Lokmanya Tilak Birth Anniversary : जेव्हा महंमद अली जिनांनी घेतले होते लोकमान्य टिळकांचे वकीलपत्र

Lokmanya Tilak Birth Anniversary : लोकमान्य टिळकांवर जेव्हा राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता, तेव्हा  त्यांची बाजू बॅरिस्टर महंमद अली जिना यांनी मांडली होती. पहिल्यांदा जिना यांना टिळकांना शिक्षेपासून वाचवण्यात अपयश आले होते. त्यामुळे ते खुप दुःखीही झाले होते. परंतु दुसर्‍यांदा जिना यांनी कायद्याचा कीस पाडून टिळकांची दमदार बाजू मांडली आणि त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात यश आले होते.

bal gangadhar tilak
बाळ गंगाधर टिळक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लोकमान्य टिळकांवर जेव्हा राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता, तेव्हा  त्यांची बाजू बॅरिस्टर महंमद अली जिना यांनी मांडली होती.
  • पहिल्यांदा जिना यांना टिळकांना शिक्षेपासून वाचवण्यात अपयश आले होते.
  • त्यामुळे ते खुप दुःखीही झाले होते.

Lokmanya Bal Gangadhar Tilak Birth Anniversary 2022 : मुंबई : भारतीय असंतोषाचे जनक असे ज्यांचे वर्णन केले जाते त्या लोकमान्य टिळक यांची आज जयंती आहे. लोकमान्य टिळकांवर जेव्हा राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता, तेव्हा  त्यांची बाजू बॅरिस्टर महंमद अली जिना यांनी मांडली होती. पहिल्यांदा जिना यांना टिळकांना शिक्षेपासून वाचवण्यात अपयश आले होते. त्यामुळे ते खुप दुःखीही झाले होते. परंतु दुसर्‍यांदा जिना यांनी कायद्याचा कीस पाडून टिळकांची दमदार बाजू मांडली आणि त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात यश आले होते. 

आनंद हर्डीकर यांनी बॅरिस्टर जिना यांचे कायदे आझम या नावाचे चरित्र लिहिले आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार १९०८ साली राजद्रोहाच्या गंभीर आरोपाखाली टिळकांना अटक करण्यात आली होती. तेव्हा जामीन मिळवण्यासाठी न.चिं. केळकर आणि टिळकांच्या इतर सहकर्‍यांनी जिना यांना टिळकांचे वकीलपत्र घेण्याची विनंती केली. तेव्हा जिनानी कुठलेही आढेवेढे न घेता टिळकांची बाजू मांडण्यास तयार झाले. 

१५ जून १८९७ रोजी केसरीच्या ‘शिवाजीचे उद्गार’ या मजकुराबद्दल टिळकांवर राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. तेव्हा बॅरिस्टर दावर यांनी टिळकांची बाजू मांडली आणि त्यांची या खटल्यातून सुटका केली होती. आता तेच दावर न्यायमूर्ती होते आणि जिना यांनी टिळकांचे वकीलपत्र घेतले होते.

१२ मे १९०८ रोजी  केसरीत प्रसिद्ध झालेले देशाचे दुर्दैव आणि ९ जून १९०८ रोजी प्रकाशित झालेला हे उपाय टिकाऊ नाहीत या लेखांवरून त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा खटला भरण्यात आला होता. १८९७ साली टिळकांची बाजू मांडली होती, तोच युक्तिवाद आता दावर मान्य करतील आणि टिळकांना जामीन मंजूर करतील असा जिना यांचा अंदाज होता. परंतु हा अंदाज पूर्ण खोटा ठरवून न्यायमूर्ती दावर यांनी टिळकांचा जामीनाचा अर्ज फेटाळून लावला.  जामीन फेटाळल्याने टिळकांची रवानगी डोंगरीच्या कोठडीत झाली. टिळकांना जामीन मिळवून देण्यात आपण अपयशी ठरलो यांची खंत जिना यांना नेहमी राहिली. 

या कामगिरीमुळे ब्रिटिश सरकारने न्यायमूर्ती दावर यांना नाईटहूड बहाल करण्यात आला. दावर यांच्या सन्मानार्थ मुंबई उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने एक मेजवानी आयोजित केली होती. तेव्हा कोर्टात एक परिपत्रक फिरवण्यात आले. ज्यांना या मेजवानीत सहभागी होता येणार आहे, त्यांनी सही करायची होती. जिना यांनी या परिपत्रकावर सही केलीच नाही, उलट एक कडक शेरा यावर लिहिला. जिनांनी यावर लिहिले की, सरकारी मर्जीपुढे मान तुकवून एका थोर देशभक्ताला कडक शिक्षा ठोठावणार्‍या आणि त्या कामगिरीच्या मोबदल्यात सन्मानाचे पद पदरात पाडून घेणार्‍या अशा न्यायाधीशाचा सन्मान करताना बार असोसिएशनला लाज वाटली पाहिजे. त्यानंतर दावर यांनी जिनांना बोलावून घेतले आणि याबद्दल विचारणा केली. तेव्हा जिना म्हणाले की "मला जे योग्य वाटलं तेच मी लिहिले. आपण माझ्याशी जरी नीट वागत असला तरी आपण टिळकांवरचा खटला ज्या पद्धतीने चालवलात, त्याबद्दल माझ्या तीव्र भावना मी दडपू शकलो नाही."


१९१६ साली टिळकांनी स्वराज्याची मागणी केली होती. तसेच भाषणात त्यांनी टीका केली की ब्रिटिश पंतप्रधान ब्रिटनमध्ये राहतात आणि संपूर्ण ब्रिटिश राज्यकारभार पाहतात त्यांना दरमहा पाच हजार रुपये पगार आहे, तर भारताचा व्यवहार पाहणार्‍या व्हाईसरॉय यांना २० हजार रुपये पगार का? ही खाबुगिरी भारतातच का? असा सवाल टिळकांनी विचारला. त्यामुळे ब्रिटिश सरकारमध्ये रोष निर्माण झाला आणि त्यांच्याविरोधात पुन्हा राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. तेव्हा जिनांनी पुन्हा त्यांचे वकीलपत्र घेतले. पुण्यात जेव्हा ही केस उभी राहिली तेव्हा पुणे न्यायालयाने टिळकांकडे ४० हजार रुपयांचे तीन जामीन आणि वर्षभर नीट वागण्याची हमी मागितली. तेव्हा टिळकांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. तेव्हाही जिनाच टिळकांचे वकील होते आणि त्यांनी कायद्याचा कीस पाडत टिळकांची बाजू मांडली. जिना यांनी कोर्टात म्हटले की काही सरकारी अधिकार्‍यांच्या संदर्भात टीका केली म्हणजे संपूर्ण सरकारविरोधात असंतोष पसरवला, असे नाही होत आणि त्यामुळे टिळकांनी आपल्या भाषणांद्वारे राजद्रोह केला, असे ठरत नाही असे जिना म्हणाले. उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा आदेश रद्दबातल ठरवला आणि टिळकांची सुटका केली. या खटल्यानंतर जिना आणि टिळकांनी हस्तांदोलन केले आणि मग कोर्टातून बाहेर पडले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी