Parenting Tips: पालकत्त्व (Parenting) ही जगातील सर्वात अवघड कला आहे, असं मानलं जातं. पालकत्व हे करता करताच शिकण्याची बाब असल्यामुळे कायमच चुका होण्याचा (Mistakes) संभव असतो. त्यासाठी सावधपणे आपल्या प्रत्येक कृतीकडे आणि विचारांकडे लक्ष देण्याची गरज असते. जन्मापासून पहिल्या काही वर्षात मुलं जे पाहतात, त्याचं अनुकरण (Follow) करत असतात. त्यामुळे जन्मापासून काही वर्षे पालकांचा आणि त्यानंतर शाळेतील पहिल्या शिक्षकांचा प्रचंड प्रभाव मुलांच्या मानसिक जडणघडणीवर होत असतो. पालक म्हणून आपल्या काही सवयी आपल्या नकळत मुलांवर दुष्परिणाम करत असतात. जाणून घेऊया अशाच काही सवयी (Habits), ज्या वेळेत बदलणं आवश्यक आहे.
अनेक मुलांना आजकाल मैदानावर किंवा बागेत जाऊन खेळण्याऐवजी मोबाईलवर, लॅपटॉपवर किंवा टॅबवर गेम खेळत बसायला आवडतं. आपलाही वेळ वाचत असल्यामुळे अनेक पालक मुलांना तसं करू देतात. मात्र ही सवय मुलांच्या भवितव्यासाठी अत्यंत घातक ठरण्याची शक्यता असते.
अनेक पालक आपला वेळ आणि ऊर्जा वाचवण्यासाठी मुलं जे मागतील, ते लगेच आणून देतात. मुलांचा छोटासा हट्टदेखील लगेच पुरवला जातो. त्यामुळे मुलांना आयुष्यात नकार पचवण्याची सवयच लागत नाही. मोठेपणी अचानक मिळणारे नकार ते पचवू शकत नाहीत आणि त्यातून मानसिक विकृती जन्माला येण्याची शक्यता असते.
आजकाल स्पर्धा प्रचंड वाढली आहे. स्पर्धेत पुढं राहण्यासाठी पालकांकडून मुलांना नेहमी जिंकण्याचे धडे दिले जातात. त्याला जिंकण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. मात्र पराभव कसा स्विकारावा, हे मात्र शिकवलं जात नाही. आयुष्यात विजय आणि पराजय या दोन्ही गोष्टींचा सामना करण्यासाठी मुलांना तयार करण्याची गरज आहे.
अनेक पालक आपल्या मुलांची इतरांसोबत तु्लना करतात. कधी त्यांच्या सख्ख्या भावंडांसोबत, कधी नातेवाईकांसोबत तर कधी त्यांच्या मित्रांसोबत. अशामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते.
मुलांकडून चुका झाल्यानंतर त्यांना समजावून सांगण्याऐवजी अनेक पालक ओऱडताना आणि रागावताना दिसतात. त्यामुळे मुलांमधील प्रयोगशीलता मारली जाते आणि मुलंही चिडचिड्या स्वभावाची होत जातात.
पालकत्व ही एक मोठी जबाबदारी आहे. जी गोष्ट तुम्ही मुलांना शिकवणार आहात, त्याचं पालन तुम्हीही करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ फास्टफूडपासून मुलांना परावृत्त करायचं असेल, तर तुम्ही स्वतः ते खाणं सोडलं पाहिजे. मुलांना व्यायामाची सवय लावायची असेल, तर तुम्ही स्वतः व्यायाम करणं गरजेचं आहे.
मुलांना नेहमी दोन पर्याय देणं आणि त्यातील योग्य पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे. त्यातून मुलांनी निर्णयक्षमता विकसित होते.
अनेक पालक मुलांसमोर खोटं बोलतात किंवा मुलांना खोटी उत्तरं देण्यास भाग पाडतात. यामुळे कधी मूल आपल्याशीही खोटं बोलू लागतं, हे पालकांना समजतच नाही.
अधिक वाचा - Home Tips: घरात कोळ्यांच्या जाळ्यांनी हैराण आहात तर वापरा या टिप्स
संयम शिकवणं ही पालक म्हणून सर्वात मोठी जबाबदारी असते. आयुष्यात अनेक प्रसंगी संयम ठेवण्याची गरज निर्माण होते. लहानपणापासून त्याची सवय नसेल, तर अनेकदा मुलं अडचणीत येण्याची शक्यता असते.
सतत वायफळ खर्च करून मुलांना खूश कऱण्याकडे अनेक पालकांचा कल असतो. मात्र मुलांना काटकसर करण्याची सवय लावणे आवश्यक आहे. पालक काटकसर करत असल्याचं पाहून मुलांनाही ती सवय लागते.