Chhatrapati Shivaji Maharaj jayanti 2023 Speech in marathi : आज आम्ही तुम्हाला शिवजयंती निमित्त मराठी भाषण कसे करायचे या संदर्भात काही भाषणाचे नमुने देत आहोत. शिवाजी महाराजांसंदर्भातील ही माहिती (shivaji maharaj speech in marathi ) तुम्हाला शिवजयंती यादिवशी उपयुक्त ठरेल.
यंदा 10 मार्चला तिथीप्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहाने भारतामध्ये आणि जगामध्ये साजरी केली जाते.
शिवाजी महाराज जयंती निमित्त भाषण
सर्व प्रथम परम पवित्र माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार,सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग तसेच उपस्थित सर्व शिवभक्त रसिकहो. आज मी येथे अशा एका महान व्यक्ती बद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला जगाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.
9 फेब्रुवारी सोळाशे 30 हा सोन्याचा दिवस आणि अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ माता यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत श्रीमानयोगी, लोककल्याणकारी राजे, शासनकर्ते जाणते राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय.
शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजाबाई हे होते.
शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते त्यांना जिजाऊ मातेकडून विविध शिकवण आणि वडील शहाजीराजे भोसले कडून शौर्याचा वारसा मिळाला होता आणि म्हणूनच बालवयातच त्यांनी अनेक युद्ध कलांच्या प्रशिक्षण घेतले.
शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले.रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली.
स्वराज्याची निर्मिती करणे काही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू.त्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, नेताजी पालकर कोंडाजी फर्जद अशा अनेक शूर वीरांनी आपल्या शिवरायांची साथ दिली होती.
शिवरायांनी आपल्या चतुर आणि चाणश्य बुद्धीने आणि मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रूला म्हणजेच अफजल खान, औरंगजेब, शाहिस्तेखान अशा अनेक शत्रूला धुळ्यात पाडले म्हणजे त्यांना हरवून टाकले.आणि जिजाऊ मातेने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले.छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले व शत्रुंचा नाश करुन हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट संपूर्ण स्वराज्याची स्थापना केली आणि एवढे दिवस अंधारात असलेल्या रयतेला प्रकाशात आणले.
6 जून 1674 रोजी आपल्या राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला. आणि सुमारेसाडे तीनशे वर्षे गुलामगिरीत पडलेल्या,जुलमी शासन कर्त्याच्या अन्यायाला ग्रासलेल्या, अत्याचाराने त्रासलेल्या, गोरगरीब रयतेला लोककल्याणकारी, न्यायप्रिय असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रुपाने मिळाला.
शिवाजी महाराजांचा लढा अन्यायाविरुद्ध होता. मुसलमानाविरुद्ध नव्हता. शिवराय हे सर्व धर्मातील लोकांना आपले प्रजाजन मानत. अफजलखान भेटीच्या वेळी त्यांच्या सैन्यात सिद्धी इब्राहीम हा त्यांचा प्रमुख विश्वासू सेवक होता.
शिवराय हे पर्यावरण प्रेमी होते. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना ते मदत करत असत. त्यांचा सर्व सारा माफ करत शेतकऱ्यांच्या हिताकडे ते लक्ष देत. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांचा आदर होता व सन्मान होता. शेतकऱ्यांना मान होता. साधूसंतांचा आदर होता. आणि प्रत्येक मराठी माणसाला शिव छत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान होता.अशाप्रकारे शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नव्हते तर ते एक स्वतंत्र नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाचे निर्मिती करणारे एक शिल्पकार होते.
शिवाजी महाराज भाषण मराठी शायरी
"राजे असंख्य झाले आजवर या जगती पण शिवबासमान मात्र कुणी न झाला गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवबा झाला"
जय भवानी जय शिवाजी
एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय.
...........
शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी..
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा.. ! आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो मी (विद्याथ्याचे नाव) आज एका महान व्यक्ती बद्दल बोलणार आहे त्यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.
आज 10 मार्च तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीयेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या निमित्ताने आपल्यासमोर दोन शब्द बोलणार आहे, ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती. सुमारे साडेतीशे वर्षानंतर ही जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला.
शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे माता जिजाबाई यांनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले आणि त्यांना आपण शिवाजीराजे, शिवबा किंवा शिवराय अशा अनेक नावांनी ओळखतो. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. शिवाजी महाराज अवघे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली आणि वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली.
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली, शूर वीरांच्या व रामायण महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले अशा या संस्कारांमुळे शिवाजीराजे घडले. शिवाजी महाराज जेव्हा पुण्याचा कारभार पाहत होते तेव्हा त्यांनी राजमुद्रा तयार केली.
ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते” या राजमुद्राचा मराठीत अर्थ असा की, जोपर्यंत प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो तशीच शहाजीचा पुत्र शिवाजीची हि राजमुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.
शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य निर्माण केले. इ.स १६४० मध्ये शिवरायांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. इ.स १६४५ मध्ये शिवरायांनी आदिलशहाच्या पुणे प्रदेशाच्या आजूबाजूचा कोंढाणा, तोरणा, सिंहगड, पुरंदर या किल्ल्यांचा ताबा घेतला होता.
अफझलखानाने प्रतापगडावर शिवरायांना ठार मानण्याचे षडयंत्र रचले होते पण शिवरायांनी खानाच्या डाव ओळखला आणि गनिमीकाव्याचा उपयोग करीत अफजल खानाचा शिवरायांनी वध केला. याच गनिमीकाव्याचा उपयोग करून शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या. या घटनेवरून महाराजांची दूरदृष्टी दिसून येते.
इ.स ६ जून १६७४ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवाजी महाराज हे कुशल राज्यकर्ते होते, त्यांनी अष्टप्रधान मंडळ सुरू केले. प्रत्येक व्यक्तीस मंडळाची पदे आणि स्वराज्याची ठराविक जबाबदारी दिली, शिवाजी महाराज हे मराठी, संस्कृत भाषेचे समर्थक होते, स्रि स्वातंत्र्याला त्यांनी प्रोत्साहन दिले, स्वराज्याच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी किल्ले उभारलेले. इ.स ३ एप्रिल, १६८० रोजी आजारपणामुळे रायगडावर शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले.
प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे ते राजे होते, स्वराज्याची शपथ घेऊन स्वतंत्र स्वराज्य निर्माण करणारे ते राजे होते, महाराजांचा हा आदर्श आपण घेतला पाहिजे. शिवजयंतीला नुसता शिवरायांचा जयजयकार करण्यापेक्षा प्रत्येक दिवस शिवरायांच्या विचारांनी प्रेरित केला पाहिजे. शिवरायांचे भक्त आपण तेव्हा शोभू जेव्हा आपण एकत्र येऊन देशाच्या भल्याचे काम करू. आपल्या आयुष्याला स्फूर्ती देणाऱ्या या राज्याला माझे कोटी कोटी प्रणाम जय भवानी जय शिवाजी धन्यवाद.!
शिवाजी महाराज मराठी भाषण लिहलेले व शायरी : पाठी जरी शिवशंकर गरजले.. बघा मराठ्यांच्या कुशीत शिवराय जन्मले..! थाप मारताच चाले तलवारीची पाती..येथेच जुळली मराठी मनामनाची नाती.! मनामनाची नाती.! स्वराज्याचा पुरावा देत आहे तेथे एक एक गडा.! येथेच पडला शत्रुच्या रक्ताचा सडा…! शत्रुच्या रक्ताचा सडा..! अख्ख्या जगाला हेवा वाटेल असा मराठ्यांचा कैवारी..! शत्रूला पाणी पाजून स्वराज्याची अखंड पताका फडकवणारे शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊच्या पोटी झाला. म्हणजे फाल्गुन वद्य तृतीयेला तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते.
शिवराय लहानपणापासूनच खोडकर होते. जिजाऊ त्यांना लहानपणी रामाच्या, कृष्णाच्या आणि शूरवीरांच्या गोष्टी सांगत. जिजाऊ शिवरायांना म्हणत असत शिवबा आपला जन्म सरदार किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून रंजलेल्या रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे व त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा.! स्वराज्य निर्माण करा..!
जिजाऊचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकुन स्वराज्याचे तोरण शिवरायांनी बांधले. शिवाजी महाराजांनी गनिमी कावा आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले. वेळ आली होती पण हिंमत सोडली नाही. म्हणतात ना ताकद तर सर्वांमध्ये होती, तलवार हि सर्वांच्या हातात होती, जोर तर सर्वांच्या मनगटात होता पण बुद्धी व दृढ इच्छाशक्ती फक्त शिवरायांच्या मनात होती.
म्हणून एक आदर्श राजा, कुशल संघटक, लोककल्याणकारी राजा, नव्या युगाचा निर्माण करणारा, दुर्जनांचा नाश करता, सज्जनांचा कैवारी अशा शिवरायांना मानाचा मुजरा.!! मानाचा मुजरा.!
शब्द ही पडतील अपुरे अशी शिवरायांची किर्ती.! राजा शोभून दिसे जगती..! असा तो शिवछत्रपती..राजे असंख्य झाले आजवर या जगती..! पण शिवबा समान मात्र कुणी न जाहला गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवछत्रपती..!
सर्व प्रथम रयतेचा राजा शिवछत्रपती यांना माझा मानाचा मुजरा.!!
सन्माननीय व्यासपीठ तसेच येथे उपस्थित सर्व रसिकहो. ! सह्याद्रीच्या काड्या कपारांना हि पाझर फुटेल, डोंगर माथ्यांना हि घाम फुटेल, झाडेझुडपे ही शहरतील आणि विशाल नभाला ही त्यांच्या समोर झुकावे वाटेल, असा लोक कल्याणकारी रयतेचा राजा, मावळ्यांचा सखा, बहुजनांचा कैवारी, अशी छत्रपती शिवाजी महाराजांना कितीही विशेषणे लावले तरीही ते कमी पडतील.
“इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर.. एक एक किल्ला नेहाळावा आठवा शिवरायांचा कारभार” “दिली उभारी मनाला, झाल्या तलवारी वाऱ्यावरती स्वार.! हर हर महादेव गर्जले ते चार मावळ्यांच्या जोरावर..!
अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी आभाळभर शौर्य गाजवले. असे राजे श्री शिवछत्रपती यांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीयेला तर ग्रॅगोरियन कॅलेंडरनुसार १९ फेब्रुवारी १६३० या मंगल दिनी शिवनेरीवर झाला. तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजले आणि साऱ्या आस्मानात आनंदाची उधळण झाली. या दिवशी थोर माता जिजाऊंच्या पोटी दिन दलितांचा कैवारी, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला.
शिवबांवर आई जिजाऊंनी लहानपणा पासून उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडविले आणि अवघ्या १४ व्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याचे धाडसी स्वप्न पाहिले आणि त्या दृष्टीने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवून प्रत्यक्षात उतरविले. स्वराज्यनिर्मीतीच्या या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले पण ते किंचितही कधी डगमगले नाही त्यांनी स्वराज्य निर्मितीचे आपले कार्य अविरत सुरू ठेवले.
त्यांनी तानाजी, सूर्याजी, बाजीप्रभू, जिवा महाला असे जीवाला जीव देणारे मावळे जमविले. स्वराज्यनिर्मीतीची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडाचा पराक्रम, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात.
शिवाजी महाराज नुसते राजेच नव्हे तर एक युगपुरुष होते त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले, शक्ती पेक्षा युक्तीने कार्य केले, संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले.
शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते नेहमी झटले. सर्वधर्म समभाव, स्त्रियांप्रती आदर भाव या न्यायाने ते वागले. सिंहाची चाल आणि गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूची मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन हीच शिवबाची शिकवण.. हीच शिवबाची शिकवण..
मित्रहो असे शिवछत्रपतींचे त्यांचे विचार व कार्य आजही आपल्याला प्रेरणा व ऊर्जा निर्माण करतात म्हणून अशा कर्तुत्ववान व पराक्रमी राजांविषयी व्यक्त होताना शब्दही कमी पडतात.. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर… आणि विश्वासाच्या प्रमाणावर .. राज्य करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय.. ! एव्हढे बोलून माझे भाषण संपवतो.. जय भवानी.. जय शिवराय..
सर्वात प्रथम शिवछत्रपतींना मानाचा मुजरा.. क्षत्रिय कुलावंतस, राजाधिराज, योगिराज, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय.. ! छत्रपती शिवाजी महाराज की जय..! प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंतस, श्रीमंतयोगी, रणधूरंदर छत्रपती संभाजी महाराज की जय..! छत्रपती संभाजी महाराज की जय..!
जय जिजाऊ..! जय शिवराय..! छत्रपती शिवाजी महाराज कि जय ..! ( या घोषणा देऊन श्रोत्यांना उत्साहित करून आपल्या सोबत जोडून घ्या ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली या भूमीत मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली याबद्दल मी संयोजकाची/चा आभारी आहे..
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, भूपती, नृपती, पृथ्वी पति, परम प्रतापी, प्रगल्भ बुद्धिमान, विज्ञाननीष्ठ, जगविख्यात विश्व वंदनीय, राजाधिराज योगी राज, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊ लेखी चा मानाचा मुजरा मानाचा मुजरा.. ! (वक्ता स्त्री असेल तर ) “छत्रपती शिवाजी महाराज की जय” हे शब्द कानावर पडताच ज्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतो.. रक्त सळसळते.. छाती अभिमानाने फुलते.. ! आणि अंगावर सर्रकन काटा येतो अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, आज मी येथे आशा एका महान महापुरुषाची गाथा आपल्याला सांगणार आहे. ज्यांचा तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे.
“विजेसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. ! वाघ नख्यांनी अफजलखानाचा कोथळा पाडून गेला स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला.. शिवबा होऊन गेला..!
आज या भूमीत जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही कि, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते.. कारण जन्मताच इथली माती त्याच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र पसरलेले आहे. कोण होते शिवाजी महाराज ? असे कोणते काम त्यांनी केले की आज साडेतीनशे वर्षे उलटून देखील त्यांच्या नावाचा जयजयकार करण्यात येतो.
मित्रांनो इथल्या लोकांना तर सोडाच पण इथल्या दर्या-खोर्यात जाऊन विचारले तरी शिवाजी महाराज कोण होते ? तर ते सांगतात रुद्राचा अवतार, तो वाघाचा ठसा होता.. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना कसा होता माझा शिवबा..! कसा होता तो माझा शिवबा.. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की, त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे व प्रेरणा देणारे आहे.
· ‘छ’ म्हणजे शिवरायांच्या अंगी छत्तीस हत्तीचे हत्तीचे बळ होते. · ‘त्र’ म्हणजे, त्रस्त मोगलांना करणारे. · ‘प’ म्हणजे, परत न फिरणारे · आणि ‘ती’ म्हणजे तिन्ही जगात जाणणारे
शिस्तप्रिय जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे शिवाजी महाराज होय.
एकेकाळी आम्ही जनावरासारखे जीवन जगत होतो. आमचा आमच्या अन्नधान्यावर तर सोडाच पण आमच्या देहावर देखील आमचा अधिकार राहिला नव्हता, जनावर आणि माणसं तर दूरच पण इथल्या मंदिरातील देव देखील सुरक्षित राहिले नव्हते.. याच दरम्यान शिंदखेड्याचे राजे लखुजी जाधव यांची कन्या म्हणजेच साक्षात दुर्गा, भवानी, रणचंडी जिजाऊ यांचा विवाह हा निजामशाहीचे तोडीस तोड असलेले थोर सरदार मालोजी राजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.
त्यावेळी महाराष्ट्रात पाच सुलतानी सत्ता राज्य करत होत्या. त्यांच्या आपसात सतत लढाया व्हायच्या यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे आणि असंख्य मराठी सैनिक नाहक मारले जायचे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीत हवा होता एक पेटता अंगार.. ! अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१, १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाऊची पुण्याई फळाला आली कारण जनतेचा पोशिंदा, राजा शिवबा जन्मला आले.
माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीन दलितांच्या कैवारी जन्मला, दुष्टांचा संहार जन्मला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले.. शिवराय जिजामातेच्या संस्करा खाली हळू हळू वाढू लागले.. जिजाऊंनी शिवबाला लहानपणा पासून सत्यासाठी, न्यायासाठी लढायला शिकवले. शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या.
जर कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी रडत असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा अशी शिकवण जिजाऊ कडून शिवरायांना मिळत गेली. भोळ्या-भाबड्या जनतेला गुलामी गिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायां समोर ठेवला.
आणि म्हणून म्हणावेसे वाटते थोर तुमचे कर्म, जिजाऊ तुझे उपकार कधी फिटणार नाही. सूर्य चंद्र असेपर्यंत नाव तुमचे कधी मिटणार नाही ..!
कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा. कसे असेल ते राज्य आणि कसे असतील ते शिवछत्रपती महाराज.. छत्रपती मावळ्यांचा मेळ, शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांच्या मनगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छाती वरचा वार, शिवछत्रपती म्हणजे मना मनातले धैर्य, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य..!
शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र.. शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे. व्यक्ती नष्ट होतात पण विचार नष्ट होत नाही आणि अशा विचारांना घडविण्याचे काम केले राजमाता जिजाऊंनी केले . मातेकडून मिळालेले संस्कार व स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि त्याप्रमाणे वाटचाल केली
आणि सह्याद्रीच्या कडेकपारीत भटकंती करून सवंगडी गोळा केले. तानाजी, येसाजी, नेताजी,,सूर्याजी यासारखे जीवाला जीव देणारे मावळे जमवले. रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.. हर हर महादेवची गर्जना आसमंतात घुमली आणि वयाच्या चौदाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेचा प्रवासास सुरुवात केली.
एक होते शिवाजी भीती नव्हती
त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची
कारण त्यांना साथ होती मावळ्यांची आणि शिकवण होती जिजाऊंची
यांची जात होती मर्द मराठ्यांची
देशात लाट आणली भगव्याची झेंड्याची
आणि मुहर्तमेढ रोवली स्वराज्याची
म्हणूनच म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय.. शिवरायांनी आपले शौर्य, कल्पकता, संघटन कौशल्य, राज्य धर्मपालन, स्त्रीदाक्षिण्य आदी गुणांनी गेले अनेक शतके पारतंत्र्यात बुडालेल्या या भूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले.
हातात धरली तलवार.. छातीत भरले पोलाद.. हातात धरली तलवार.. छातीत भरले पोलाद.. आज साडेतीनशे वर्षे होऊ नये ही महाराजांचे कार्य, पराक्रम, विचार यांची प्रेरणादायी आहे. म्हणून म्हणतात इतिहास विसरणारी माणसं इतिहास कधी घडू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसे इतिहास कधी विसरूच शकत नाही. हा हि एक इतिहास आहे.
निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी आहे. घेऊन मुठभर मावळे आणि निधडी छाती सोडून सारे ऐश्वर्य लढला.. तूच आमचे मंदिर ..तूच आमची मूर्ती..
मित्रांनो आजच्या युगात खरी गरज आहे ते शिवरायांचे विचार आणि गुण अंगी करण्याची. शिवरायांचा इतिहास जपण्याची, गड-किल्ल्यांचे संरक्षण करण्याची, छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याचप्रमाणे कार्य करण्याची, परस्त्रीला मातेसमान मानून तिचे रक्षण करण्याची, जात भेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची, आणि हीच असेल माझ्या राजाची जयंती शिवछत्रपतींची जयंती..!
नुसते मुखात नको हृदयात हवी शिवभक्ती..! शिवशाहीचे सारे तत्व वागण्यात तुझ्या दिसुदे ..! शिवरायांच्या नावाचा जयघोष करून मी माझे छोटेसे भाषण संपवते.. छत्रपती शिवाजी महाराज की जय.. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय… स्वराज्य जननी जिजामाता की जय.. जय जिजाऊ जय शिवराय..धन्यवाद
भाषण किती वेळ करायचे हे निश्चित करा
सभेत बोलत असतांना आपले भाषण किती वेळाचे असावे हे प्रथम निश्चित करायला हवे. कारण आपण किती वेळ बोलतो यावर सुद्धा आपल्या भाषणाची परिणामकारकता अवलंबून असते. यासोबत त्या सभेमध्ये इतर वक्ते सुद्धा बोलणार असतात म्हणून आपण सभेमध्ये किती वेळ बोलणार आहे याचे भान वक्त्याला असणे आवश्यक आहे.
यानुसारच आपल्या भाषणाची पूर्वतयारी वक्त्याने करण्यास हवी. अनेकदा वेळेचे भान न ठेवल्यामुळे भाषण लांबत जाते नाविलाजाने संयोजकाला आवरते घ्या अशी सूचना करावी लागते, लांबच लांब व पल्हाळ पाडत केलेल्या भाषणाने समोर बसलेले श्रोते कंटाळतात आणि मध्येच टाळ्या वाजून भाषण संपवा असा संकेत देतात त्यामुळे भाषण परिणामकारक होणे ऐवजी ते कंटाळवाणे होते.
म्हणून भाषण करण्यापूर्वी आपण किती वेळ बोलणार आहोत याचे भान वक्त्याला असणे गरजेचे आहे. त्याच बरोबर सभेमध्ये इतर वक्ते सुद्धा बोलणार असल्याने वेळेचे नियोजन करावे. सभेचा प्रसंग कोणता आहे ?. सभेमध्ये किती वक्ते बोलणार आहेत ? आणि सभेची वेळ कोणती आहे ? हे सर्वप्रथम वक्त्याने जाणून घेणे आवश्यक आहे.