मुंबई: मराठी मालिकाविश्वातील दिग्दर्शाकामधील प्रसिद्ध नाव म्हणजे मंदार देवस्थळी. सुखाच्या सरींनी हे मन बावरे, होणार सून मी या घरची, आभाळमाया, वादळवाट अशा अनेक दर्जेदार मालिका त्यांनी केल्या. मालिकाविश्वास मंदार देवस्थळी यांचे नाव नेहमीच चर्चेत असते. मात्र सध्या त्यांचे नाव एका दुसऱ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे त्यांच्यावर एका अभिनेत्रीने आरोप केला आहे.
हे मन बावरे यामालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने हा आरोप केला आहे. याबाबत तिने इन्स्टाग्रामवर पोस्टदेखील केली आहे. मंदार देवस्थळी यांनी आपले पैसे थकवल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. इतकंच नव्हे तर देवस्थळी यांनी सर्व कलाकार तसेच तंत्रज्ञ यांचेही पैसे थकवल्याचे अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
शर्मिष्ठा राऊत हिने हे मन बावरे यामालिकेत शशांक केतकरची बहीण ही भूमिका साकारली होती. ही मालिका आता बंद झाली आहे. या मालिकेत शर्मिष्ठाव्यतिरिक्त मृणाल दुसानीस, संग्राम समेळ, शशांक केतकर यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. दरम्यान शर्मिष्ठाच्या या पोस्टला मृणाल दुसानीस, संग्राम समेळ आणि विदिशा म्हसकर या कलाकारांनीही सपोर्ट केला आहे.
गेली १३ वर्ष कलाक्षेत्रात काम करतेय.. आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाहीत.. आजही आणि यापूर्वी पण कायम channel ने आम्हाला मदत केली.. परंतु एक प्रसिद्ध निर्माता, @mandarr_devsthali त्याने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ ह्यांचे पैसे थकवले... हे कोणत्याही क्षेत्रात होऊ शकत! please घाबरू नका.. बोला..please support & Pray for US.. #support # चळवळ
काही दिवसांपूर्वी शर्मिष्ठा राऊत पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकली. तिने तेजस देसाईशी लग्नगाठ बांधली. पहिला तिने प्रेमविवाह केला होता. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकले नाही.