मुंबई : लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स इंडियाने आजवर अनेक उत्कृष्ट वेब सिरीज आणल्या आहेत. अशा अनेक सिरीजचा पुढचा सीझन कधी येतो याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.
यातलीच एक सिरीज म्हणजे दिल्ली क्राइम. बहुचर्चित वेब सिरीज दिल्ली क्राइमच्या सीझन 2 ची (Delhi Crime Season 2) खूप काळापासून चाहत्यांना प्रतीक्षा आहे. चाहते अगदी आतुरतेने नव्या सीझनची वाट पाहत आहेत.
यादरम्यानच दिल्ली क्राइम-2 बाबत मोठी बातमी समोर आली होती, की Netflix दिल्ली क्राइम - 2 च्या काही दृश्यांबाबत समाधानी नाही आणि ही दृश्यं पुन्हा चित्रीत केली जाणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार 'नेटफ्लिक्स'ने दिल्ली क्राइम सीझन - 2 च्या काही दृश्यांना पुन्हा चित्रीत करण्याची तयारीही सुरू केली होती. त्याआधी दिल्ली क्राइम - 2 ला उशीर होण्याचे कारण होते, कोविडमुळे लागलेला लॉकडाउन.
यादरम्यान Delhi Crime वेब सीरीजचे अभिनेते राजेश तैलंग यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्लीमध्ये फिरतानाचे फोटोजही शेयर केले आहेत. यामुळे चाहत्यांमध्ये Delhi Crime सीझन 2 च्या लवकरच ऑन एयर होण्याची उत्सुकताही वाढली आहे.
'दिल्ली क्राइम' ही नेटफ्लिक्सच्या अगदी खास वेब सीरीजपैकी एक आहे. यामुळेच ओटीटी प्लेटफॉर्म कुठलाच धोका पत्करायला तयार नाही. सावधगिरीचा भाग म्हणून निर्मात्यांनी काही दृश्यं दुसऱ्यांदा शूट करण्याचे आदेश दिले आहेत. अर्थात नेटफ्लिक्स आणि निर्मात्यांकडून अधिकृतपणे कसलीच घोषणा झालेली नाही.
वेब सीरीज दिल्ली क्राइममध्ये राजेश तैलंगसोबत शेफाली शाह, रसिका दुग्गल, आदिल हुसैन असे अनेक दिग्ग्गज कलावंत मुख्य भूमिकेत होते. 'दिल्ली क्राइम' 2012 मध्ये झालेल्या निर्भया केसवर आधारित होती. या सीरीजनं जगभरातून वाहवा मिळवली होती. 2020 साली या सिरीजला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्डनेही गौरवण्यात आले. यात दिल्ली क्राइमला बेस्ट ड्रामा सीरीजचा पुरस्कार मिळाला होता. ही आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकणारी भारतातली पहिली वेब सीरीज ठरली. या सीरीजचे लेखन आणि दिग्दर्शन ऋची मेहता यांनी केले आहे.