा ध्यास देखील उत्तमातून उत्तम सुर शोधणे हाच असणार आहे. तेंव्हा सामील होऊया सुरांच्या या अनोख्या मैफिलीत सोम ते बुध रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

प्रत्येकाच्या आयुष्यात संगीताचे अनन्यसाधारण महत्व आहे. संगीत न आवडणारा माणूस शोधून देखील सापडणार नाही. आपले आयुष्य संगीताच्या सप्तसुरांनी व्यापले आहे. संगीतामुळे सगळ्यांच्या आयुष्यात नवचैतन्य येते आणि हेच सुरेल संगीत या कार्यक्रमातून गेले काही वर्ष प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. तिसरं पर्व जोरदार पद्धतीत सुरु झालं आहे आणि मेगा ऑडिशनमधून निवड झालेल्या २२ स्पर्धकांमध्ये आता विजेतेपद मिळविण्याची चुरस बघण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे. रसिक प्रेक्षकांना या पर्वामधून सुरेल संगीतिक नजराणा मिळणार आहे यात शंका नाही. यंदाचा हा सुरेल प्रवास कसा रंगतो ते पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी