वर्षा उसगांवकर ३३ वर्ष जुन्या गाण्यावर पुन्हा एकदा करणार परफॉर्म  

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या निमित्ताने ३३ वर्षांनंतर ‘उधळीत येरे गुलाल सजणा’ गाण्यावर अभिनेत्री वर्षा उसगांवकर या पुन्हा एकदा परफॉर्म करणार आहेत. 

varsha usgaonkar
वर्षा उसगांवकर यांचा ३३ वर्ष जुन्या गाण्यावर परफॉर्मन्स   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. या मालिकेच्या ३१ डिसेंबरच्या भागात आता प्रेक्षकांना एक आगळंवेगळं सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे. कारण यावेळी मालिकेतील संपूर्ण शिर्के-पाटील कुटुंब हे नवीन वर्षांचं स्वागत अगदी जल्लोषात करताना दिसणार आहेत. यावेळची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) त्यांच्या गंमत-जंमत या सुपरहिट सिनेमातील ‘उधळीत येरे गुलाल सजणा’ या सुपरहिट गाण्यावर पुन्हा एकदा थिरकणार आहेत. 

वर्षा उसगांवकर यांच्या या खास परफॉर्मन्ससाठी मालिकेतील त्यांची धाकटी सून गौरी म्हणजेच गिरीजा प्रभू हिने या विशेष नृत्यासाठी कोरिओग्राफी देखील केली आहे.

या परफॉर्मन्सबाबत बोलताना वर्षा उसगांवकर म्हणाल्या, ‘गंमत जंमत सिनेमात मी उधळीत येरे गुलाल सजणा या गाण्यावर परफॉर्म केलं होतं. त्यानंतर जवळपास ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्या गाण्यावर परफॉर्म करण्याचा योग जुळून आला आहे. याचा आनंद होतोय. इतक्या वर्षात मी कधीच या गाण्यावर परफॉर्म केलं नाही. त्याकाळच्या बऱ्याच नायिकांनी या गाण्यावर परफॉर्म केलं होतं. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या निमित्ताने माझी ही इच्छा पूर्ण होतेय. ३१ डिसेंबरच्या विशेष भागात माझा हा खास परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. मालिकेतली माझी सून गौरी म्हणजेच गिरीजा प्रभूने हे गाणं कोरिओग्राफ केलं आहे. या गाण्यावर परफॉर्म करताना खूपच छान वाटतं आहे.'

मोठ्या पडद्यावरील यशस्वी नायिका ठरलेल्या वर्षा उसगांवकर आता आपल्या सहजसुंदर अभिनयाने छोटा पडदा देखील गाजवत आहेत. त्यातच आता त्या पुन्हा एकदा आपल्या आवडत्या गाण्यावर परफॉर्मन्स करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही एका खास पर्वणीच ठरणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी