April 2022 Vivaah Shubh Muhurat List: कोरोना संकटामुळे समारंभांवर बंधने येत होती. पण महाराष्ट्र शासनाने आज (शनिवार २ एप्रिल २०२२) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व कोरोना निर्बंध आणि मास्क सक्ती मागे घेतली आहे. यामुळे लग्न तसेच इतर शुभ कार्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करणे शक्य होणार आहे. हिंदू पंचागानुसार गुढी पाडव्यापासून चैत्र महिना सुरू झाला आहे. या हिंदू नववर्षात १५ एप्रिल २०२२ पासून २७ एप्रिल २०२२ पर्यंत लग्न आणि इतर शुभ कार्यांसाठी दहा शुभ मुहूर्ताचे दिवस आहेत. यामुळे ज्यांना लग्न किंवा इतर शुभकार्य करायचे आहे त्यांच्यासाठी एप्रिल हा महिना अतिशय उत्तम आहे, असेच म्हणावे लागले.
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार १४ एप्रिल २०२२ पर्यंत लग्न किंवा इतर शुभकार्य करण्यासाठी शुभ दिवस नाही. पण शुक्रवार १५ एप्रिल २०२२ पासून बुधवार २७ एप्रिल २०२२ पर्यंत लग्न आणि इतर शुभ कार्यांसाठी दहा शुभ मुहूर्ताचे दिवस आहेत. यात दोन शनिवार आणि दोन रविवारच्या दिवशी लग्न आणि इतर शुभ कार्यांसाठीचे शुभ मुहूर्ताचे दिवस आले आहेत. अनेकदा मोठी शुभ कार्य ही शनिवार किंवा रविवारी केली जातात. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना सोयीचा दिवस म्हणून अनेकदा शनिवार किंवा रविवारचे मुहूर्त निवडले जातात. ही बाब लक्षात घेतल्यास एप्रिल २०२२ मध्ये असे सोयीच्या मुहुर्तांचे चार दिवस मिळणार आहेत.
एप्रिल २०२२ नंतर मे २०२२ मध्ये लग्न आणि इतर शुभ कार्यांसाठी मुहूर्ताचे १६ दिवस आहेत. यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या संख्येने शुभकार्य होण्याची चिन्हं आहेत. अनेक शाळा कॉलेजांमध्ये उन्हाळ्यामुळे एप्रिल-मे दरम्यान सुटी असते. यामुळे अनेक कुटुंबांचा कल घरातले मोठे शुभकार्य उन्हाळी सुटीच्या काळात करण्याकडे असतो. हा सोयीचा विचार करणाऱ्यांसाठी एप्रिल आणि मे महिन्यात शुभ कार्यासाठी भरपूर मुहूर्त आहेत.