मुंबई: होणार सून मी तसेच हे मन बावरे या मालिकेतून घरांघरात प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर(shashank ketkar). शशांक केतकरने काही महिन्यांपूर्वी बायकोचा फोटो शेअर करत ते लवकरच नव्या पाहुण्याचे स्वागत करणार असल्याची बातमी दिली होती. अखेर नव्या पाहुण्याचे आगमन शशांकच्या घरी झाले आहे. शशांकने खुद्द सोशल मीडियावरून ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. इतकंच नव्हे तर त्याने आपल्या बाळाचा फोटोही शेअर केला आहे.
तुम्हालाही उत्सुकता लागली असेल ना? की मुलगा झाला की मुलगी...शशांकला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. त्याच्या पत्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. शशांकने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. तसेच त्याचे नावही जाहीर केले आहे. शशांकने इन्स्टाग्रामवर बाळाला हातात घेतलेला फोटो शेअर केला आहे. यात त्याने कॅप्शन देताना, रुग्वेद शशांक केतकर असे म्हटले आहे. शशांकने आपल्या मुलाचे नाव ऋग्वेद असे ठेवले आहे.
काही महिन्यांपूर्वी शशांकने आपल्या प्रेग्नंट बायकोसोबत फोटो शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. शशांकला खरी प्रसिद्धी होणार सून मी या मालिकेतून मिळाली. या मालिकेतील श्री या त्याच्या भूमिकेला अमाप प्रसिद्धी मिळाली. तो तरूणींच्या गळ्यातील ताईत झाला. श्री-जान्हवी ही जोडी अनेकांसाठी तर आदर्श जोडी होती.
याच मालिकेदरम्यान शशांक आणि तेजश्री प्रधान यांचे सूर जुळले आणि दोघेही लग्नबेडीत अडकले. मात्र त्यांचे हे लग्न दीर्घकाळ टिकू शकले नाही. अखेरीस वर्षभरातच त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर शशांकने आपली मैत्रीण प्रियंका ढवळे हिच्याशी लग्नगाठ बांधली. या जोडप्यास नुकतेच पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. प्रियंकानेही शशांकचा फोटो शेअर करत चाहत्यांना बातमी दिली.