स्वामिनी मालिकेत लग्नानंतर खुलू लागलं आहे रमा-माधव यांचं नातं

मालिका-ए-रोज
Updated Nov 07, 2019 | 15:32 IST | चित्राली चोगले

छोट्या पडद्यावरची ऐतिहासिक स्वामिनी मालिकेत नुकंतच एक सुखद वळण आलं आणि रमा-माधव यांचा विवाहसोहळा रंगला. रमा बाई आता शनिवार वाड्यात दाखल झाल्या आहेत आणि माधवरावांसोबत त्यांचं नातं फुलू लागलं आहे. वाचा सविस्तर.

rama madhav’s relation takes a sweet turn after their wedding in marathi historical show swamini
स्वामिनी मालिकेत लग्नानंतर खुलू लागलं आहे रमा-माधव यांचं नातं  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • 'स्वामिनी' मालिकेत लवकरच येणार एक गोड वळण
  • लग्नानंतर फुलू लागणार रमा-माधव यांचं नातं
  • रमा बाईंसाठी माधवरावांचा गोपिकाबाईंना विरोध

मुंबई: रमा-माधव यांची कथा ही पेशवे काळात फारंच गाजली. हाच पेशवेकालीन इतिहास पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अनुभवायला मिळत आहे ते स्वामिनी या मराठी मालिकेतून. ही मालिका सुरु होऊन अवघे काही दिवस लोटले असून मालिकेची सध्या बरीच चर्चा आहे. मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय देखील ठरत आहे. मालिकेतील कास्टिंग, तशीच कथेची मांडणी देखील मालिकेसाठी पूरक ठरत आहे. नुकतंच स्वामिनी मालिकेमध्ये एक सुखद वळण आलं आणि मालिकेमध्ये मोठ्या थाटामाटात रमा–माधवचा विवाहसोहळा पार पडला.

हे लग्न पार पडण्याआधी गोपिकाबाईंनी रमा-माधवच्या लग्नामध्ये मोडता आणण्यासाठी अनेक कारस्थनं, युक्त्या रचल्या पण या सगळ्या अडचणींना पार करत रमाबाईंचे माधवरावांशी लग्न झाले. रमा-माधवचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलं आणि छोटी रमा अखेर शनिवारवाड्यात दाखल झाली. रमा घरात आल्यापासून बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. तिच्यासोबत अनेक चांगले तर काही कठीण प्रसंग ओढवताना दिसत आहेत. पार्वतीबाईंशी रमाचे विशेष नाते जुळले आणि ती त्यांना आई मानू लागली. तसंच अनू आत्या, काशीबाईची मने देखील निरागस रमेने तिच्या स्वभावाने जिंकली. या सगळ्यामध्ये गोपिकाबाईंचा धाक काही कमी झाला नाही.

 

 

गोपिकाबाईंनी घेतलेल्या एका निर्णयाचा मात्र रमाबाईंना खूप त्रास झाला. गोपिकाबाईंनी रमाबाईंच्या आई-वडिलांना पुन्हा त्यांच्या गावी निघून जाण्याचा आदेश दिला जेणेकरून त्या रमेला शिस्त, शनिवारवाड्यात कसे वागायचे हे शिकवू शकतील. रमा बाईंच्या नाजुक मनावर त्याचा परिणाम झाला, त्यांनी त्या गोष्टीचा धस्का घेतला. त्यांनी काही खाण्यास देखील नकार दिला. शनिवार वाड्यात सुरू असलेले राजकारण रमाबाईंच्या निरागस मनाला काय कळणार म्हणा. या सगळ्या गोष्टी माधवराव, सदाशिवराव आणि पार्वतीबाईंना कळत होत्या. जे काही घडत आहे त्यावर न राहून सदाशिवरावांनी गोपिकाबाईंच्या विरोधात जाऊन रमाबाईंच्या आई-वडिलांना शनिवार वाड्यात पुन्हा घेऊन येण्याचा निरोप पाठवला. हे सगळे घडत असताना रमाबाईंना माधवरावांचा आधार मिळाला. रमाबाईंनी अन्न ग्रहण करावे म्हणून त्यांनी देखील अन्नत्याग केला.

माधवरावांना रमाबाईंची ही परिस्थिति बघवत नव्हती. रमाला या सगळ्या गोष्टीचा विसर पडावा म्हणून माधवराव आता रमेला देवदशर्नासाठी शनिवार वाड्याच्या बाहेर घेऊन जाणार आहेत. तिथे रमा लगोरी खेळताना आणि परकर पोलका घालून आनंदाने बागडताना दिसणार आहे. हे बघून माधवराव आनंदी आहेत. लग्नानंतर आता रमा–माधवचे नाते हळूहळू फुलू लागले आहे. पुढे या नात्यात काय होते ते पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी