'तुझ्यात जीव रंगला'मधील राणाची लेक लक्ष्मी रणविजय गायकवाडबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

मालिका-ए-रोज
Updated Nov 04, 2019 | 18:46 IST | चित्राली चोगले

तुझ्यात जीव रंगला मालिकेने लीप घेतला आहे आणि मालिकेत बरेच बदल घडून आले आहेत. मालिकेत लक्ष्मी रणविजय गायकवाड या नवीन पात्राची एन्ट्री झाली. लक्ष्मी साकारणारी बालकलाकार नेमकी आहे तरी कोण चला अधिक जाणून घेऊया.

some interesting facts about child artist who plays lakshmi ranvijay gaikwad in top-rated marathi show tujyaat jiv rangala
'तुझ्यात जीव रंगला'मधली राणाची लेक लक्ष्मी रणविजय गायकवाडबद्दल या गोष्टी माहित आहेत का?  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • 'तुझ्यात जीव रंगला'च्या चुणचुणीत लक्ष्मी रणविजय गायकवाडबद्दल जाणून घ्या अधिक
  • ही तिखट मिरची मेनकी आहे तरी कोण, वाचा सविस्तर
  • राणादा आणि अंजली बाईं इतकीच ठरत आहे लोकप्रिय लक्ष्मी

मुंबई: अतिशय लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगलाने नुकताच एक मोठा लीप घेतला आणि मालिकेत बरेच बदल पाहायला मिळाले. मालिकेतील अनेक लोकप्रिय पात्रं आता या लीप नंतर मालिकेत दिसणार नाहीत. मालिकेतील छोटा लाडू, तसंच मालिकेची अत्यंत लोकप्रिय असलेली खलनायिका नंदिता वहिनी या दोघांनी मालिकेतून रजा घेतली. तर राणादा आता पोलीसात भरती झाला आहे. त्याचसोबत या लोकप्रिय मालिकेत एक नवीन एन्ट्री सुद्धा झाली. राणादा आणि अंजली बाईंची लेक लक्ष्मी रणविजय गायकवाड आता मालिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही चुणचुणीत तिखट मिरची नेमकी आहे तरी कोण चला अधिक जाणून घेऊया.

मालिकेत सध्या सगळ्यांना धारेवर धरणारी लक्ष्‍मी रणविजय गायकवाडचं खरं नाव आहे वाग्मी शेवडे. अवघ्या ८ वर्षांची असलेली वाग्मी मुंबईची रहिवासी आहे आणि आपल्या आई-बाबांसोबत मुंबईत राहते. वाग्मी ही मूळची साताऱ्याची पण कामानिमित्त वाग्मीचं कुटुंब मुंबईत स्थायिक झालं आहे. वाग्मीचे बाबा अमेय शेवडे तर आई तेजस्विनी आपटे शेवडे असून वाग्मी ही त्यांची एकुलती एक मुलगी आहे.

 

वाग्मी आणि तिच्या आईला २०१७ साली आयकॉनिक ऑरा विमन रन स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल पदक मिळालं होतं. वाग्मी शाळेतील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात कायम भाग घेताना दिसते. ती शाळेतील अनेक कार्यक्रमात तिने अनेक बक्षीसं सुद्धा पटकवलेली आहेत. तिने अनेक फॅन्सी ड्रेस स्पर्धेत वेगवेगळी  ऐतिहासिक पात्रं देखील रंगवली आहेत. 

 

वाग्मीला अभिनयाची प्रचंड आवड आहे पण याआधी तिने कुठल्याही मालिकेत काम केलेलं नाहीये. तुझ्यात जीव रंगला ही वाग्मीची पहिली मालिका ठरली असून मालिकेमुळे वाग्मीला सध्या प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळत आहे. वाग्मी प्रकाशझोतात आल्यामुळे तिच्या आई-वडिलांना सुद्धा बऱ्याच शुभेच्छा मिळताना दिसत आहेत. वाग्मीचं लक्ष्मी हे पात्र सध्या प्रचंड गाजतंय. तिचा तोरा, तिचा रुबाब, तिच्या अभिनयाची हटके स्टाइल हे प्रेक्षकांना नक्कीच आवडत आहे. मालिकेतील नंदिताची जागा तर कोणी घेऊ शकणार नाही पण मालिकेत लक्ष्मीची एन्ट्री झाल्यामुळे मालिकेला एक वेगळं वळण मिळालं आहे हे निश्चित. राणादा आणि अंजली बाई यांची मुलगी लक्ष्मी सुद्धा आता प्रेक्षकांना आवडते आहे हे विशेष. वाग्मीचं लक्ष्मी हे पात्र आता मालिकेत पुढे अजून काय धमाल करणार हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी